Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Tuesday 19 November 2019

ऐसा आनंद सोहळा!

काल, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी आमच्या गुरुजींचा वाढदिवस असतो…असायचा…
गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला गुरुजींचं देहावसान झालं..

गुरुजी गेल्यानंतर, त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम करायचा हे गेल्या वर्षीच ठरलं होतं, त्याप्रमाणे अतिशय अल्प अवधीत नियोजन करुन तो गेल्या वर्षी पार पडला..
पण त्याचं नेमकं स्वरुप हे या वर्षी स्पष्ट झालं..
काल प्रचंड उत्साहात आणि लोकांच्या अलोट गर्दीत संपन्न झालेल्या "पंडित तुळशीदास बोरकर जयंती समारोहाच्या" द्वितीय वर्षाचे पहिले कलाकार होते, श्री.केदार नाफडे..गुरुजींचे ज्येष्ठ शिष्य..जे अमेरिकेत स्थायिक आहेत व आपलं करियर सांभाळून संवादिनीचा, पी.मधुकर घराण्याचा प्रचार व प्रसार सातासमुद्रापार यशस्वीपणे करीत आहेत.. त्यांनी गुरुजींचे गुरु, पी. मधुकर यांनी निर्मिलेला राग मधूयमनीने सुरवात केली..त्यानंतर त्यांनी "नच सुंदरी करु कोपा हे नाट्यगीत सादर केलं त्यानंतर एक द्रुत तीनतालातील दिनकरराव अमेम्बल यांची सुंदर रचना सादर केली व सादरीकरणाचा शेवट केला गुरुजींना प्रिय असलेल्या उस्ताद बिस्मिल्ला खान यांची एक धून वाजवून..
गुरुजींवरच्या श्रद्धेपोटी ते फक्त दोन दिवस, या कार्यक्रमासाठी अमेरिकेहून मुंबईत आले यातच सगळं येतं!
त्यांच्या वादनाची खासियत म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं त्यांच्याकडून ऐकायला मिळतं! त्यांनी गेल्या वर्षी अमेरिकेत गुरुजींवर केलेल्या एका कार्यक्रमाची लिंक खाली देत आहे, तो पूर्ण कार्यक्रम youtube वर जरूर बघावा!
(https://youtu.be/nfnn3ZmV7XU)
त्यांना अतिशय बोलकी आणि सुबक साथ केली ती श्री.यती भागवत यांनी..तबल्यावर लीलया फिरणारी त्यांची बोटं आणि त्यातून उमटणारा गोड नाद तरुण पिढीतील साधकांना नक्कीच आश्वस्त करत असेल अशी खात्री वाटते!
यती दादा त्याच्या "शाश्वतसूर" नावाच्या संस्थेमार्फत अतिशय संवेदनशील काम करत आहे..त्या पेजची लिंक सुद्धा खाली देत आहे! (https://www.facebook.com/shashwatsoor/)
स्वरमंडलवर साथ केली ती श्रीधर भट यांनी, तर माझं भाग्य की मला तानपुऱ्यावर संगत करण्याची संधी मिळाली..
त्यानंतर छोटंसं मध्यंतर होऊन पुढील कार्यक्रमाला प्रारंभ झाला..
देवकी ताईंनी सुरवात केली ती मोहक रागेश्रीने..त्यात विलंबित व द्रुत बंदिश... त्यानंतर शंकरा मध्ये मध्यलय झपतालातील आणि द्रुत एकतालातील बंदिश गाऊन त्या शेवटच्या पुष्पाकडे वळल्या.. व "सब सखीया समझावत"ने त्यांच्या सादरीकरणाचा शेवट केला..त्यांना तानपुऱ्यावर साथ केली ती हृदया कटोटी यांनी...
तर तबल्यावर साथ केली ती श्री.मंदार पुराणिक ह्यांनी..अतिशय डौलदार ठेका आणि एकूणच गाणं खुलवत नेणारी संगत..संवादिनी साथ केली श्री.सिद्धेश बिचोलकर यांनी..देवकी ताईंनी घेतलेली एक तान अगदी हुबेहूब वाजवली तेव्हा काही दिवसांपूर्वी अगदी व्हायरल झालेला गुरुजींचा राशीद खान यांच्याबरोबरच्या साथीचा व्हिडीओ आठवल्याशिवाय राहिला नाही..आत्ताचा सिद्धेश दादा म्हणजे गुरुजींची एक छोटी आवृत्ती असं मी म्हंटलं तर ते धाडसी ठरेल पण खोटं ठरणार नाही..
दोन्ही सत्रातील कलाकारांचा आशीर्वादपर सन्मान गुरु माईंनी केला..तर संपूर्ण कार्यक्रमाचं सुंदर निवेदन हे श्री.संतोष जाधव यांनी केलं..
भैरवी झाली तरीही ही मैफल संपूर्णपणे पार पडली नव्हती..
शेवटी गुरुजींनी वाजवलेली भैरवी स्पीकरवर लावून, कार्यक्रम खऱ्या अर्थाने पूर्णत्त्वास आला असं म्हणता येईल.
कार्यक्रमाची सांगता सुधीर नायक यांनी शिष्य परिवाराच्या वतीने ऋणनिर्देश करुन केली.
विशेष भावलेल्या दोन मुख्य गोष्टींमधील पहिली म्हणजे १८ नोव्हेंम्बर ही तारीख न बदलता, कुठलाही वार आला तरी त्याच दिवशी हा समारोह साजरा करायचा हा निश्चय..आणि दुसरी म्हणजे कार्यक्रमाचं स्वरुप असं की गुरुजींच्या एका शिष्याचं संवादिनी वादन, आणि गुरुजींना भावलेल्या एका गायक/गायिकेचं शास्त्रीय गायन..
हा कार्यक्रम या वर्षी कुठे करायचा या बाबत चर्चा होत होती, विविध मोठ्या सभागृहांचा विचार होत होता, पण शेवटी गुरुजींचं मन ज्या वास्तूत कायम रमलं, त्या वास्तूत म्हणजेच बांदऱ्याच्या शारदा संगीत विद्यालायतच हा कार्यक्रम व्हायचा होता, आणि झाला सुद्धा! ही गुरुजींचीच इच्छा म्हणावी लागेल..
गुरुजींच्या पश्चात देखील गुरुजींवर आणि त्यांच्या समस्त शिष्यपरिवारावर तितकेच प्रेम करणारे श्री.सुरेश नारंग सर यांचा ही वास्तू प्रत्येक कार्यक्रमाला उपलब्ध करुन देण्यात फार मोठा वाटा आहे..
ते ही वास्तु उपलब्ध करून देतात म्हणण्यापेक्षा याच वास्तू मध्ये गुरुजींचा कार्यक्रम व्हावा असा त्यांचा प्रेमळ आग्रह असतो....या पवित्र वास्तूमुळे देखील गुरुजींची स्मृती सदैव स्मरणात रहाते...गुरुजी तिथेच असल्याचे भासते....
काल फक्त गुरुजी आमच्यात देहरूपी नव्हते..पण मी असं म्हणेन तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसात गुरुजी काही अंशी होतेच..
काल ना रविवार, ना सुट्टीचा वार..तरीही प्रत्येक माणूस आवर्जून आला आणि येणारच, कारण गुरुजींनी दिलेलं अलोट प्रेम प्रत्येकाच्या गाठीशी आहे..
काल प्रेक्षागृह संपूर्णपणे भरल्यामुळे शिष्यवर्गाला रंगमंचावर बसायची वेळ आली, इतकी अलोट गर्दी काल कार्यक्रमाला झाली..आमच्या माई आणि गुरुजींचा पूर्ण परिवार, शिष्य परिवार, शिष्यांचा शिष्य परिवार, स्नेही आणि अनेक मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत गुरुजींच्या आठवणी रंगवून कालच्या कार्यक्रमाचा सोहळा झाला आणि हाच खरा प्रेमाचा सोहळा असं मी समजते....
तसेच हे सर्व साध्य होण्यामागे पहाडासारखे निश्चल व खंबीर नेतृत्त्व असलेले आमचे "Captain of the Ship"..सुधीर दादा..
त्यांना नेमके किती हात आहेत? त्यांच्या दिवसाला नक्की किती तास आहेत? हा एक संशोधनाचा विषय आहे.....सर्व आघाड्यांवर विक्रमी घोडदौड सतत करणारे, आज शास्त्रीय संगीतातील एक मोठं नाव, पण तरी स्वभावाने अतिशय नम्र, मृदू, उत्साही असं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दादा..संपूर्ण शिष्यपरिवाराची मोट त्यांनी बांधून ठेवली आहे!
या विलक्षण परिवाराचा एक अगदी छोटासा भाग असल्याबद्दल आणि अगदी थोडा काळ का होईना, गुरुजींचं मार्गदर्शन, सहवास लाभल्याबद्दल कृतकृत्य वाटलं नाही तरच नवल..
©कांचन लेले

Picture Credits - 
Varsha Panwar

Tuesday 29 October 2019

God's Gift!

"Same to you 🙂."

तिने साधारण सदूसष्ठावा रिप्लाय केला आणि फोन बाजूला ठेवला.
आज ऑफिसमध्ये सुद्धा अगदी २-३ लोक आले होते.
तिने पुन्हा लॅपटॉप मध्ये नजर टाकली आणि कामात गुंतली.
तेवढ्यात दारावर कोणीतरी नॉक केलं..मोहोम्मद आला होता..
"आओ मोहोम्मद"
"मॅडमजी सारा काम तो हो चुका, मै आज जलदी निकल जाऊ तो कोई दिक्कत तो नही होगी ना आपको..?"
"नही..I'll manage"
"जी thank you मॅडमजी..वो क्या है ना बच्चे माने नही, बोले अब्बू आज तो पटाके लेने बडे मार्केट जाएंगे..तो अभि जाऊंगा थोडी भीड कम मिलेगी"
"कोई बात नही..पर पटाके क्यू..? अपकाभी त्योहार है..?"
"अरे मॅडमजी..दिवाली है ना..वो क्या है बच्चोके दोस्त सब मनाते है, अच्छे कपडे पेहनते है, पटाके जलाते है..फिर मेरे बच्चे क्यू ना करे..!"
"अच्छी बात है, खर्चा भी ज्यादा होता होगा ना..?"
"हा थोडा होता है, आप बोनस भी तो देती हो..और बच्चोकी मुस्कान देख के बडा अच्छा लगता है!"
"ये बात तो है!"
"मॅडम आप ये त्योहार को भी काम करती है, आपका परिवार नाराज नही होता..?"
ती काहीच नाही बोलली..किती वेळ शून्यात बघत होती!
"मॅडमजी"
"नही"
एवढंच म्हणून तिने लॅपटॉप कडे नजर केली..मोहोम्मद समजला..आणि तो निघून गेला..

तिने खुर्चीवर डोकं टेकवलं..डोळे बंद केले..
पण मग सगळ्या आठवणी येण्याच्या भीतीने पुन्हा उघडले..बाहेर जाऊन मशिनमधून चहा घेऊन आली..
तो मग बाजूला ठेवला..
नजर पुन्हा शून्यात..
एव्हाना चहावर साय आलेली..
तिची नजर शून्यात..आणि एका क्षणी तिने मनाचा निर्धार करुन पूर्ण लक्ष कामात गुंतवलं..
दीड दोन तास सलग सगळं काम करुन तिला पार थकून गेल्यासारखं झालं..तिने लॅपटॉप बंद केला..पर्स उचलली आणि बाहेर पडली..

सगळीकडे गर्दीच गर्दी दिसत होती..
सणाचा आणि त्यात सुट्टीचा दिवस..म्हणजे हक्काचा खरेदीचा!
पूर्ण ट्रॅफिक जॅम झालेलं..तिने कशीबशी गाडी एका गल्लीत घातली..सुदैवाने एक जागा मिळाली आणि तिने गाडी पार्क केली..तिथून मेट्रो स्टेशन अगदीच जवळ होतं..ती चालत गेली आणि मेट्रोन घरि गेली..
घरी आल्याआल्या तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं…
खूप थकल्याने तिचा डोळा लागायला वेळ नाही लागला..



"बाबा मला भीती वात्ते पताक्यांची..मी नाइ येनार…"
"अगं बाळा मी तुला कडेवर घेतो मग तर झालं..? बघ तरी काय गम्मत असते ती..!"
"नाई..मला भीती वात्ते.."
"बरं..आवाजाचे फटाके झाले ना की मी तुला बोलावतो..मग आपण गम्मत करूया…ओके..?"
"ओके :)"


"बाबा मला नवीन फॉक!"

"आई मला पण तुझ्यासारखी साडी हवी!"

"बाबा मी मोठी होऊन डॉक्टर होणार"

"आई माझी पोळी तुझ्यासारखी गोssssल"

"दादा मी तुला माझे फटाके देते तू मला तुझा लाडू देशील..?"

"काका मी शाळेत फर्स्ट आले! हे बघा!! आणि बाबांनी मला भरपूर  नवीन पुस्तकं घेतली..ही बघा!"

"बाबा मला खूप कन्फ्युज व्हायला झालंय ओ..फक्त चांगले टक्के मिळाले म्हणून सगळे म्हणतात सायन्सला जा..मी काय करू..?"

"आई..आईंग..ऐक ना माझं..मला तो शॉर्ट ड्रेस घेऊ दे ना प्लिज..अगं कॉलेज मध्ये प्रॉम नाईट आहे..मी काय साधे कपडे घालून जाऊ का..?"

"बाबा प्लिज..तुम्ही तुमचे ऑर्थोडॉक्स विचार माझ्यावर लादू नका..त्यात काय होतं एवढं ग्रुप बरोबर गोव्याला जायला..?"

"मला लगेच जॉब नाही करायचा..मला शिकायचं पण नाहीये आणखी. मला काहीतरी वेगळं करायचंय. Just Give me a break."

"सहा महिने आधी भेटलेला मुलगा तुमच्याहून प्रिय झालाय म्हणता ना.? मग ते का याची कारणं शोधा ना..तुम्ही त्याला न भेटताच निर्णय देऊन टाकला..?"

"मी बघेन माझं. हवंतर कॉल सेन्टर मधे काम करून देईन घरखर्चाला पैसे."

"आत्या प्लिज. मला लग्न करायचं असेल तर ते मी ठरवेन. तुम्ही त्यात नाक खुपसायची गरज नाही"

"मला नोकरी मिळाली आहे. नाईट शिफ्ट असणारे. ऑफिसजवळ हॉस्टेल बघितलं आहे. तिकडे शिफ्ट होणार आहे. पैसे पाठवीन."

"दादा तू काय मध्यस्ती करायला आलायस का..?
त्यांना नकोयत ना माझे पैसे..नका घेऊ म्हणावं. पण सांग त्यांना कष्टानेच कमावलेले आहेत. आणि एकदाच सांगत्ये. मी पुन्हा घरी येणार नाही."


"तुझ्यासाठी घर सोडलं आणि तू आता ही नाटकं करतोयस..? मी स्वतंत्र आहे आणि खमकी आहे लक्षात ठेव. Get lost"


"काका, घरी सांग..मला सौदीला जॉब मिळाला आहे. तिकडे जाणारे पुढच्या आठवड्यात."


"Neil please listen to me. I am very clear about this. I love you, but I don't owe you anything. Let's be happy the way we are."


"Look Ali, My family is my very personal matter. You need not interfere...get out of here Now!"


"Congratulations on the promotion Miss. Avisha…well.. That's a unique name..what does that mean by the way..?" ….. "It means.. God's gift!" "Oh..is it..? You must be so special to your parents!"


"Hey, we're hosting a small party for all the people who are promoted, please bring your family along!"


""मॅडम आप ये त्योहार को भी काम करती है, आपका परिवार नाराज नही होता..?"

पडल्यापडल्याच तिची अस्वस्थ हालचाल झाली..
तिने डोळे किलकिले केले..प्रकाशाचा भपका आला एकदम..तिने तसेच ते मिटून घेतले..

"पण माझ्या खोलीत एवढा उजेड कसा..? इथे तर खिडकीसमोर बिल्डिंग आहे....
मी कुठे आहे ….?"

तिने पुन्हा डोळे किलकिले करण्याचा प्रयत्न केला..
आता ती त्या उजेडाला थोडी सरावली..

कोणीच नव्हतं खोलीत..
तिच्या अंगावर निळे कपडे..
शेजारी भरपूर मशीन…


ती काही वेळ तशीच पडून राहिली..
भोवळ आल्यासारखं होतं होतं..
पाणी..
पाणी…
तेवढ्यात एक नर्स आत आली..

तिने डॉक्टरांना बोलावलं..

त्यांनी तिला तपासलं..

"Better!..So Avisha...many questions right? I'll answer all of them, but you need to take this medication and rest for another hour! See you!"

तिने गोळी घेतली..तिला पुन्हा गाढ झोप लागली..
जाग आली तेव्हा शेजारी सारा बसलेली..
"सारा मी ईकडे कशी आले.? काय झालंय मला.?"

"Nothing serious. थोडा ताप होता..कमलबाई सकाळी आल्या तेव्हा तुला उठवायचा प्रयत्न केला, पण खूप ताप होता..तू शुद्धीत नव्हतीस.."

"How's the patient?!"

"Doctor…मला काय झालंय..? खरं सांगा प्लिज..मला खरंच ताप होता का.? असा अचानक ताप येऊन माणूस बेशुद्ध  होऊ शकतो का..?"

"Okay..nothing to worry about now, it's a fact that you just survived a minor stroke."

"What??"

"Yes. Now you have to be very careful about your health."

"But how???"

"There can be various reasons, but the major one I see is the stress factor. Get some leave and rest."

"Okay Doc."

----------------------

"परत असं वाटतं लहानशी पिहू होऊन बाबांच्या कडेवर बसावं...आणि रात्री आईच्या कुशीत शिरुन गाढ झोपावं..निर्धास्त…."
(टाळ्यांचा कडकडाट)

"Thank you..thank you everyone."

"So Miss.Avisha तुम्हाला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली..?"

"माझ्या स्वतःच्या आयुष्यातून.."

"म्हणजे..? हे तुमचं आत्मचरित्र आहे का..?"

"नाही..अगदीच तसं नाही..पण माझ्या आयुष्याशी खूप साम्य आहे. वयाच्या ४०व्या वर्षी…I…I suffered a minor stroke..त्या दिवसापासून मी आयुष्याचा खूप बारकाईने विचार करु लागले..आणि त्यातूनच "God's Gift" ची निर्मिती झाली…"

"आज तुमच्या पहिल्या वहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा आहे..पण तुमच्या घरचं कुणीच दिसत नाही..?"

"दोन वर्षांपूर्वी तुम्ही मला हा प्रश्न विचारला असतात तर मी खूप चिडले असते. But now, I accept my mistakes.
मी एक चांगली मुलगी, बहीण होऊ नाही शकले..आणि जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा परत फिरुन जायला कुणी उरलेलं नव्हतं..एक मोठा भाऊ आहे मुंबईत..पण त्याच्याशी काहीच संपर्क नाही..म्हणून मनात जे काही मोकळं करायचं होतं, ते या पुस्तकातून केलेलं आहे..I hope ते पोहोचेल..Thank you all of you for being here. Thank you."


"Excuse me..तुम्ही माझ्याबरोबर घरी याल का..?"

"Sorry..?"

"आत्या …मी…कैवल्य…तुझ्या अनय दादाचा मुलगा"

"तू खरं संगतोयस..? कसा आहे दादा..? कुठे असता तुम्ही सगळे..? आणि आल्या आल्याच का नाही भेटलास मला..?"

"मुंबईलाच असतो सगळे. मी जर्नलिजम करतोय. असाईनमेंट आहे सांगून आलो. खरंतर फक्त तुम्हाला बघून निघून जाणार होतो..कुतूहल होतं थोडं..कारण तुमच्याविषयी फारसं चांगलं मत नव्हतं कुणाचंच..पण बाबांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर..मी विचित्र वागलो की नेहेमी म्हणायचे..माझ्यावर कृपा कर आणि तुझ्या आत्यासारखा वागू नकोस..त्याच्या डोळ्यात एक वेगळीच दुखरी जखम आजही दिसते मला..पण आज तुम्ही बोललात ते ऐकलं आणि वाटलं प्रत्येकाला एक संधी मिळायला हवी ना..?"

तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला…जमा होणारे अश्रू पापणीआड बंद केले…आणि मनात म्हणाली

"दादा…मी येत्ये रे…."

©कांचन लेले

Image Source - Internet

Thursday 25 July 2019

पहिलं वहिलं!

टिंग टॉंग..
नील पसाऱ्यातून वाट काढत दारापर्यंत पोहोचतो आणि दरवाजा उघडतो!
कस्तुरी - Surprise!
नील - ये बात!! काय वेळेवर आलीस म्हणून सांगू! मी विचारच करत होतो आता हा पसारा कसा आवरावा!
कस्तुरी - शहाणाच आहेस! मी एवढ्या लांबून तुला surprise द्यायला आले तर तुला पसाऱ्याचं पडलंय! लोकं होणाऱ्या बायकोला फुलासारखं जपतात..आणि तू..?
नील - छे छे.. तू काही आवरु नकोस..मदत कर आपली थोडीशी! हे एवढं शिफ्टिगचं काम झालं की जपेन हा तुला फुलासारखी!
कस्तुरी - बघूया हा! आत्ता आधी हा गोंधळ आवरुया! तरी सांगत होते movers and packers कडे देऊ..ते सगळं करतात नीट!
नील - सामान उचलायला बोलावलंच आहे की त्यांना उद्या! पण त्यांना कसं कळणार कुठल्या आठवणी एकत्र ठेवायच्या आणि कुठल्या वेगळ्या आणि कुठल्या मागे सोडून जायच्या.?
कस्तुरी - बरं बाबा..हरले! पण हे मात्र खरं हा..प्रत्येक वस्तूत एक आठवण दडलेली असते! ह्या घरात राहून सुद्धा आता ५ वर्षं होतील ना तुला..?
नील - हो..४ वर्षं १० महिने आणि १३ दिवस!
कस्तुरी - Yes Mr. Perfectionist!
नील - खूप आठवणी आहेत ह्या घरात सुद्धा! पहिल्यांदा एकटं रहायचा अनुभव इथूनच घेतला मी..तेव्हा ५ जण एकत्र रहायचो..मग एक एक कमी होत गेले..आणि नंतर मी नवीन लोकं शोधली सुद्धा नाही..आधी बरोबर मित्र असलेले आवडायचे..आणि एकट्याला परवडणं सुद्धा शक्य नव्हतं..नंतर एकटं रहाणं आवडू लागलं आणि सेटल झाल्यामुळे परवडू लागलं!
कस्तुरी - या शहरात एक जादू आहे असं वाटतं! मी तर लहानपणापासून सांगलीतच होते..त्यामुळे असं शहरात एकदम वेगळं वाटतं! पण मावशीकडे यायचे तेव्हा नेहेमी वाटायचं आपण इकडेच यावं रहायला!
नील - आणि मग तुझं स्वप्न पूर्ण करायला मी तुझ्या आयुष्यात आलो!
कस्तुरी - आवरा..तू काही आला नाहीस, मीच आणलं तुला!
नील - अगंsss परत तेच!! मी खरंच नव्हतं reject केलं बाई तुझं proposal..चुकून झालेलं! आता आयुष्यभर हे ऐकावं लागतंय मला!
कस्तुरी - लागणारच..किती हिरमोड झालेला माझा! पूर्ण वचपा काढणारे!
नील - ते काय ते लग्न झाल्यावर काढ..आत्ता जरा चहा टाक ना! आई केव्हाही येईल त्याच्या आत मला हे अवरायचंय!!
कस्तुरी - कर सुरवात..आलेच मी!
नील - ए कस्तु! हे बघ…माझं पहिलं गोल्ड मेडल! कशात मिळालेलं माहित्ये का..?
कस्तुरी - कशात रे..?
नील - चमचा लिंबू! हीही..पण तरी मला ते सगळ्यात प्रिय आहे कारण ते पहिलं आहे!!
कस्तुरी - हो..हे मात्र खरं हा..आयुष्यात येणाऱ्या सगळ्या पहिल्या गोष्टी खूप स्पेशल असतात! जसा तू आहेस माझ्यासाठी!! My first love!
नील तिच्याकडे बघून हसतो..आणि पुन्हा वस्तू बघण्यात मग्न होतो!
कस्तुरी - तू same here म्हणाला नाहीस..म्हणजे काहीतरी आहे जे मला माहित नाही! हो ना नील..?!
नील - अगदी तसंच काही नाही..पण हो..तुझा अंदाज खरा आहे!
कस्तुरी - मग सांगणार नाहीस मला..?
नील  - अगं खूप सांगण्यासारखं काहीच नाही..होती एक मुलगी..मला वाटायचं माझं प्रेम आहे तिच्यावर! तेव्हा कुठे प्रेम-आकर्षण यातला फरक कळत असतो..
कस्तुरी - मग..? तिचं पण होतं प्रेम तुझ्यावर..?
नील - अगदी typical बायको झालीयेस की तू!
कस्तुरी - हो का..? जा..नको सांगूस मग. विचारणार सुद्धा नाही पुन्हा काही.
नील - झाला नाकाचा शेंडा लाल! इकडे बघ..गंमत दाखवतो तुला! पण हसायचं नाही हा..नाहीतर खरंच नाही सांगणार!
कस्तुरी - हे काय आहे..?
नील - निलराजे यांनी आयुष्यात पहिल्यांदा लिहिलेलं प्रेमपत्र! जे आजवर त्यांच्याकडेच आहे! आणि दुसरं तुझ्याकडे आहे! :)
कस्तुरी - म्हणजे..? तू दिलंच नाहीस तिला..?! नीट सांग ना मला सगळं!
नील - अगं तसे आम्ही छान मित्र होतो..मग थोडं त्यापुढे जाऊ असं वाटलं. कबुली कोणीच दिली नव्हती एकमेकांना..त्यासाठीच लिहिलेलं मी हे! आणि ते द्यायच्या आधी असाच काहीतरी विषय चाललेला ग्रुप मधे..तेव्हा पत्रांचा विषय निघाला..तर ती पटकन म्हणाली "पत्र वगैरे किती बोरिंग असतं..समोर येऊन बोलावं हवं ते..पत्र काय लिहीत बसतात डरपोक!"
कस्तुरी - आणि म्हणून तू हे पत्र दिलंच नाहीस तिला..?
नील - अर्थात..काय उपयोग झाला असता..? मैत्री पण गेली असती आणि प्रेम वगैरे तर प्रश्नच नव्हता!
कस्तुरी - अरे पण कदाचित तू दिलेलं म्हणून तिला स्पेशल वाटू शकलं असतं!
नील - नाही कस्तुरी..माझ्यासाठी पत्र म्हणजे जवळपास त्या व्यक्तीचं मन आपल्या हातात असतं.. त्या कागदाला त्या व्यक्तीचा स्पर्श असतो..ती शाई आपल्याशी बोलत असते..मधेच कुठेतरी लिहिताना पडलेलं एखादा अश्रू अक्षरं खराब करून गेलेला असतो..तो दिसल्यावर आपल्याला आणखीच भरुन येत असतं! आणि मुळात म्हणजे ते आपल्याबरोबर कायम रहातं..आयुष्यभर..
हे जर तिला कळणारच नव्हतं तर काय उपयोग ना! आणि ह्या गोष्टी आपोआपच कळाव्या लागतात गं!
कस्तुरी - तेही खरंच आहे..मला आधी वाटलं नव्हतं तू एवढा sensitive असशील..infact जरा भीती वाटायची की आपलं जमेल ना..पण तू पत्र पाठवलंस ना..तेव्हा खरंच उडून इकडे यावं आणि तुला घट्ट मिठी मारावी असं वाटलं होतं!
नील - यायचं होतंस की मग! मी किती वाट बघितली तुझी!
कस्तुरी - ओ रोमिओ! आईंचा फोन येतोय बघा!
नील - रोमिओ नाही गं..श्रावणबाळ म्हण मग ;) !
कस्तुरी - श्रावणबाळ गुणी होता म्हंटलं..आता तू जो ओरडा खाणारेस त्यावरुन तरी असं वाटत नाही!
नील - हो ना..आता काही खरं नाही माझं! तरी तुला सांगत होतो बोलण्यात वेळ वाया घालवू नको, मदत कर मला आता, येतायत ना ते अर्ध्या तासात!
कस्तुरी -  वा..म्हणजे चूक माझीच का..? आळशी आहेस तू आणि खापर माझ्यावर! जा तू त्यांना आणायला.. हे बघते मी!
नील - आम्हास आपणाकडून हीच अपेक्षा होती राणीसाहेब!
कस्तुरी - तू पाठवलेलं पत्र आठवलं म्हणून माफ आहे हे तुला! कारण मला मिळालेलं ते पहिलं वहिलं प्रेमपत्र आहे ना! तेवढंच एक काम चांगलं केलंयस आयुष्यात!
नील - चला..पहिल्यांदा नाही तर, दुसऱ्यांदा तरी पत्राने हेतू सफल झाला म्हणायचा!  ह्या घरातल्या ह्या शेवटच्या आठवणी सुद्धा स्पेशलच आहेत की गं! किती मोकळेपणाने बोललो आपण!
कस्तुरी - हो रे.. आणि आता गेला नाहीस तर शेवटचा ओरडा सुद्धा याच घरात खावा लागणारे तुला! किती स्पेशल ना!
नील - दुष्ट आहेस तू! कामं कर! येतो मी!
©कांचन लेले
Image Source - Internet

Sunday 7 July 2019

Folks-Wagon - एक सर्वांगसुंदर सांगीतिक अनुभव!


संगीत हे विश्वव्यापक आहे हे निर्विवाद सत्य आहे..
भारतीय संगीत हे विविधतेने नटलेलं, सौंदर्यपूर्ण आहे हे सुद्धा निर्विवाद सत्यच आहे..
शास्त्रीय, उप-शास्त्रीय, सुगम, लोकसंगीत व हल्ली चर्चेत असलेलं पाश्चात्य संगीत असे ठळक प्रकार बहुदा सगळ्यांना माहीत असतात.
भारतात भाषा आणि संगीत हे प्रांताप्रांताप्रमाणे बदलत जातं, तसंच प्रत्येक प्रांताच्या संगीतात वापरली जाणारी वाद्य सुद्धा बदलत जातात. प्रत्येक प्रांतात आपलं म्हणावं असं विशेष संगीत आहे आणि त्यालाच आपण लोकसंगीत असं म्हणतो, कारण ते त्या त्या लोकांचं संगीत असतं..

ह्याच लोकसंगीताचा ध्यास घेतलेला एक वेडा मुसाफ़िर म्हणजे मधुर पडवळ आणि त्याबरोबरच त्याचा अख्खा फ्लोक्सवॅगन हा बँड..ह्या ग्रुपचं नावंच मुळी "Folks-Wagon" असं ठेवलं आहे..वॅगन म्हणजे काही वस्तू इकडून तिकडे नेणारी गाडी..तसंच सगळ्या प्रांतातील सांगित रसिकांपर्यंत पोहोचवणारा यांचा हा बँड, फोक्स-वॅगन!
ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही मंडळी त्या त्या राज्यात, प्रांतात जाऊन, तिथे राहून तिथल्या कलाकारांकडून हे संगीत शिकतात, वाद्य शिकतात आणि त्यांचा निश्चय बघून तिथले लोक ही कुठेही न मिळणारी वाद्य स्वतः त्यांना देतात..
कधी ती सहज मिळतात, कधी ह्या लोकांचा विश्वास संपादन करायला वेळ लागतो, कारण कलाकाराला कायमच त्याची निष्ठा सिद्ध करायला लागते, तेव्हाच समोरच्याचा विश्वास बसत असतो!
पण जातील तिथे लोकांची मनं जिंकून घेणाऱ्या मधुर आणि त्याच्या सहकाऱ्यांबद्दल हा विशेष लेख!

नुकताच यशवंत नाट्यमंदिराला फोक्स वॅगनचा कार्यक्रम झाला, मी ऐकलेला हा फोक्सवॅगनचा चौथा कार्यक्रम!
 त्याचा आढावा घ्यावासा वाटला म्हणून हा लेख..
पडदा उघडला आणि अख्खा रंगमंच व्यापून टाकलेली वाद्य समोर आली!
डावीकडून आधी अनेक वेगवेगळी वाद्य ठेवलेली, त्या शेजारी गिटार, मागे अनेक बासऱ्या ठेवलेली एक केस, शेजारी कहोन बॉक्स व आणखी काही छोटी वाद्य, थोड्या अंतरावर तबला, शेजारी पेटी, कीबोर्ड, त्या मागे आणखी एक गिटार आणि त्या पुढे आणखी एक कहोन बॉक्स आणि एकदम कडेला अनेक पर्कशनची वाद्य..
आणि एक एक करुन हे सगळे कलाकार आपल्या स्थानावर आले..
कार्यक्रमाची सुरवात झाली "महाराज गौरीनंदना" या पारंपरिक लोक गीताने..पारंपरिक जरी असलं तरी त्याची सुंदर अरेंजमेंट करुन ते एका नव्या साजात सादर केलं गेलं...मंदार पिलवलकर याने खड्या आवाजात उत्तम सुरवात केली आणि बाकी सगळ्यांनीच त्याला उत्तम साथ दिली..गाण्याची अरेंजमेंट सुद्धा इतकी सुंदर केली आहे, की भारतीय आणि पाश्चात्य वाद्यांचा सुंदर मिलाफ प्रतयेक म्युझिक पीस मध्ये दिसून येतो..अगदी गिटारचा सुद्धा उत्तम वापर केला आहे..ढोलकी आणि बासरी तर विशेष लक्ष वेधून घेतात!
त्यानंतर सादर झालेलं "ओम-नमो" हे शंकराचं एक रॉक पद्धतीने असलेलं नमनच म्हणावं लागेल..कारण सुरवात झाली "ओम त्र्यंबकम यजामहे" या महामृत्युंजय मंत्राने, मग पुढे मधुरने त्यात काही इंग्रजी काव्य गायलं, त्याला लागून पुन्हा कैलास राणा हा श्लोक आला आणि शंकराच्या नामात ते संपलं..एक अतिशय उर्जादायक अरेंजमेंट असलेलं हे गाणं एक वेगळाच प्रभाव पाडून गेलं..सुरवातीच्या मंत्राला मंदारने लावलेला विशेष आवाज, तर मधुरच्या इंग्रजी गाण्यात दिमडीचा उत्तम वापर आणि त्याला कहोन बॉक्सची मिळालेळी उत्तम साथ आणि अर्थात गिटार आणि सुंदर कोरस याने एकूणच मजा आली! आणि विशेष म्हणजे हे फोक्स वॅगनचं स्वरचित गाणं होतं!

नंतर एका गोड बंगाली गाण्याचं सादरीकरण झालं जे बाऊल फोक मधील होतं,
मधुरने "दोतारा" हे बंगाली स्वरवाद्य तर मयुरेशने "खमुख" हे वाद्य वाजून त्यात सुंदर साज भरला!
बंगाली भाषेचा गोडवा, त्यात खुद्द बंगाली लोक संगीत, ती वाद्य आणि त्याचं खुसखुशीत सादरीकरण याने तोंड गोड न होतं तरच नवल!

 त्यानंतर आर.डी.बर्मन या महान संगीतकाराला एक ट्रिब्युट म्हणून त्यांच्या काही गाण्यांची मेडली सादर झाली..जिंदगी के सफर मे पासून सुरू झालेली ही गाडी दम मारो दम, बचना ए हसिनो, मेरी प्यारी बिंदू, या स्टेशनांवर थांबून शेवटी एक चतुर नारच्या कार शेड मध्ये जाऊन थांबली! जरी या सगळ्या चाली जुन्या असल्या, गाणी रेकॉर्ड झालेली असली, तरी प्रत्येक गाण्याच्या सादरीकरणात अनेक विविध वाद्यांचा वापर करुन, तरी मूळ गाण्याला कुठेही धक्का न लावता अतिशय सुंदर पद्धतीने ती पोहोचवली गेली!

मग हा संच वळला तो पूर्वोत्तर व उत्तरभारताकडे..आसाम आणि हिमाचल या दोन राज्यातील दोन गीत प्रकार लागोपाठ सादर झाले..आसाम मधलं शिंगांचं वाद्य मधुरने असं काही वाजवलं की सगळे बघतच राहिले...इतका दमसास!
हिमाचलचं गाणं "माइये नी मिरिये" हे एका आई आणि मुलीचा असलेला संवाद, तिन्ही मुलींनी उत्तम गायलं..त्याला एका अनोख्या तंतू-ताल वाद्याचं मिश्रण असलेल्या "रिवाना" वाद्याची साथ मधुरने दिली..
आधी आसामच्या गाण्यात शिंगाच्या वाद्याचा वापर झाल्याने ते थोडं लाऊड झालं होतं, पण त्या पाठोपाठ लगेच हे अतिशय शांत गाणं सादर झालं आणि खरंच झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर ताकाचा घोट घेतल्यावर जसं वाटतं, अगदी तसं वाटलं!
ह्या नंतर एक मूड चेंजर नंबर आला!
एका महान पियानिस्टला Chick Corea यांना ट्रीब्युट म्हणून एक गाणं झालं ज्यांचं नाव होतं "स्पेन"..ह्यात गिटार आणि पर्कशन भलताच प्रभाव पाडून गेले..
यावरुन इतकं नक्कीच सिद्ध झालं की फक्त भारतीय संगीत नाही, तर ह्या सगळ्या लोकांचा पाश्चात्य संगीताचा अभ्यास सुद्धा उत्तम आहे!

ह्या नंतर आलेली एक मेडली थोडी खेदजनक होती.
कारण सुरवातीलाच मधुरने सांगितलं ही ह्या पुढे येणारी गाणी ही बॉलिवूड मधली प्रसिद्ध गाणी आहेत, पण मुळात हे वेगवेगळ्या प्रांतातील लोक संगीत आहे, जे उचलून वापरलं आहे, पण त्या प्रांताचा, तिथल्या लोकांचा नामोल्लेख सुद्धा ह्या दिगग्ज संगीतकारांनी केलेला नाही..
ह्यातील जवळपास सगळीच गाणी प्रत्येकाच्या ओठावर असणारी होती..
अर्थात ती सादर उत्तम प्रकारे केली गेली..शेवटी निमुडा निमुडाला तर लोक नाचायचेच बाकी राहिलेले...जबरदस्त ढोलकने सुरवात झाली आणि त्यानंतर मंदार बरोबच सुजेश मेननच्या खड्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं..
 पण तरी कलेच्या क्षेत्रात हा चोरी करण्याचा पसरत चाललेला रोग, विकृतीच खरंतर, अतिशय खेदजनक आहे..

असो, पुढे एका छोट्या मध्यंतरानंतर पाच-सहा जण चोंडकं आणि त्याच जातीतील, फक्त विविध प्रांतातून आलेली वाद्य घेऊन उभे होते, त्यांच्या साथीला बासरी आणि टाळ!
ह्या सगळ्यांनी एक जबरदस्त उत्स्फूर्त जुगलबंदी सादर केली!

त्यानंतर युरोप-साऊथ अमेरिका-गोवा आणि मग रॉक अँड रोल आणि बरंच काही असं जबरदस्त, पॉवर पॅक सादरीकरण झालं..
एक छोट्या अकॉर्डियन सारखं वाद्य घेऊन मधुर ने सुरवात केली..एक मस्त मूडचा अम्मल प्रेक्षकांवर झाला आणि थेट गोव्यात येऊन पोहोचला! गोवन भाषेचे परफेक्ट उच्चार, तो मूड, लहेजा सगळं इतकं सुंदर सादर होत होतं की संपूच नये असं वाटत होतं!
त्या नंतर मयुरेशने लॅटिन अमेरिकन वाद्य "काँगा" ने अप्रतिम सुरवात केली व त्यात झिंगोsss च्या गाण्यात सगळे झिंगून गेले!
आणि मग रॉक अँड रोल ने तो नंबर संपला!

त्यानंतर या पथकाचं आगमन झालं ते थेट राजस्थानात!
 केसरीया बालमच्या आर्त स्वरात सगळे न्हाऊन निघाले...आणि मग "छाप तिलक सब छिनी रे तोसे नैना मिलैके" मध्ये रंगून गेले..सिद्धांतने हार्मोनियमच्या आधारे ते सुंदर भरुन काढलं! या सादरीकरणात विशेष लक्ष वेधलं ते "रावणहत्था" आणि "खरताल" या वाद्यांनी! शेवटी मंदारचा सरगम आणि मधुरचा खरताल वरचा आविष्कार ही जुगलबंदी सुद्धा मज्जा आणून गेली!
आणि या नंतर वेळेअभावी शेवटच्या सादरीकरणाकडे वळावं लागलं..आणि ते होतं ट्रीब्युट टू  ए.आर.रहमान!
बासरीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांनी ह्या सादरीकरणाला सुरवात झाली आणि एकसे एक अप्रतिम गाणी सादर करुन शेवट केला गेला तो "माँ तुझे सलाम" ने...हे ऐकताना डोळ्यात पाणी न येतं तरच नवल...
अवघ्या १० जणांच्या संचाने आम्हाला जगभराची सफर अवघ्या दोन-अडीच तासात घडवून आणली..
ह्यातील मला जाणवलेली काही खास वैशिष्ट्य म्हणजे, ह्यातील कोणीच, कुठल्याच गाण्याला रिकामं बसलेलं नव्हतं..
गाणारा मंदार पिलवलकर हा स्वतः उत्तम तबला वादक आहेच, त्यामुळे त्याने अनेक वाद्य वाजवली, त्याच बरोबर सुजेश मेनन जो सुरवातीला कहोन आणि हातात दिमडी व शेजारी आणखी काही वाद्य घेऊन बसलेला त्याने त्याच्या खणखणीत आवाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं..
ब्रेसिला डिसुझा, संचिता गर्गे आणि क्षितिजा जोशी ह्या अप्रतिम गायल्याच पण त्याचबरोबर तिघींनी शेकर्स आणि आणखी अशी छोटी वाद्य वाजवली..
हार्मोनियम, कीबोर्ड, pianica अशी स्वर वाद्य वाजवणारा सिद्धांत जाधव मध्येच एका गाण्याला तबला वाजवायला बसलेला दिसला!
सुरवातीच्या महाराज गौरीनंदना मधून माधुर्यपूर्ण वाजणारी बासरी शेवटपर्यंत मोहिनी घालत होती..ती वाजवणाऱ्या विक्रांत तरे ह्याच्या मागे अनेक लहान मोठ्या बासऱ्यांची केस दिसत होतीच, पण त्यानेही मध्येच दोन तीन गाण्यांना 'इवी' हे अनोखं वाद्य वाजवलं!
पर्कशन वर असणाऱ्या मयुरेश शेर्लेकरने सुरवातीच्या गाण्यालाच अप्रतिम ढोलकीने सुरवात केली, व मग ढोलक, चोंडकं, या अनेक लहान-मोठ्या भारतीय वाद्यांपासून कहोन बॉक्स, तुंबा, दरबुगा ही पाश्चात्य वाद्य सुद्धा अतिशय खुबीने वाजवली, गोव्याच्या पॅटर्नला त्याने पटकन घातलेली टोपी सुद्धा नजरेतून सुटली नाही!
ह्यातून प्रत्येक गोष्टीचा किती आनंद घेत हे सगळे सादर करतात ते दिसून येतं!
आणि मधुर बद्दल तर काय बोलावं, तो गात होता, भरपूssर वेगवेगळी वाद्य वाजवत होता पण हे सगळं करताना त्याचा स्टेजवरचा वावर विशेष लक्षात येण्यासारखा होता..
एखादी दिव्य अनुभूती झाल्यावर जसं बेभान व्हायला होतं, तसाच मधुर संपूर्ण स्टेजभर बेभान वावरत होता..निवेदकाची भूमिका सुद्धा बजावत होता, प्रेक्षकांना सतत आपल्या हातातील वाद्यांनी अचंबित व्हायला भाग पाडत होता!
आणि इंग्लिश मध्ये म्हणतात तसं Last but not the least! The most patient guy of this band!
Bass गिटार वर असणारा रोहन चवाथे..अतिशय शांतपणे, प्रसन्न मुद्रेने प्रत्येक गाण्याचा पाया भरणारा हा मुलगा! इतके सतत बदल होत असताना एका गोष्टीत स्थिर रहाणं अतिशय कठीण असतं, आणि ते त्याने उत्तम साधलं!!
आणि ह्याच बरोबर आणखी एक विशेष उल्लेख करावासा वाटतो तो ध्वनीक्षेपकाचा! कारण मी मुद्दाम कुतूहल म्हणून मोजलं तर स्टेजवर साधारण २०-२२ माईक सतत लावलेले होते..आणि शिवाय इलेक्ट्रॉनिक वाद्य! हे सगळं सांभाळाऱ्याला सलाम...कारण प्रत्येक वाद्याचा स्वभाव वेगळा, कुठल्या गाण्याला कुठलं वाद्य वाजणार, त्या क्षणी कमी जास्ती करायचा बॅलन्स..ह्यासाठी प्रचंड संयम, समयसूचकता आणि तंत्रांचं उत्तम ज्ञान या त्रिवेणीची गरज असते!

असा हा सर्वांगसुंदर फोक अनुभव, किंवा अनुभूती प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यावी हा माझा आग्रह आहे!





हे सगळे जे काम करत आहेत ते अतिशय मोठं आहे, आणि निरपेक्ष भावनेने केलेलं काम नेहेमीच थेट पोहोचतं, तसंच यांचं निर्मळ संगीत थेट हृदयाला हात घालतं!
मित्रांनो, ह्या बँडला, आपल्या संगीताला आपणच पुढे आणणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवूया..!
ह्या सगळ्यांना खूप यश मिळो..आणखी खूप नवीन सांगित प्रकार शिकायला मिळो, आणि त्यांच्यामार्फत ते आपल्याला ऐकायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Folks-Wagon च्या फेसबुक पेज आणि youtube चॅनेल च्या लिंक खाली देत आहे..नक्कीच एकदा बघा, आणि आणखी लोकांना बघायला द्या!

©कांचन लेले

Facebook Page - Folks-Wagon

https://www.facebook.com/Folks-Wagon-1426691574213698/

Youtube Channel -
https://www.youtube.com/channel/UCI0l9DZumA4ez0xsXMXTN0Q