Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Thursday 25 May 2017

दर्द


#दर्द
#यादपियाकीआए

दर्द..

'अम्मी..मै खेलने जाऊ..?!'
'साया…और तालीम कौन लेगा..?'
'अम्मी..अभी मुझे खेलने जाना है, मुमताज राह देख रही होगी..'
'फिर वापीस घर मत आना…'
साया रागातच घरात निघून गेली...
अम्मी पुन्हा स्वयंपाकात मग्न झाली..
थोड्या वेळाने दार वाजलं, अम्मीने सायाला दार उघडायला सांगितलं..
'अम्मीss सलीम चाचा और रियाझ आए है!'
अम्मी बाहेर आली..
'अरे चाचा, आओ ना..समान लगवाओ तबतक हम आते है'
'जी..'
सामान लावलं जातं, ताबला-डग्गा घेऊन चाचा बसतात..रियाझ शेजारी बसतो, साया तानपुरा काढून समोर बसते..तेवढ्यात अम्मी येते.. तानपुरा लावते आणि तो सायाकडे देते..
गाणं सुरू होतं..

याद पिया की आये..
यह दुःख सहा ना जाये- हाये राम..

बाली उमरिया सूनी री सजरिया..
जोबन बीता जाये- हाये राम..

बैरी कोयलिया कूक  सुनावे…
मुझ बिरहन का जियरा जलावे..
हाँ पी बिन रहा ना जाये.. हाये राम
याद पिया की आए…

मधे-मधे चाचा दाद देत असतात..आणि गाणं संपतं..
'आज तो कमाल कर दिया बेगम साहिबा…'
'बस, अल्लाह मेहरबान है भाईजान, पर सिर्फ आवाज पे..तकदीर तो खुदा ने ऐसी लिखी की ये दर्द अपने आप गानेमे उतरता है..'
अम्मीचा कंठ दाटून आला..चाचाने घाई घाईने मुलांना खेळायला जायला सांगितलं, सायाला तर कोण आनंद झाला..रियाझचा हात पकडून त्याला ती धावतच घेऊन गेली..

आणि ते गेल्यावर अम्मीने अश्रूंना वाट मोकळी करुन दिली..
चाचा तिला समजावत होते..शांत करत होते..शेवटी सायाकडे बघून सावरायला हवं असं सांगून त्यांनी अम्मीला शांत केलं..
आणि रात्रीच्या मैफिलीची चर्चा करुन निघाले..
खाली रियाझ आणि साया आणखी दोघांबरोबर खेळत होते..
चाचाने रियाझला हाक मारली..तो लगेच यायला निघाला पण सायाने त्याचा हात पकडला आणि चाचांना आणखी थोडा वेळ खेळुदे असं सांगू लागली..चाचाने सुद्धा रियाझला थोडाच वेळ, असं सांगून लवकर घरी यायला सांगितलं..दोघे पुन्हा खेळात मग्न झाले..

चाचाचं घराणं हे अम्मीच्या घराण्याला पिढ्यानपिढ्या साथ करत होते, चाचा ही तिसरी पिढी..आणि आता रियाझ सुद्धा मन लावून चाचांकडे शिकत होता.. सायापेक्षा ५ वर्षांनी मोठा होता..तरी दोघांची अगदी लहानपणापासून खूप छान गट्टी होती..

रात्री मैफिलीची तयारी सुरु होती, अम्मी, तिची बहीण, साया, चाचा आणि रियाझ असे सगळे पोहोचले..जुजबी बोलणं, चहा वगैरे होऊन अम्मी गायला बसली..
मैफिल रंगत होती..सायाला मधेच स्वर लावायला सांगितल्यावर तिच्या आवाजालाही दाद मिळत होती..आणि शेवटी अम्मीने 'याद पिया की आए' गायला घेतली...आणि ती खूप रंगली, अगदी लोकांचे डोळे पाणावले इतकी रंगली..

अम्मी, तिची बहीण आणि सायाला त्यांच्या घरी सोडून चाचा आणि रियाझ घरी गेले..
घरी आल्यावर राहिला मौसिनेही अम्मीचं कौतुक केलं..आणि सायाला तर बटव्यातून शगुन काढून दिला..साया खूप खूष झाली आणि झोपायला गेली..
त्या दिवसानंतर साया अम्मीकडे मन लावून शिकू लागली..रियाझ तिला साथ करु लागला..काही वर्ष गेली..दोघेही आता मोठे झाले होते..
रियाझचं शिक्षणही पूर्ण होत आलं होतं..आणि तबला वादनातही उत्तम प्रगती केली होती त्याने, आणि अशातच सायाची पहिली स्वतंत्र मैफिल करायचा योग आला..आणि अम्मीने रियाझने सायाला साथ करावी असा आग्रह धरला! झालं, ठरलं..सायाची मैफिल आणि रियाझची साथ..
आदल्या दिवशी तालीम झाली..अम्मीने सायाला काय काय गायचं ते सांगितलं, रियाझच्या साथीने ते गाऊन घेतलं..

दुसऱ्या दिवशी सगळे अगदी उत्सुकतेत होते, सायाचा उत्साह तर ओसंडून वहात होता!
आता कार्यक्रम सुरू व्हायला अगदी काही मिनिटं राहिली होती..
साया येऊन बसली, तानपुरा आधीच मिळवून ठेवलेला, तो घेतला..
उजवीकडे रियाझ साथीला बसला..
आणि सायाने डोळे बंद केले..
तिला आठवत होती अम्मीची तीच मैफिल..
शेवटी गायलेलं याद पिया की…
मागे तानपुरा वाजवताना टिपलेले प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे भाव..
काहींचे पाणावलेले डोळे...
गाणं संपल्यावर काही क्षण दाद म्हणूनच आलेली पूर्ण स्तब्धता..
आणि मग 'क्या बात है, सुभान अल्लाह, लाजवाब.. जिती रहोचे घुमलेले आवाज..
तिने मनोमन ठरवलं होतं..आज तेच सगळं ती पुन्हा उभं करणार होती.. अम्मीचं नाव रोशन करणार होती..
आणि या निग्रहानेच तिने डोळे उघडले..
स्वर लावला आणि गायला सुरवात केली..
दाद चांगलीच मिळत होती, तिचा पहिला कार्यक्रम, तसं लहान
वय आणि अम्मीची मुलगी म्हणून दाद जास्ती होती..
आवाज उत्तम होता, फिरत सुंदर होती, रागज्ञान उत्तम होतं..

आणि हळूहळू मैफिल शेवटाकडे आली..
अम्मीने तिला भैरवीतली एक बंदिश म्हणून शेवट करायला सांगितला होता..पण आयत्या वेळी सायाने 'याद पिया की आए' गाऊन शेवट करते असं जाहीर केलं..अम्मीची नाराजगी तिला दिसत होती, तिने नको अशी केलेली खुणही तिला तिरक्या नजरेने दिसली, पण तिने डोळे बंद केले आणि गायला लागली..

याद पिया की आए…

अधून मधून ती लोकांचे भाव टिपत होती..पण तिची निराशा होत होती..सगळे शांतपणे ऐकत असले, तरी त्या त्यादिवशीचे ते भाव एकाही माणसाच्या चेहऱ्यावर नव्हते..
तिने गाणं संपवलं..टाळ्याही पडल्या..
लोकांनी अम्मीकडे कौतुक केलं, तिला येऊन सांगितलं..
सगळे घरी आल्यावर चाचा म्हणाले, 'बोहोत खूब गाया बेटा, पर तुम्हारे उमर के हिसाब से गाया करो, सूर सही है, बस दर्द आना बाकी है!'
अम्मी चिडली होती..पण काहीच बोलत नव्हती..
म्हणून चाचाने दोघांना दर्ग्याला जाऊन यायला सांगितलं आणि दोघे गेले..

इकडे अम्मीने चचांना रूह अफझा दिलं..आणि दोघे गप्पा मारू लागले..अम्मी म्हणाली
'इसकी मनमानी ना करती तो कितना अच्छा होता..!'
'बच्ची है, समझ आनेमे थोडा वक्त लगेगा..खैर एक बात बतानी थी..रियाझ विलायत जा रहा है..सिखना चाहता है, मैनेभी मना नही किया..'
'ये तो बडी अच्छी बात है..बडा काबिल बनेगा रियाझ..हाए..और एक हमारी लडकी..!'
'जी ये बात तो नामंजूर है..साया बेटी बडी प्यारी है..जिसके नसीब होगी, उसका साया बन के रहेगी..नाम ही ऐसा रखा है!'
'ये सब आपके भाईजान की देन है..ये नई झिंदगी मुझे सोपकर खुद चल बसे अकेले…'
'अब मु कडवा मत करो..खुशी का दिन है, बच्चे आतेही होंगे..'

इकडे दर्ग्याला दर्शन करुन दोघे बाहेरच्या आवारात बसले..
'इतनिभी आझादी नही ले सकते..मै बेटी हू या कटपुतली..?'
'साया..जबान संभालो..'
'इतनाभी क्या गलत किया मैने..? बताओ..?'
'सयानी हो..अब्बाने कहा ना..दर्द आना बाकी है..'
'सयानी..? मोहोब्बत करते है तुमसे..'
'साया..? होश मे हो..?'
'बेशक..वही बताना था..'
'ये अभि मुमकीन नाही है..'
'क्यू..? अभि नही तो कब..?'
'कहा ना सयानी हो अभि..'
'नही..जवाब दो..अभि नही तो कब..?'
'अच्छा..? तो सुनो..जब दर्द आएगा तब..'
इतकं बोलून रियाझ त्याच्या घरी निघून गेला..
काही दिवसातच तो परदेशी गेला..
आणि सायाने त्याला हव्या असलेल्या दर्दचा पिच्छा पुरवायला सुरवात केली..दिवस रात्र रियाज करु लागली..
अशातच तिचा आवाज खराब होऊ लागला..
आणि एके दिवशी पूर्ण बंद झाला…
अम्मीने वेळोवेळी सांगितलं होतं अतिरेक वाईट..पण हिने ऐकलं नाही..
डॉक्टर, हकीम, बाबा होतील ते उपचार सुरू झाले..
साया फक्त तानपुरा घेऊन अम्मीच्या मागे बसू लागली..
उपचारांनी हळूहळू आवाज सुधारू लागला..आता बोलता येऊ लागलं..
आता मात्र तिने अम्मी सांगेल ते ऐकायचं ठरवलं..
नीट तालीम घेऊ लागली..
रियाझची खबर चाचाकडून कळायची..
त्याचंही शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीला लागला होता..
सायाचं ऐकून त्यालाही मनोमन वाईट वाटलं आणि त्यानेही अल्लाकडे दुवा मागितली, की तिचा आवाज पूर्ववत होउदे..पण या पलीकडे काहीही करण्याला तो हतबल होता..
साया आता थोडं थोडं गाऊ लागली...फार उंच आणि फार खाली गाता येत नव्हतं तिला अजून..पण मध्य सप्तकात स्वर स्थिर करायचा प्रयत्न करायची..
अम्मीबरोबर सगळ्या मैफिलींना जायची..
या काळात तिला खरं गाण्याचं आयुष्यातलं महत्व कळलं होतं..
पण ती खचली नाही..स्वतःची चूक सुधारायला झटत राहिली..
आणि हळूहळू तिच्या प्रयत्नांना चांगलंच यश मिळालं..
तिला आता बरंच पहिल्यासारखं गाता येऊ लागलं..
पण ती सध्या बाहेर कुठे गात नव्हती…
आणखी काही दिवस गेले..ह्या सगळ्यात रियाझच्या आठवणींमधून तिला आणखी स्फुरण चढत होतं..कारण तिला गाण्यात तो दर्द हवा होता…
आणि अम्मीची ५०वि सालगिराह जवळ आली..
अम्मीने एक कार्यक्रम करुन सायाला पुन्हा लोकांसमोर आणायचं ठरवलं..या सगळ्यात तिचीही खूप फरफट झाली होती..
पण त्यामुळे तिच्या हाती तिचा हिरा अगदी तावून सुलाखून पडला होता..आणि त्या हिऱ्यालाच आता जगापुढे आणायचं होतं..

दिवस जवळ येत होता..तालीम जोरात सुरू होती..
साथीला चाचा स्वतः असायचे..
रियाझ त्याच दिवशी सकाळी यायचा होता, पण हे अम्मीने आणि चाचाने सायापासून लपवून ठेवलं होतं..कारण त्या दोघांमध्ये झालेलं सगळं रियाझने हल्लीच निकाहचा विषय निघाल्यावर चाचांना सांगितलं होतं..त्यामुळे अम्मी आणि चाचा दोघेही खुश होते..
बघता बघता दिवस उजाडला..
लोकं येत होती..अम्मीला दुवा देत होती..सायालाही भेटत होती..
आणि आता सायाचं गाणं सुरू व्हायची वेळ झाली..
साया गायला बसली..
डोळे मिटले..आणि त्या दिवशीचे चाचांचे शब्द तिला आठवले..
तिने गाणं सुरू केलं..
दाद मिळत होती पण त्याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं..
तल्लीन होऊन गात होती..
आणि शेवटी तिने सरळ याद पिया की गायला घेतलं…
आज मात्र अम्मी नाराज नव्हती..
सायाने डोळे मिटून सुरवात केली..

बैरी कोयलिया कूक  सुनावे…
मुझ बिरहन का जियरा जलावे..
हाँ पी बिन रहा ना जाये.. हाये राम
याद पिया की आए…

जोबन बीता जाये- हाये राम..
याद पिया की आए…

गाणं संपलं..

सायाच्या बंद डोळ्यांमागे अश्रूंनी आडोसा धरला होता..
आणि बंद डोळ्यांमागे एक चित्रपट सुरू झाला होता..
अब्बूचं जाणं..तिची पहिली मैफिल..रियाझने दिलेला नकार..गमावून पुन्हा मिळवलेला आवाज…आणि सहज प्रश्न पडला..आवाज गमावून मिळाला..पण रियाझ..?
टाळ्यांच्या कडकडाटाने तिची तंद्री भंगली..
पुन्हा तेच सुभान अल्लाह, बोहोत खूप, जिती रहो, लाजवाबचे घुमणारे आवाज..
भरून पावलेले चेहरे..आणि पाणावलेल्या नजरेने तिच्याकडे पाहणारी अम्मी..आणि अम्मीला सावरुन धरलेला….
रियाझ….

आज सायाच्या यादला रियाझची साद मिळाली ती कायमचीच!

समाप्त

- कांचन लेले

Friday 12 May 2017

आंधळं प्रेम!

आंधळं प्रेम!

आज संध्याकाळनंतर अचानक पावसाळी वातावरण झालं..आणि काही मिनिटात विजांचा कडकडाट आणि मग जोरदार पाऊस…
पहिल्या पावसात भिजायचा नेम असल्याने पाय आपसूकच अंगणाकडे वळले..पण तेवढ्यात घरातून ओरड झाली की भिजू नको, पाऊस चांगला नाही हा!
मग जरा गती मंदावली..आणि पायऱ्यांवरूनच हात बाहेर काढले..
आणि बघितलं तर हात खरंच मातकट झाले होते..
पुन्हा निराशेने घरी आले..हात धुतले आणि बाल्कनीत पाऊस बघण्यात मग्न झाले…
मग नेमाने मातीचा गंध आला…
आकाश-धरतीच्या मिलनाचं प्रतीक असणारा…
वातावरण मातीच्या सुगंधात दरवळून गेले…
पाऊस चांगला असो किंवा वाईट,
वळीवाचा असो, धुवाधार मान्सून असो, किंवा
हल्ली भलत्याच ऋतूत बरसणार असो..
माती तितकीच आसुसून त्याचं स्वागत करते..
त्याला आपल्यात सामावून घेते..
तो आल्याच्या आनंदाने सुगंध पसरवते..
आणि आपणही ह्या अद्भुत प्रेमाचा आनंद घेत असतो,
अगदी कायम!
अशा या आगळ्या वेगळ्या नात्याने दिन ना बन जाये तरच नवल!
म्हणूनच कदाचित म्हणतात..
प्रेम आंधळं असतं! :)

- कांचन लेले

Saturday 6 May 2017

जाने तू या जाने ना..(भाग ७, शेवटचा)

जाने तू या जाने ना…?!

भाग ७ (शेवटचा)

इकडे अदिती कामात मन गुंतवायचा प्रयत्न करत होती..
पण तरी सारखी जयची आठवण येईच…कोणीतरी कॉफी घेणार का विचारलं तरी तिला जय आठवे..
आणि अशातच जयचं पत्र तिच्यापर्यंत पोहोचलं..
त्या दिवशी..घरी जायला निघता निघताच रघूने, तिथे काम करणाऱ्या स्टाफने तिच्यासाठीचं पत्र तिला दिलं...
पत्रावरचं नाव बघून तिचा विश्वासच बसला नाही..
ती तशीच स्टाफरूम मध्ये गेली आणि ते पत्र वाचायला घेतलं..
प्रत्येक शब्दागणिक तिचं मन भरुन येत होतं..
डोळे केव्हाच वाहू लागले होते…
तिने किमान चार वेळा वाचलं असेल नसेल तोच रघू पुन्हा आला आणि तिला त्या अवस्थेत बघून म्हणाला
'मॅडम..काय झालं..? तुम्ही ठीक आहात ना..?'
अदितीला पटकन कळलंच नाही तो आलेला..त्याच्या आवाजाने ती भानावर आली..
'हो…खूप दिवसांपासून ह्या पत्राची वाट बघत होते..खूप आंनद झाला वाचून..म्हणून हे अश्रू…'
'मग वांदा नाही..आत्ता फक्कड चहा आणतो बघा..'
इतकं म्हणून तो वळतो तेवढ्यात अदिती त्याला हाक मारते..
'रघू…आज चहा नको…कॉफी आण..ब्लॅक कॉफी…'
मान हलवून रघू निघून जातो…
आणि अदिती पुन्हा पत्र वाचण्यात मग्न होते…!

कम्पनी कडून जयला ग्रीन सिग्नल मिळाल्याचा मेल येतो..पण प्रोजेक्ट पूर्ण करुनच जाता येणार असतं त्यामुळे तो झपाट्याने कामाला लागतो..
एकीकडे अदितीचा विचार आणि दुसरीकडे काम..अशी दोन चकांची गाडी एकटा ओढत असतो..

इकडे अदिती घरी येते..आणि रात्री खूप वेळ विचार करत बसते..
आणि विचारांती जयच्या पत्राला उत्तर पाठवायचं नाही असा ठाम निश्चय करते…

दिवस जात असतात..
जय अगदी अदीतीसारखा होत असतो, त्याच्याही नकळत..
तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याशा करत असतो,
आवडून घेत असतो..
तिचा वेंधळेपणा आठवून स्वतःशीच हसत असतो..
तिच्या आठवणीत रात्र काढताना चहाचे कप रिकामे करत असतो..

आणि इकडे अदिती तिच्या निश्चयावर ठाम असते..
पण तिच्याही नकळत ती आतून मोहरुन गेलेली असते..

रोज अदितीच्या उत्तराची वाट बघणारा जय, दिवसेंदिवस थोडा खचत चाललेला असतो..पण हिम्मत हरत नाही..
कारण त्याचा विश्वास असतो त्याच्या प्रेमावर, त्याच्या अदितीवर..
तिला पत्र मिळालंच नसेल कदाचित..याच आशेवर तो दिवस काढत असतो..

बघता बघता निघायचा दिवस येतो,
मानस जयला आणायला येणार असतो एअरपोर्टला..
विमानात बसल्यापासून जय आणखीनच अधीर होतो..
त्याला अदितीची प्रत्येक आठवण सतावत असते..
आणि कधी एकदा भारतात पोहोचतो असं झालेलं असतं..

शेवटी एकदाची त्याची फ्लाईट लँड होते..
सगळे सोपस्कार करुन, सामान घेऊन जय बाहेर यायला निघतो..
गेटमधून बाहेर येताच समोर मानस हात करतो आणि जयला उजवीकडून बाहेर पडायला सांगतो..
जय त्या दिशेने बाहेर यायला निघतो..
गेटमधून बाहेर पडता पडता एका वायरवरुन ट्रॉली अडखळते आणि सगळ्यात वरती ठेवलेली बॅग खाली पडते..
जय ती उचलायला जातो तोवर त्याच्या हातातली बाटली घरंगळत पुढे जाते..आणि समोरच्या व्यक्तीच्या पायाशी थांबते..
दोघेही ती घ्यायला वाकतात आणि डोक्याला डोकं लागतं!
जय बघतो, हसणारी अदिती त्याच्याकडे बघत असते..
त्याचा विश्वासच बसत नाही..
दोघेही उभे रहातात…नखशिखांत एकमेकांना न्याहाळतात..
आपल्याला भास होतोय की काय असं जयला वाटत असतं..
डोळ्यांवर विश्वास बसत नसतो..
अदिती..
कडक इस्त्रीचा लॉंग कुर्ता..खाली लेग्गीन्गस..
व्यवस्थित बांधलेले केस..बारीकशी टिकली..हाताला घड्याळ
आणि उभं रहाण्याचा कॉन्फिडेंट स्टांस…
वेंधळा जय अपटूडेट अदितीला भेटत असतो..
आज त्याच्या पापण्या ओलावत असतात..
एक अपूर्ण नातं पूर्णत्वाकडे जात असतं..
आणि बॅग्राऊंडला उगच गाणं वाजल्यासारखं वाटतं…

जाने तू मेरी क्या है, जाने मै तेरा क्या था..
साथ तेरे हर पल, साथ हर लम्हा था..
जाने कैसी कशिश है, जाने कैसी खलिश है..
क्यूँ यह साँसे थमी है, आंखों में क्यूँ नमी है..
जाना दिल जाना कैसे मैंने न जाना..
के प्यार यही है, यह जाने तू या जाने ना..
जाना दिल जाना कैसे तूने न जाना..
ये प्यार ही है,
हाँ जाने तू या जाने ना…

समाप्त

- कांचन लेले

जाने तू या जाने ना...(भाग ६)

जाने तू या जाने ना…?!

भाग ६

त्याने नंबर चेक केला..हाच नंबर होता तिचा..त्याच्याकडे दुसरा नंबर नव्हता..अगदी घरचाही नाही..त्याने न राहावून मानसला फोन केला..तो झोपेतच त्याने घेतला..त्याला आदीतीबद्दल विचारताच ती शिफ्ट झाल्याचं जयला कळलं..आणि मुख्य म्हणजे ती एकटीच शिफ्ट झाली होती..कोणाला काही सांगितलं नव्हतं..नंबर बदलला होता, सोशल साईट्स वरची अकाऊंट बंद केली होती..मुग्धाशीही काही बोलली नव्हती..काहीच कळायला मार्ग नव्हता..
मुग्धाने त्याला इतकंच सांगितलं की घरुन लग्नासाठी खूप फोर्स करत होते म्हणून ती खूप डिस्टर्ब असायची तेव्हा बोलायची तिच्याशी..त्यानंतर तिला युनिव्हर्सिटीत जॉबसाठी इंटरव्ह्यू दिल्याचं सांगितलं होतं तिने..पण ती अशी तडकाफडकी निघून का गेली हे कोणालाच कळलं नाही...
जयची अवस्था अगदी केविलवाणी झाली होती..मुग्धा ही शेवटची आशा होती त्याची..
त्याने लगेच त्याच्या बॉसला फोन केला आणि परत जाण्यासंबंधी विचारलं..त्याला लगेच जाता येणार नव्हतं..एका महिन्याचा नोटीस पिरियड होता..आणि शिवाय त्याचं प्रमोशनही धोक्यात येणार होतं..पण त्याने मागचा पुढचा विचार न करता  त्याच दिवशी फॉर्मॅलिटीज् पूर्ण केल्या..आणि मग फेसबुक उघडून मुग्धाने टाकलेले फोटो बघत बसला..
अदिती कुठे असेल, काय करत असेल हे आणि असेच विचार सारखे डोक्यात येत होते…

इकडे झालं असं होतं की अदितीला लग्न करायचं नव्हतं..पण त्याचं कारणही ती घरात सांगत नव्हती..त्यामुळे घरात सारखे वाद होत होते..अशातच तिला जवळच्या शहरात युनिव्हर्सिटीमध्ये जॉब वेकन्सी असल्याचं कळलं..तिने लगेच अप्लाय केलं..इंटरव्ह्यू झाला..आणि काही दिवसातच तिला तो जॉब मिळाल्याचं कळलं..
तिने शिफ्ट व्हायचं ठरवलं..घरच्यांचा विरोध न जुमानता..
मुग्धाशी खूप दिवसात बोलणं झालं नव्हतं..तिला शिफ्ट होण्याचं काळवावं असं अदितीच्या मनात होतं, पण ते राहून गेलं..तिने रोजच्याप्रमाणे एकदा जयचं फेसबुक अकाउंट बघितलं..तिला वाटलं नेहेमीप्रमाणे जैसे थे असेल..पण त्याला टॅग केलेले..एका क्लबमधले फोटो होते…आणि त्यात त्याला खिटलेली लिसा होती..तिथे मात्र अदितीच्या सगळ्या आशा संपल्या…पार कोलमडून गेली ती मनातुन..आणि तिने रागात सगळी अकाउंट बंद करून टाकली आणि सिमकार्ड बंद केलं…आठवड्याने जायची होती ती लगेच तिसऱ्याच दिवशी निघून गेली..

इकडे जय कसेबसे दिवस रेटत होता..मुग्धाकडून ती कुठल्या शहरात गेली आणि का गेली हे त्याला कळलं होतं..पण तिचा फोन नंबर काही मिळाला नव्हता..त्याला फक्त आता तिला जाऊन भेटायचं होतं..दिवस जाता जात नव्हते आणि रात्र खायला उठत होती…
एका अशाच रात्री त्याला झोपच लागत नव्हती..तो उठला आणि डेस्क वर कागद पेन घेऊन बसला..

'प्रिय अदिती,
हे पत्र वगैरे कधीच लिहिलं नव्हतं गं..ई-मेल सुद्धा कामाचाच केला कायम..पण आज लिहावं वाटतंय..तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होते आहे पण काही दिवस तरी मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही..म्हणून शेवटी हा मार्ग..
अदिती..मी अपूर्ण आहे तुझ्याशिवाय..
माझ्या महत्वकांक्षा माझ्यासाठी कायमच महत्वाच्या होत्या..अगदी सगळ्यांपेक्षा..पण आज तसं नाहीये..मी बदललो आहे..
तुझ्यासाठी..किंबहुना..तुझ्यामुळे…
मला परत तुझ्याकडे यायचं आहे..आणि मी येणार आहे लवकरच..
फक्त तोपर्यंत खूप उशीर झाला नसेल ना गं...? अशी भीती वाटत राहते सारखी..माझी अदिती तशीच असेल ना माझ्यासाठी..? माफ करेल ना मला…?
उत्तर पठवशील मला..? मी खूप वाट बघतो आहे तुझी..
खूप बोलायचं आहे तुझ्याशी..पण मला आणखी लिहिता येत नाही..एवढं लिहिता आलं हेच खूप…
मी १४ तारखेला दुपारी १२ वाजता लॅंड होईन तिकडे..
कधी एकदा तुला बघेन असं झालं आहे…
तुझाच,
जय..'

त्याने लेटर सरळ यूनिव्हर्सिर्टीत अदितीच्या नावे पाठवलं..ती मराठीच शिकवत असणार त्यामुळे डिपार्टमेंटचं नावही घातलं..आणि आता त्याच्या हातात होत फक्त वाट बघणं..

जय लेटर पोस्ट करून आला…डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं..तो कॉफी करायला किचन मध्ये गेला..आणि स्वतःशीच हसला..मग कपाटातल्या टी बॅग्स काढल्या आणि चहा करु लागला…
तिच्या विरहाची कडू टी बॅग..
तिच्या आठवणींचा गोssड शुगर क्यूब..
तिला पुन्हा मिळवण्याच्या सकारात्मकतेची मिल्क पावडर..
आणि
तिच्या रंगात मिसळून जाण्याचं प्रतिक म्हणून पाणी…

त्याला कधीही न आवडलेला चहा आज मात्र खूपच प्रिय वाटत होता…

क्रमशः

- कांचन लेले

Friday 5 May 2017

जाने तू या जाने ना..(भाग ५)

जाने तू या जाने ना…?!

भाग ५

अदिती निघून जाते..

जयला त्याची चूक कळते..पण तोपर्यंत अदिती निघून गेलेली असते..
आणि नंतर त्याला त्याच्या चुकीपेक्षा झालेली निराशा जास्ती मोठी वाटते…म्हणून तो तिला फोन करायचा प्रयत्न करत नाही..
अदिती इतकी दुखावलेली असते की तिलाही जयशी बोलायची इच्छा होत नाही…
दिवस जात असतात..उदासिनता वाढत असते…
पण पुढाकार कोणीच घेत नाही..
मानस-मुग्धा सुद्धा युरोप टूरला निघून गेलेले असतात..
त्यामुळे त्या बाजूनेही दोघांची निराशाच होते..
बघता बघता जयच्या अमेरिकेला जायच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतात..व्हिसा मिळतो आणि अवघ्या दोन आठवड्यांनी त्याला निघावं लागणार असतं..
कामं आणि तयारी इतकी असते की त्याला बाकी कसला विचार करायला वेळच मिळत नाही…
तरीही रोज उशीवर डोकं टेकल्यावर..डोळे बंद केल्यावर फक्त आणि फक्त अदितीच समोर येते…
साधी-सरळ…गबाळी…पण हुशार…
जातिवंत सुंदर..पण त्याची जाणीवही नसलेली..
निरागस…सेन्सिटिव्ह..पण आता हट्टी वाटत असणारी..
आणि मग लगेच अमेरिकेचा नकाशा समोर येतो..
पण त्याच्या स्वप्नांचं पारडं जड ठरतं…

इकडे अदितीला माहीतही नसतं जय इतक्या लगेच जाणार आहे..
तिने आधी त्याला साफ विसरून जायचं असंच ठरवलेलं असतं..
पण तिलाही रोज एकदातरी प्रकर्षाने जयची आठवण येतच असते…
मग ती पुन्हा विचार करायचा असं ठरवते…
आपण खूप तडकाफडकी निर्णय घेतला असं तिला उगच वाटून जातं..
ती त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करु लागते
आणि दुसऱ्याच दिवशी जयचा मेसेज येतो..

'USला निघालो आहे..एअरपोर्टवर आहे..
Miss you..'
अदितीचा विश्वासच बसत नाही..तिला त्या क्षणी धावत जावंसं वाटत असतं..पण अंगात त्राणच उरलेले नसतात..
'Have a safe flight..'
इतकाच रिप्लाय ती कसाबसा करते..आणि फोन बंद करुन टाकते..
तिचा इतका कोरडा रिप्लाय बघून जयला खूप आश्चर्य वाटतं..आणि रागही येतो..आता मात्र तो तिला विसरायचं असं पक्क ठरवतो…
तसंच डोकं सीटवर टेकवतो..डोळे मिटून घेतो..
आणि फ्लाईट take off होते….

अदिती रात्री दचकून उठते…
फोन शोधते..तो अजूनही स्विच ऑफ असतो..
चेहरा ओढल्यासारखा वाटत असतो..उशी अजूनही ओली असते..
ती घाई घाई फोन सुरू करते..
तो सुरू होईपर्यंतही तिला धीर धरवत नाही..
सारखं वाटत असतं हे सगळं स्वप्नच असेल..त्याचा असा कुठलाही मेसेज आपल्याला आला नसेल..आणि तो कुठेही गेला नसेल..
तिच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तिचा फोन सुरू होतो..
ती मेसेज बॉक्स चेक करते…त्याचा मेसेज अजूनही तसाच असतो..
आणि 'miss you too' असा मेसेज तिच्या drafts मध्येच खितपत पडलेला असतो..
ती पुन्हा अंथरुणावर अंग टाकते…आता अश्रूही कोरडे झालेले असतात..

इकडे जयचं फ्लाईट Dallas airport ला लॅन्ड होतं..
त्याला आता सेटल होईपर्यंत दुसरा विचार करणं शक्य नसतं..त्यात जेट लॅगमुळे काही सुचत नसतं..त्यामुळे तो मनातले विचार दाबून ठेवतो आणि अपार्टमेंटवर जाऊन बेडवर अंग झोकून देतो…

इकडे अदिती पुन्हा रुटीन प्रमाणे काम करायला लागते..तिच्यात झालेला बदल सगळ्यांनाच जाणवत असतो..पण अजून कोणालाही कारण कळलेलं नसतं…
तिकडे जयसुद्धा कामाला लागतो..नवीन ओळखी होत असतात..तिथली कामाची पद्धत समजून घेत असतो..आणि बदललेल्या वेळेशी जुळवून घेत असतो...
दोघांनीही कामात इतकं जुंपून घेतलं  असतं स्वतःला की बाकी काही विचार करायला वेळच मिळत नाही त्यांना..
त्यातच अदितीच्या घरुन लग्नासाठी स्थळं बघणं सुरू होतं...तिच्यावर कोणी जबरदस्ती करत नसतं, पण एकदा भेटण्याचा आग्रह मात्र खूप असतो..पण अदिती ठाम नकार देते..ती कोणाचंच ऐकत नाही...ह्यावरुन रोज घरात कटकटी सुरू झालेल्या असतात..आणि अदिती आणखी एकटी पडत जाते...

इकडे जयचा मित्रपरिवार वाढत असतो..वीकएंडला क्लबिंग आणि पार्टी जोरदार सुरू असतात...तो थोडा का होईना पण दारूचा आधार घेत असतो तिला विसरायला..
एका अशाच पार्टीत तो एका बाजूला ड्रिंक्स घेत बसला असतो..तेवढ्यात एक मुलगी त्याच्या शेजारी येऊन बसते..
ड्रिंक्स ऑर्डर करते आणि बोलायला लागते..ती त्याच्या एका कलीगची मैत्रीण असते..लिसा..ती जवळच्याच दुसऱ्या शहरात रहात असते..क्लब मध्ये असल्याने बोलणं थोडच होतं..पण डान्स भरपूर होतो..आणि पुढच्याच्या पुढच्या वीकएंडला भेटायचं नक्की करून ती त्याचा निरोप घेते..जवळपास रोजच दोघांची फोनाफोनी किंवा मेसेजवर बोलणं सुरू होतं..जवळीक वाढत असते…आणि आता भेटीला एकच दिवस राहिला असतो....
जयसुद्धा खुश असतो...त्यादिवशी तो खूप दिवसांनी सहज फेसबुक चाळायला घेतो.. मुग्धाने त्यांच्या लग्नातले फोटो टाकलेले असतात...सुंदर आलेले असतात फोटो..अदिती खूप सुंदर दिसत असते…त्याचं मन पुन्हा त्या आठवणींमध्ये रमू लागतं..
अदितीचा फोटो बघत तो सगळ्या आठवणी ताज्या करत असतो.. इतक्यात फोनवर लिसाचा फोटो फ्लॅश होतो..तिचा फोन आलेला असतो...
दोन क्षण त्याला खूप विचित्र वाटतं..तो फोन सायलेंट करून बाजूला ठेऊन देतो..त्याला खूप अस्वस्थ वाटत असतं...
सगळा अंधार दिसत असतो…
फक्त अंधार….

जयला जाग येते ती सकाळी दार वाजवण्याच्या आवाजाने…तो खडबडून उठतो..काही आठवत नसतं..
डोकं जड झालेलं असतं..शेजारी रिकामी बाटली पडलेली असते..खाली ग्लास फुटलेला असतो..तो तिरमिरतच दाराकडे जातो...डोळे चोळत दार उघडतो तर समोर लिसा..त्याला काही कळायच्या आत ती त्याला मिठी मारते…दोन क्षण त्याला सावरायला लागतात..आणि मग त्याला काल झालेल्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात..
अदिती आठवते..तिच्या आठवणीत रमलेला तो आठवतो..
मग लिसाचा आलेला फोन, अचानक वाटलेली हुरहूर, अस्वस्थता..
आणि ते सगळं पचवायला घेतलेल्या ड्रिंक्स…तरी अदितीचा चेहरा डोळ्यासमोरुन हलत नाही म्हणून केलेली आदळ-आपट..आणि मग थकून अश्रूंच्या साहाय्याने आलेली झोप….

लिसा अजूनही मिठीतच असते…तो एकदम तिला दूर लोटतो…आणि जायला सांगतो…कसंबसं सॉरी म्हणतो, पण ती आल्यापावली रागातच निघून जाते..तो दार लावतो आणि तिथेच मटकन खाली बसतो…त्याला सगळंच असहाय्य होत असतं..तो तसाच उठतो आणि फोन शोधु लागतो..फोन मिळताच तो लगेच अदितीचा नंबर लावतो..
काही क्षणांनी समोरून आवाज येतो…
'The number you have dialled is currently not in service.'

क्रमशः

- कांचन लेले