Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Wednesday 8 April 2020

खम्माघणी राजस्थान - भाग ५!

भाग ५
आम्ही पहाटे जोधपूरला पोहोचलो,
स्टेशहून झोस्टेलला जायला ओला केली होती, ती सुद्धा वेळेत आली आणि आम्ही मार्गस्थ झालो..
भल्या पहाटे कुठलंही शहर सारखंच दिसत असावं…untouched beauty म्हणतात तसं!
बऱ्याच गल्या गल्या असणाऱ्या भागात आम्ही पोहोचलो आणि  एका जागी द्रायव्हरने गाडी थांबवली, आणि पुढे गाडी जाणार नाही सांगितलं…झालं, मग आम्ही आणि बॅग्स असं पायी झोस्टेलकडे..तसं अगदीच जवळ होतं ते, एका गल्लीत शिरुन पुन्हा लगेच डावीकडे गेलं की समोरच…पण तेवढ्या वेळात आमच्या ट्रॉली बॅग्सचा जो काही आवाज होत होता त्याने सगळी वस्ती जागी होते की काय असं वाटलं!
तर एकदाचे आम्ही पोहोचलो, झोस्टेल या चेन ची खासीयतच आहे ते म्हणजे त्यांचं इंटिरियर, ब्राईट vibrant कलर वापरून, आणि authentic वस्तूंनी सजवलेली जागा कोणाला आवडणार नाही!
तर आत गेलो, पण मानून कुणी दिसेना, साधारण सहा वाजले होते आणि त्यात दिवस थंडीचे..खरंतर अशात कुणाची झोप मोडायचं पातकच लागत असणार, व काय करणार..पर्याय नव्हता मग आवाज देऊन, टेबल बडवून, त्यानेही काही होईना म्हणून फोन करुन थोड्या वेळाने कुठून तरी एका माणसाचा आवाज आला, आणि मग तो साक्षात प्रगट झाला..जवळजवळ फक्त एक सेंटीमीटर डोळे उघडून आमच्यासमोर उभा होता तो मुलगा!
तर सगळं त्याला सांगितल्यावर मग त्याने नाव लिहून एन्ट्री केली, पण आमचे बेड अजून occupied होते..आधीच्या लोकांनी चेक आऊट केल्याशिवाय आम्हाला ते मिळणार नव्हते..मग आमच्या बॅग्स लॉकर रुम मध्ये ठेऊन त्याने आम्हाला कॉमन रुम कुठे आहे ते सांगितलं..तिथे जाऊन आम्ही सकाळ होईपर्यंत ताणून द्यायचं ठरवलं! 
झोस्टेल मध्ये ही एक उत्तम सोय आहे, कॉमन रूम्सचा खूप फायदा होतो, असं लवकर चेक इन, चेक आऊट असेल तर खूपच फायदा होतो! आणि व्यवस्था पण सगळी उत्तम असते, दोन-चार माणसं झोपतील अशी सोय बऱ्याच झोस्टल्स मध्ये असते..
तर सकाळी उठलो, आमच्या रुम रिकाम्या झाल्या होत्या पण क्लिनिंग व्हायचं होतं..मग बाहेर कुठे न जाता आम्ही कॉमन रुमच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या कॅफे मध्ये जाऊन आधी नाश्ता करायचं ठरवलं..
आणि वरती जाऊन बघतो तर अजस्त्र मेहरानगड किल्ल्याचा जबराट view तिथून दिसत होता!!
मग तो view डोळ्यात साठवत आलू पराठा आणि चॉकलेट मिल्कशेक घेऊन आम्ही पटकन आवरायला गेलो!
आवरुन आम्ही बाहेर पडलो ते थेट मेहरानगड बघायला..
तिथे पोहोचलो, एन्ट्री तिकीट आहे, ते काढलं आणि पुढे guide घ्यायची सोय आहे..एर्वीच फिरणारे गाईड, गव्हर्नमेंट गाईड, किंवा त्याहून भन्नाट आणि खिशाला परवडणारा उत्तम पर्याय म्हणजे Audio Guide!
हे एक छोटं यंत्र असतं,  कॉर्डलेस फोन दिसतो तसं दिसणारं, आणि त्याबरोबर हेडफोन्स दिले जातात, (आपल्याला हवी असलेली भाषा सांगितल्यावर ती फीड केलेला audio guide ते देतात)
तर त्याची यंत्रणा अशी आहे की ज्या स्पॉटची माहिती त्यात दिलेली असते, त्या स्पॉटवर सूचक फलक लावलेला असतो आणि त्यावर नंबर लिहिलेला असतो, त्यावरुन आपण ओळखुही शकतो, आणि एखाद-दोन जागा skip केल्या तर थेट आहोत तिथे उडी मारू शकतो!
तर असा हा ऑडिओ guide आणि आम्ही दोघी असल्याने दोन headphones घेऊन आम्ही किल्ल्यात प्रवेश केला!
आधी म्हंटल्या प्रमाणेच हा किल्ला अजस्त्र आहे!
पण व्यवस्था इतकी सुंदर केलेली आहे की कुठेही हरवल्यासारखं वाटत नाही!
आत प्रवेश करते झाल्यावर वाजंत्री अगदी राज पोशाखात बसलेले असतात आपले कान तृप्त करायला!
पुढे आत गेल्यावर वेगवेगळं विभाजन केलेलं आहे..राजांचे महल आणि बाकी वस्तुसंग्रहालय वेगळं..दोन्ही अतिशय बघण्यासारखं आहे, (मी इथे खूप तपशील दिसणार नाही, कारण तो तुम्ही तिथे जाऊनच अनुभवावा असं वाटतं!)
आत महालात सुंदर कचकाम केलेलं दालन आहे, त्याचा हा फोटो!
तसंच सोनेरी नक्षीकाम असलेलं दालन, राजाचा महल, राणीचा महल असे अनेक भाग अगदी बघण्यासारखे आहेत..त्या व्यतिरिक्त इतर दालनात काही विविध कलाकारांना आश्रय दिला आहे!
तर वस्तू संग्रहालय अतिशय उत्तम नियोजित आहे, सगळ्या वस्तू काचांमध्ये बंद, आणि त्यातच त्याची माहिती दिलेली आहे..विविध शास्त्र उत्तमपणे showcase केलेली आहेत!
अनेक वस्तूंमध्ये अगदी अत्तराच्या बाटल्या, हुक्का पात्र, जुनी स्वयंपाकाची भांडी, पानदान, चिलीम इत्यादी इत्यादी..किती वस्तूंची नावं घ्यावी..?
आणि सगळं बहुतेक करुन चांदीचं आहे!
१९व्या शतकातील राजपेहराव सुद्धा एका काचेच्या पेटिट बंद केलेला आहे..तो पेहराव आणि त्याचा आकार बघून त्या वेळच्या लोकांची आडदांड शरीरयष्ठी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही!
त्याचबरोबर या गडाचा संपूर्ण नकाशा ही आहे!
तर वरती गेल्यावर संपूर्ण जोधपूरचं मोहक दृश्य दिसतं! जोधपूर ही Blue City मानली जाते! इथून वरुन एक भाग पूर्ण निळ्या घरांचा दिसतो..
फिरत फिरत अख्खा दिवस गेला इतका हा नितांत सुंदर किल्ला!
आम्ही खाली आलो, भूक प्रचंड लागली होती कारण जेवलोच नव्हतो, साधारण ५ वाजले असतील..खाली एक कॅफे आहे..तिथून सँडविच, कॅरॅमल क्रोसॉ, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी आणि ढोकळा असं सगळं ढोसलं, खरंतर एक चांगला नसेल तर दुसरं असावं म्हणून विविध ओरकर घेतलेले पण सगळ्याची चव अगदी उत्तम होती!
मग ते झाल्यावर आम्ही पायीच खाली जायला निघालो..५ वाजून गेले होते, आणि बाकी सगळं बऱ्यापैकी लांब होतं, मग पायी जाऊन थोडं explore करावं, थोडी लोकल खरेदी करावी आणि छान जेवून झोपावं असा प्लॅन होता!
मागच्या बाजूने पायवाट आहे खाली जायला..आम्ही तिथून चालू लागलो, खरं पाय पण दुखतच होते, पण चालत होतो..आणि थोडं पुढे गेल्यावर अगदी गोड चिवचिवाट कानी आला, आणखी पुढे गेल्यावर एका झाडावर चिमण्यांची सभाच भरली होती! चांगल्या गोल गरगरीत चिमण्या! मुंबईच्या माणसांना चिमण्यांचं फार अप्रुप! मग काही वेळ तिथे मांडा ठोकून बसलो आणि गंम्मत बघितली, काही खारु ताई पण दिसल्या, त्यांचे फोटो काढले आणि अंधार होतोय लक्षात येऊन पुढे गेलो,
खाली उतरला उतरल्या वस्तीच आहे लगेच, तिथे आधी दोन राजस्थानी पगड्या घेतल्या..आणि मग काही लोकांशी गप्पा मारत, माहिती काढत, दुकानं फिरत, आणि जेवून आम्ही झोस्टेलवर आलो, थोडं फ्रेश होऊन कॉमन रूम मध्ये जाऊन पुस्तकं चाळून शेवटी एकदा लुडो खेळून झोपी गेलो! 

क्रमशः 
©कांचन लेले