Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Thursday 12 October 2023

प्रवासाचा प्रवास...

प्रवास...


जन्माला यायच्या आधीपासून सुरु असतो तो अनेक फेऱ्यांचा प्रवास..

आईच्या पोटात आल्यापासून सुरू होतो तो जीवनाचा प्रवास...

आणि जन्म झाल्यावर सुरु होतो तो प्रवासाचा प्रवास!

माझा प्रवास सुरु झाला तो बहुतेक कोकणापासून..लहानपणी  कोकणात जाणं म्हणजे एक पर्वणीच असायची!

तेव्हा किती सहज उपलब्ध होतं सगळं...

नजर जाईल तिथवरची हिरवळ...त्यातल्याही विविध छटा..

शुद्ध हवा..लाल माती...कोसळणारा पाऊस.. तो मातीचा गंध..

आहा!

तेव्हा हे सगळं लक्षात यायचं वय नव्हतं..आता मात्र त्याचं महत्व चांगलं कळतं, पण द्यायला तेवढा वेळ कुठून आणता..?!

मुंबईसारख्या शहरात रहाणाऱ्या माणसासाठी कुठलाही निसर्गाजवळ जाणारा प्रवास म्हणजे अप्रुपच!

यातही जे "भटके" म्हणून जन्माला येतात, त्यांना लागलेलं व्यसन म्हणजे प्रवास!

मी अनेक प्रांतात थोडे थोडे दिवस जाऊन आले आहे.. सुरवात झाली ती उत्तराखंड पासून!

हरिद्वार, हृषीकेश, बद्री-केदार... आणि तिथला सगळा परिसर म्हणजे स्वर्गच जणू! त्या प्रवासाने मला जागं केलं.. 

आपल्या देशाची नवी ओळख करुन दिली.. तिथल्या निसर्गाने मोहिनी घातली.. आणि या भारत भूमीच्या सौंदर्याचं गारुड दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेलं!

मग काही भ्रमंती थांबली नाही.. 

गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी (पॉंडीचेरी), केरळ, ओरिसा अशी सर्वत्र भ्रमंतीला सुरवात झाली..

आणि आपला महाराष्ट्र तर आहेच! तो अजून पालथा घालायचाच आहे..

यातल्या काही राज्यात एका पेक्षा जास्ती वेळा जाणं झालं.. नंतर काही वेळा कामा निमित्त जाणं झालं..पण कधीच कंटाळा आला नाही... उलट जितके वेळा जाऊ, तेवढं काहीतरी नवीन गवसत जातं!

यावेळी मात्र मीच खूप प्रश्न विचारले स्वतःला..

या प्रवासाचा काय प्रवास आहे?

आपण का करतो प्रवास?

काय मिळतं त्यातून?

आनंद? सुख? समाधान? आणखी काही?

आणि तेही कुठल्या प्रकारचं?

उत्तर मिळालं खरं...

आनंद, समाधान याहीपेक्षा मिळतं ते सुख..

पण ते ना फक्त शारीरिक, ना फक्त मानसिक..

ते असतं शारीरिक-मानसिक सुखाच्या पलीकडे जाऊन आत्म्याला हात घालणारं आत्मिक सुख!

नुसतं बाहेर पडलं तरी मन आपोआप शांत होऊ लागतं..

शहरात आपण ज्या वेगाने धावतो, त्याच्या कैकपटीने आपलं मन धावत असतं!

प्रवासात जितकं रिकामं रहाता येईल तितकं रहावं..

त्या धावणाऱ्या मनाला शांत होऊ द्यावं...

फक्त श्वास घेत रहाणं एवढंच काय ते करावं!

बदलणारी हवा कानावरून गेली की डोक्यातून वाहते ती मनात साचलेल्या विचारांची दुथडी भरलेली नदी! 

वाहू द्यावं तिला..अवखळ...निरभ्र होईपर्यंत..

येतात मग वाहत अनेक प्रश्न..

अनेक आठवणी..

अनेक मनसुबे..

अनेक स्वप्न..

अनेक हिशोब..

अनेक विचार..

वाहू द्यावं त्यांना...

मधेच घ्यावे ओंजळभर विचार हातात आणि उतरवावे असे कागदावर!

पूर्वी झपाटल्यासारखी फिरायचे मी...जितके दिवस असतील तेवढ्यात पालथं घालता येईल तेवढं सगळं बघायचे..सकाळीच लवकर बाहेर पडायचं ते अगदी पाय बोलायला लागले की मगच परत यायचं!

आता मात्र त्या प्रवासाला एक ठेहराव आला आहे असं शांतपणे विचार केल्यावर जाणवतं! आता घाई नसते सगळं पालथं घालायची..

उलट वाटतं बाकी शून्य करु नये.. थोडा बॅलन्स ठेवावा, परत येण्यासाठी!

हा फरक जाणवायला लागला तो मात्र कोविड नंतर..

नोव्हेंबर २० ला ऐन कोविड मध्ये हृषीकेशला गंगेकिनारी बसताना मनात काय काय येऊन गेलं!

ती हिरवट निळी, फेसळणारी पवित्र गंगा मैय्या मनात किती साठवावी..? 

त्यावेळी घरातून निघतानाच ठरवलेलं..ही ट्रिप unplanned करायची.. अगदी सकाळ संध्याकाळ फक्त घाटावर जाऊन बसायचं.. 

आणि तसंच झालं! 

दिनक्रमच असा झाला की सकाळी उठायचं, घाटावर जायचं..

मग चालत जेवढं पालथं घालता येईल तेवढं घालायचं, पण ते नदिभोवतीच!

राम झुला ते लक्ष्मण झुला.. असा वर्तुळाचा प्रवास..

गंगेची प्रदक्षिणा!

तिथे गंगेकिनारी बसून हे उमगलं की रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडलं की ते सगळे कप्पे बंद करायचे..

मागे काय सोडून आलो आहोत, किती काम पेंडिंग आहे, घरचे काय करतायत, सोशल मीडियावर काय चाललंय, हे सगळं सगळं पुसट करायचं...

आणि करायचा फक्त प्रवास...


एकाग्र करणारा.. 

उघडे ठेवायचे कान, त्या शहराचा आवाज साठवायला!

उघडे ठेवायचे डोळे त्या शहराची प्रत्येक चौकट साठवायला!

उघडं ठेवायचं नाक त्या शहराचा गंध साठवायला!

आणि उघडं ठेवायचं मन, त्या शहराला साठवायला!

अशा प्रवासाला निघाल्यावर त्या त्या प्रांतातल्या भूमीवर पाऊल ठेवल्यापासून त्या शहराची स्वभाव वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी मन आतुर असतं!

या भूमीवर शेकडो-हजारो वर्षांपूर्वी कोण महात्मे येऊन गेले असतील..? काय कार्य करुन गेले असतील..? कधी साक्षात परमेश्वरही!

त्यांच्या पाऊलखुणा असतील का या धरततीत? त्यांचे उश्वास असतील का याच हवेत..? त्यांचे विचार असतील का आजही आचरणात..?

प्रत्येक प्रांताची एक लय असते.. 

प्रत्येक शहराचा एक गंध असतो..

आणि प्रत्येक प्रांतातील लोकांची एक ठेवण असते!

मुंबईसारख्या माणसांची भेळ असलेल्या ठिकाणी फिरताना माणसं ओळखायला हा प्रवास फार फार मदत करतो!

आणि प्रवासादरम्यान भेटलेली माणसं मात्र कायम लक्षात राहतात!

प्रत्येक शहराचे दोन भाग असतात..

एक अतिशय उच्चभ्रु..आणि एक अतिशय सामान्य..

गेल्यावर दोन्ही भागात मात्र जरुर फिरावं!

उच्चभ्रू भागात गेल्यावर दिपतात डोळे, दिसतं ते त्या शहराचं वैभव आणि सामान्य भागात गेल्यावर दीपतं ते मन.. साध्या खेडूत माणसांच्या मायेने..तिथे दिसते ती त्या शहराची संस्कृती!

एखादी अगदी साधी दिसणारी आजी जेव्हा पटकन बोटं मोडून "नजर ना लगे" म्हणते तेव्हा कोण धन्य वाटून जातं!

कोण ही बाई? तिचा माझा संबंध काय? का वाटावी तिला ही माया?

वाटणारच म्हणा, कारण माझ्या मातीतच आहे की ती! अपरंपार माया..!

प्रवासात सोबतही फार महत्वाची...ती पूरक असेल तर आनंद द्विगुणित होतो, आणि नसेल तर मात्र सगळा विचका व्हायला वेळ लागत नाही! माझ्या सुदैवाने मला कायम चांगलीच सोबत मिळाली..त्यामुळे कधी एकटं फिरण्याचा योग आला नाही. पण एकदा तरी सोलो ट्रिप करायचीच होती! ती संधी या यावर्षी आली! जाताना थोडी धाकधूक वाटत होती की करमेल का आपल्याला? काय करु आपण एकटे? पण तरी निग्रहाने गेले!

आणि गेल्यावर मात्र सगळे प्रश्न निकालात निघाले.. 

कारण सोबतीचा आनंद हा स्वतःबरोबरही मिळू शकतो..फक्त स्वतः आपलं सोबती होता आलं पाहिजे!

त्यातही एक वेगळाच आनंद असतो..

सात दिवस मी हॉस्टेल मधे राहिले..एक scooty रेंट केली आणि तेव्हाच पहिली सोलो राईड सुद्धा केली..त्याबद्दल सविस्तर पुढच्या ब्लॉग मधे लिहायचा प्रयत्न करेन!

पण एकूणच काय, निसर्गाच्या सानिध्यात असताना कुणाच्याही सोबतीची गरज पडत नाही एवढं निश्चित!

उलट आपण आणखी ओपन होत जातो.. आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करु लागतो..अगदीच कुणी क्लिक झालं की त्या अनोळखी माणसांशी सुद्धा मस्त गप्पा होतात!  त्यांचे अनुभव कळतात... आणि हॉस्टेल मधे रहाताना तर अनेक प्रांतातून अनेक प्रवास करुन आलेली लोकं भेटतात! प्रत्येकाची एक गोष्ट असतेच की.. आणि अशा माणसांच्या गोष्टींनी भरलेला प्रवास अधिक बहारदार होतो!

असेच २-४-६-७ दिवस या सगळ्याss मायेच्या पगड्याखाली जातात..

आठव्या दिवशी मात्र ओढ लागते ती घरट्याची..

तिथली माया कोण वर्णावी..? आपली माणसं ती आपलीच.. 

आणि निघायच्या दिवशी मनात सुरू होतात पुढच्या कामांचे विचार कारण एव्हाना बॅटरी फुल्ल चार्ज झालेली असते!

परतीचा प्रवास मात्र कायमच कंटाळवाणा असतो..

प्रवासाने मन भरलेलं असतं, आणि पुढचं क्षितिज खुणावत असतं...

मग कधी एकदा घर दिसतंय असं होतं..

पण थोडाफार प्रवास केल्यावरही एक मात्र खरं,

मनुष्य जन्म मिळणं भाग्याचं..

त्यात तो माझ्या भारतभूमीत मिळणं अहो भाग्याचं...

आणि त्यातही तो माझ्या महाराष्ट्राच्या भूमीत मिळणं परम भाग्याचं!!

दिल्लीहून वाराणसीला जातानाच्या प्रवासात सुरु केलेलं लिखाण,

वाराणसीच्या गंगेत बुडालेल्या विचारांची कास धरुन 

मुंबईच्या फ्लाईट मध्ये परतीच्या प्रवासात सुफळ संपूर्ण!

~ राधा ~

०९-१०-२०२३

©कांचन लेले

Saturday 24 June 2023

Butterfly.. एक तरल कथा!

Fly like a butterfly, Sting like a bee!! 
Butterfly ही मेघाच्या आयुष्याची कथा! खरंतर अशा अनेक मेघा आपल्या आसपास असतात..कधीकधी आपणच मेघा असतो.. कधी तिऱ्हाईत म्हणून तिला बघत असतो!

पण तीच कथा 80 mm च्या स्क्रिन वर दिसू शकेल हे कळायला नजरच लागते! आणि वेलणकर भगिनींना ते करेक्ट जमलेलं आहे!

एक साधी सोपी कथा घेऊन त्या भोवती मोजक्या पात्रांची गुंफण करुन सरळ सोप्या पद्धतीने केलेली कथेची मांडणी मनाला भिडून जाते.. एक दोन ठिकाणी गोष्टी खूप predictable, किंचित अति रंजित आणि सिरीयल type वाटतात. एक दोन scenes मधे अरे असं कसं झालं असंही वाटून जातं, पण कदाचित ती माध्यमाची गरज असू शकते. संगीत सुद्धा छान हलकं फुलकं झालं आहे..विशेषतः शेवटच्या sequence मधली कविता मनात रुंजी घालते..
पटकथा आणि संवाद सुंदर जमले आहेत. उगाच गृहिणीचं दुःख मांडणारं स्वगत वगैरे कुठेही येत नाही..या उलट लहान लहान पण अतिशय आशयघन संवाद उत्तम गुंफले आहेत जे तुम्हाला विचार करायला लावतात. काही ठिकाणी खूप shake होणारा कॅमेरा मात्र त्रासदायक वाटतो..त्यामागचं कारण लक्षात आलं नाही..ट्रेलर मधे दिसलेल्या बऱ्याच गोष्टी चित्रपटात मात्र दिसल्या नाहीत..
बाकी दिग्दर्शनाच्या दृष्टीने पदार्पणात एक अतिशय सुंदर कलाकृती घेऊन मीरा वेलणकर has nailed it!
अनेक ठिकाणी संवाद असू शकले असते पण ते टाळून फक्त कायिक अभिनयातून जे काही काढून घेतलं आहे कलाकारांकडून ते अप्रतिम आहे! एका सीन मधे नवरा बायको भांडत असताना येणारा सटल लाल backlight..कल्पनाच amazing आहे! नायिकेला बाकावर बसल्यावर झोप लागते आणि जाग येते तेव्हा पहिलं हबकून तिने आपल्या पिशव्या जवळ घेणं ही इतकी साधी गोष्ट पण ती मध्यमवर्गीय गृहिणीचं character इतकं चपखल उभं करते!

महेश मांजरेकर, प्रदीप वेलणकर, अभिजित साटम, बालकलाकार राधा, सोनिया परचुरे, नायिकेच्या मैत्रिणी आणि घरात कामाला येणारी बाई आssणि मधुरा वेलणकर सगळ्यांचीच कामं सुरेख जमली आहेत!

महेश मांजरेकर हे फक्त आवाजाच्या जोरावर सुद्धा बाजी मारु शकतात! काय तो आवाज..काय त्यातला माज..शोभतोच त्यांना! दुसरं कुणी हा रोल करु शकलं असतं असं वाटत नाही.
फक्त एक फार उत्तम झालं, ते म्हणजे प्रोमोशनचा लुक चित्रपटात नाहीये! हुश्श...

 प्रदीप वेलणकरांचा अभिनय नेहेमीप्रमाणेच अगदी स ह ज
...अभिजीत साटम comes as a surprise! आणि character ला अगदी चपखल बसणारं कास्टिंग..साधा सुंदर अभिनय करुन जातात. सोनिया परचुरेंनी सुद्धा character छान पकडलं आहे पण नक्कीच आणखी चांगलं वठवता आलं असतं! लहानग्या राधा धारणेचा presence खूपच सुखद आहे..अतिशय निरागस आणि गोड दिसून सुंदर अभिनय केला आहे..

आणि...

चित्रपट सुरु होतो आणि कानावर पडायला लागते मुंबई मिश्रित कोल्हापूर तडका मराठी! लहेजा सुंदर पकडला आहे..
आणि संपूर्ण चित्रपटात मधुरा वेलणकरांचा अभिनय is a treat to the eyes!! इतके बारकावे टिपले आहेत आणि फक्त चेहऱ्यावरुन दाखवले आहेत की सशक्त अभिनय म्हणजे काय हे अगदीच जाणवेल. महेश मांजरेकर जेव्हा विचारतात खेळणार का तेव्हा पटकन काहीतरीच काय म्हणत त्या टायमिंग मधे पात्राचा साधेपणा इतका सहज दाखवला आहे.. आणि चित्रपटातली  सगळ्यात सुंदर २ सेकंद म्हणजे - वाढलेला नाष्टा न करता नवरा बाहेर पडतो तेव्हाचे चेहऱ्यावरचे दाखवलेले भाव हे लाजवाब होते! थोडक्यात, प्रेमात पाडणारा अभिनय!

एकूणच अगदी साधी, आपल्या घरातली वाटावी अशी गोष्ट... कुठेही भपका नाही, अतिरंजित नाही आणि उगाच दुःख उगाळत बसणं नाही. एक सुंदर सकारात्मक कथा जी आपल्याला निखळ आनंद देते आणि नक्कीच विचार करायला लावते! नेमकी कसली कथा..? हे नक्की आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघा..Butterfly!! :)

~ राधा ~
©कांचन लेले

Friday 23 June 2023

मिलेनियल म्हणून जगताना! (Food Culture - Part 1)

मिलेनियल म्हणून जगताना!
Part 1 - Food Culture!

People born in 1981- 1996 are the best generation ever!

मीलेनियल पिढी ही या दोन सहस्त्र वर्षांमधील दुवा समजली जाते.
ज्यांनी सरलेल्या काळातील जीवनशैली काही प्रमाणात अनुभवली, आणि त्याचा पाया घेऊन ते नव्या बदलांना सामोरे जात, internet सारख्या revolutionary बदलाला सामावून घेत उभे राहिले!

पण आता या आमच्या मिलेनियल पिढीने इतकं वेगाने बदलणारं जग बघितलंय की या पुढे आलेली प्रत्येक पिढी ही ८० च्या पुढच्याच स्पीड ला धावणार आहे, नव्हे नव्हे, ती येताना याच वेगाने येणार आहे!

त्याचा प्रत्यय अलीकडे पदोपदी येत असतो. तसाच काही महिन्यांपूर्वी आला आणि म्हणून हा लेखनप्रपंच!

एका रविवारी सकाळी मी मॉर्निंग वॉकला जाऊ म्हणून निघाले असताना आई सहज म्हणाली की आज मणिजचा इडली - वडा आणतेस का नाश्त्याला?

पडत्या फळाची आज्ञा घेऊन रवाना झाले!
(मणिज म्हणजे माटुंग्याचं. आम्ही रहातो कुर्ल्याला. पण उत्साह बघा!)


त्याचं काय आहे, हिंदू कॉलनी आणि माटुंग्याच्या त्या भागाशी माझं अनेक जन्मांचं नातं आहे (असं मी समजते). आणि या जन्मातील ती कर्मभूमी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण माझी शाळा किंग जॉर्ज तिथली, आणि मग कॉलेज रुईया..
त्यामुळे तो एक मनाचा हळवा कोपरा आहे..

तर त्याबद्दल नंतर केव्हातरी लिहीन..तूर्तास मणिज कडे रवाना झाले, पोहोचले, ऑर्डर दिली तर ते मालक पार्सल म्हंटल्यावर कपाळावर एक आठी आणून म्हणाले "आधा पौना घंटा लगेगा"..जरा आश्चर्य वाटलं, पण मी म्हटलं चालेल.. तसं त्यांनी बिल केलं आणि नेहेमीच्या प्रेमssळ शैलीत "हो जाएगा तो वो वेटर देगा, पौने घंटे से पेहले मरेको पुछनेको आना नाही"..असं म्हणाले!
एरवी माझ्यासारख्या शीघ्रकोपी व्यक्तीने किमान एक रागीट लूक दिला असता..पण आता साधारण न कळत्या वयापासून धरलं तर २५ एक वर्ष इथे येत असल्याने, अगदी त्यांच्या वडिलांपासून हे गुण तसेच्या तसे आलेले बघितल्याने मला रागाऐवजी खुदकन हसूच आलं! याला दोनच वेळा अपवाद आहेत...

एकदा बरेच वर्षांपूर्वी पहिल्यांदाच जेव्हा मी एकटी मणिज मधे गेले तेव्हा मी त्या काकांना 'बीसीबेले राईस' काय असतो असं कुतूहलाने विचारलेलं तेव्हा काय आनंद झालेला त्यांना! मी ऑर्डर केला नाही तर त्यांनी का? असं विचारलं, म्हंटलं एवढा संपणार नाही मला तर हसले आणि वेटरला बोलावून छोट्या वाटीत तो द्यायला लावला.. काय तो दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा!!
नंतर निघताना कसा वाटला विचारलं, मग पुढच्यावेळी नक्की खायचा असंही सांगितलं. ज्यांनी त्या माणिज च्या काकांना बघितलंय (अनुभवलंय) त्यांना मला काय वाटलं असेल हे नक्की कळेल!

ज्यांनी नाही बघितलं, त्यांच्यासाठी हे ते काका!


आणि दुसरा प्रसंग म्हणजे अगदी अलीकडेच मी बरेच दिवसांनी गेले असताना माझा फेवरेट ऑनियन डोसा मागवला आणि काय आश्चर्य! त्या बरोबर लाल टोमॅटो चटणी पण आली! ही चटणी सगळ्यांना जमत नसते बरं..एक विशिष्ट आंबट तिखट असा बॅलन्स जमणं tricky आहे! अर्थात ती बनवायची पद्धत वेगवेगळ्या भागात वेगळी आहे.. त्यामुळे मी घाबरतच कणभर चाखून बघितली तर एकदम खास मला आवडते तशी जमली होती!
मग बिल द्यायला गेल्यावर काकांचा चौकोनी फोन मधे डोकं घातलेला चेहरा बघून सुद्धा मी म्हंटलं ये लाल चटनी देना कबसे चालू किया?
तसं त्यांनी एकदम चमकून वर बघितलं (वर बघितलं कारण त्यांची पद्धतच अशी आहे, काउंटर वर बसून फोन किंवा काहीतरी वाचन सुरू असतं..मग कस्टमर बिल आणि पैसे घेऊन आला की फक्त तेव्हढ्याकडे बघायचं, उरलेले पैसे परत द्यायचे की परत आपल्या कामात रुजू. त्या कस्टमरचं मुख दर्शन सुद्धा घ्यायचं नाही..हसणं वगैरे तर लांबच!!)

तर त्यांनी चमकून वर बघितलं आणि म्हणाले अच्छा लगा आपको? म्हंटलं एकदम मस्त था.. मग माझ्याबरोबर असलेल्या मैत्रिणीला म्हणतात कसे, ये हमारा एकदम regular customer है! पुन्हा एक ४०० volt चा धक्का..
वयाप्रमाणे बदलत असावे लोक! असो!

तर एवढा वेळ लागणं हे जरा आश्चर्यच होतं..एरवी तर पार्सल नेणाऱ्यांची लाईन लागलेली असते..तरी एवढा वेळ कधी लागला नाही..आज तर फार गर्दी सुद्धा दिसत नाही..तरी एवढा वेळ का?
मी बरेच दिवसांनी आले होते म्हणा..पण म्हटलं ठीक आहे..तिथेच उभी राहिले..
पहाते तो काय..


तिथल्या टेबल वर एक एक पार्सल येऊन थडकत होती, पण नेत कुणीच नव्हतं..मला वाटलं एखादी मोठी ऑर्डर असेल..म्हणून थांबले तिथेच..
काही वेळाने एक एक बाईकस्वार येऊ लागले..एक माणूस त्यांच्या दिमतीला..ऑर्डर नंबर वगैरे तपासून द्यायला..
आत्ता लक्षात आला झोल.. स्विगी झोमटोची एन्ट्री झालेली होती इथे..
मी मागच्या वेळी आले तोवर ही प्रगती झालेली नव्हती..

आणि सरसर नजरेसमोरून पाव शतकाचा काळ गेला..

आम्ही नुकतेच शाळेत प्रवेश घेतलेले.. आषाढी कार्तिकी सारखं १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि स्नेहसंमेलन किंवा स्पर्धांचा दिवस असं तीन-चार वेळेला माणिजची वारी नक्की असायची!
त्यातही दोन प्रकार..एक तिकडे जाऊन खायचं.. दुसरं म्हणजे घरी पार्सल घेऊन यायचं..
पहिला सोपा, दुसरा लगबगीचा!
कारण त्यासाठी सकाळी डबे शोधण्यापासून तयारी व्हायची..
आता तुम्ही म्हणाल डबे कशाला? तर चटणी आणि सांबार पार्सल न्यायला!

हो य!

तिथे जायचं, ऑर्डर द्यायची, आपले डबे द्यायचे आणि ते पार्सल घेऊन वरात घरी यायची..
कधी कधी सांड लवंड व्हायची, त्या गरमा गरम सांबाराच्या डब्याचे चटके बसायचे पण तरी साला काय अप्रूप असायचं त्याचं!

तो दिवस, ते आजचा दिवस!

रोजच्या रोज बाहेर माणसांची रांग असणाऱ्या मणिज मधे बाहेर माणसांऐवजी पार्सलचा ढीग लागलेला पाहिला आणि म्हंटलं बदल होतोय खरा!

खरंतर हे झालं तेव्हाच हे सगळे विचार वाऱ्याच्या वेगाने मनात घोंगावत होते..पण उगाच सतत आपणच म्हातारे झाल्यासारखं वाटेल असं लिखाण कशाला करा? म्हणून टाळलं!

पण परवा हा फोटो दिसला आणि म्हटलं आता लिहिलंच पाहिजे!

कुणी outdated म्हणो किंवा काहीही म्हणो...स्वीगी झोमॅटोच्या जमान्यातील millennial असताना आज सुद्धा आई म्हणाली मणिजचा इडली वडा आण तर माझे हात app कडे न जाता पावलं scooty कडे जातील एवढं नक्की..

Because everytime it's not about food,
it's about emotions too!

~ राधा ~
©कांचन लेले

Wednesday 12 April 2023

Happy 60th Birthday Wonder Woman!

आपल्या आयुष्यात सगळ्यात पहिली wonder woman येते ती म्हणजे आपली आई!
आणि आज माझ्या wonder womanचा ६०वा वाढदिवस!

खरं सांगू तर असं वाटतंच नाहीये..कारण आजही तिचा कामाचा उत्साह, चेहऱ्यावरचा टवटवितपणा आणि आम्हाला लाजवेल अशी जिद्द हे सगळं अवाक करणारं आहे!

बेताच्या परिस्थितीत बर्व्यांच्या घरात झालेला जन्म..नंतर नारायणगावात ती वाढली जिथे आजोबा शेती सांभाळायचे. मूळ गावापासून लांब त्यामुळे सकाळी येणाऱ्या दुधाच्या गाडीबरोबर शाळेत जायचं..ती चुकली तर एवढ्या लांब चालत जायचं असा खडतर प्रवास!

खरंतर व्हायचं होतं डॉक्टर, पण योग्य मार्गदर्शन नाही व त्यामुळे लागतील इतके मार्क मिळाले नाहीत आणि त्यातही ओपन कॅटेगरी आणि मध्यमवर्ग म्हणजे तर जवळजवळ अशक्यच..

पण म्हणून जिद्द न हरता तिने नर्सिंग हा विषय घेऊन पुण्यात शिक्षण घेतलं..पुढे नर्स म्हणून अतिशय तन्मयतेने, सेवाभावी वृत्तीने अनेक वर्षे तिने काम केलं..पुण्यातून मुंबईत आली, नातेवाईकांकडे राहून काम केलं..
दरम्यान लग्न ठरवायची वेळ आली तेव्हा स्वतःच्या पायावर उभी असून, शासकीय नोकरी असूनही केवळ शिफ्ट ड्युटी असते आणि नर्स आहे म्हणून अनेकांनी नाकारलं सुद्धा..आणि अखेरीस बाबांशी लग्न झालं!
पुढे शिफ्ट ड्युटी सांभाळूनच आम्हा दोघींना वाढवलं.. संस्कार म्हणजे दुसरं काहीही नसून केवळ अनुकरण असतं असं माझं ठाम मत आमच्या आईला बघूनच झालं आहे..

आम्ही पोटात असताना दोघींच्याही वेळी पूर्ण ९ महिने आईने काम केलं..तेही या मुंबईत, ट्रेन ने जा ये करुन! म्हणूनच कदाचित सतत काम करत राहण्याचं आणि स्वस्थ न बसण्याचं बाळकडू आम्हाला तिथूनच मिळालं आहे! अगदी तान्ह्या असल्यापासून आमच्या कानावर पडलेली अनेक स्तोत्र आम्हाला नीट बोलता येत नव्हतं तेव्हापासून मुखोदगत आहेत.. सकाळी लागणाऱ्या रेडिओने जे उत्तम संगीत ऐकायचा कान तयार केला त्याचा फायदा आज कळतो.. आईचा आवाज फार गोड, त्या रेडिओ बरोबरच ती सुद्धा स्वयंपाक करता करता गात असायची.. आणि हे सगळं झोपेत असताना आमच्या कानावर पडत असायचं!
आमची आजी फार छान गाते, तिचा आवाज आमच्या आईकडे आलेला, पण परिस्थीतीमुळे त्याचं शिक्षण काही घेता आलं नाही...

पहाटे उठायचं, स्वयंपाक करायचा, आपला व्यायाम/प्राणायाम करायचा..आम्हाला तयार करायचं आणि कामावर जायचं अशी सगळी तारेवरची कसरत तिने आजवर हसत हसत केली.. तिला कामं चटचट पटपट केलेली आवडतात..आम्ही रेंगाळलो की फार वैतागते!

माझी मोठी बहीण पहिल्यापासूनच दिसायला गोल गोबरी काश्मीरची कळी, स्वभावाने एकदम शूर आणि पराक्रमी.. त्या अगदी उलट मी सावळी-किरकोळ अंगकाठी, एकदम तल्लख बुद्धीची पण अतिशय भित्री..
मी खूप लहान होते..प्ले ग्रुपमधे असेन. आणि आधी सांगितल्याप्रमाणे अनेक स्तोत्र/गोष्टी मुखोदगत होत्या आणि घरात छान म्हणायचो सुद्धा.. म्हणून आईने वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या तिथे नाव दिलं आणि घेऊन गेली मला. (माझी बहिण अशा स्पर्धांना जाऊन अनेक बक्षिसं घेऊन यायची हे वेगळं सांगायला नकोच!) 
माझा नंबर येईपर्यंत मी मस्त मजेत होते..स्टेजवर गेल्यावर मात्र भोकाड पसरलं..आणि असं एकदा नाही तर अनेकदा झालं. प्रत्येकवेळी फक्त ती राजगिऱ्याची चिक्की किंवा वेफर्स घेऊन परत यायचे. तरी आई आमची फार जिद्दी, कधी मला एखाद्या गोष्टीचा आमिष दाखवून तर कधी ताईला समोर बसवून अशा काय काय क्लुप्त्या करायचा प्रयत्न करायची जेणेकरुन माझी भीड चेपेल आणि शेवटी अनेक वेळा असं झाल्यावर माझी भीड चेपली आणि मी जी सुटले ती आज भारतभर एकटी सुद्धा फिरायला मागे पुढे बघत नाही! जर तेव्हा मी एकदा रडल्यावर आईने मला घरात बसवलं असतं तर ....?! विचारच भीतीदायक आहे!

त्यानंतर सिनियर kg मधे असताना मला एका वेळी ५ गोल्ड मेडल मिळाली होती! आणि त्या बक्षीस समारंभाला आई समोर बसली होती आणि आनंदाने आणि थोडं रडून असा तिचा चेहरा लाल झालेला..मला अजूनही आठवतंय तेव्हा त्या चीफ गेस्टने मला विचरलेलं why is your mother going all red? आणि स्वतःच हसल्या होत्या! तेव्हा आईचा फोटो कुणी काढला असता तर तो माझा सगळ्यात फेवरेट असता!
आमची शाळा दादरला आणि रहायला आम्ही कुर्ल्याला! अगदी लहान असताना काही पालक आलटून पालटून आणायचे-सोडायचे. उरलेला वेळ आम्हाला आमच्या आत्या सांभाळायची!
एकदा मी तिसरीत असताना शाळेच्या पहिल्या दिवशी स्कुल बस आलीच नाही..सगळी पळापळ, मग आम्ही BEST बसने गेलो..आणि नंतर त्या बस मालकाशी झालं भांडण. मग बऱ्याच पालकांनी मिळून ठरवलं की मुलं बेस्ट बस ने जातील.. ताई सातवीत, मी तिसरीत. आम्ही कुर्ला ते दादर बेस्ट बसने मजा करत जायचो! अगदी मोठे हायवे क्रॉस करणं, बस स्टॉप ते शाळा चालत जाणं असं अगदीच रुटीन झालं. आणि दुसरीकडे आमच्या वर्गातील मुलांचे पालक, किंवा त्यांना सांभाळणारे ताई-दादा असं कोण कोण त्यांची दप्तरं उचलून उंची गाड्यांतून शाळेत यायचे.
मला तर त्यानंतर कधी आई बाबा शाळेत सोडायला आल्याचं आठवतच नाही आणि जेव्हा आले असतील तेव्हा कधीच आमचं दप्तर उचलेलंही आठवत नाही. वर्षातून दोनदा पालक सभा, एकदा ओपन हाऊस आणि gathering किंवा स्पर्धेला नेण्यासाठी आले तरच!
इथे त्यांनी अमच्यावर टाकलेला विश्वास आज आयुष्यात खूप उपयोगाला येतो.. आज आमचे निर्णय आम्ही घेतो आणि ते कसेही असले, किंवा अगदी चुकले तरी आई बाबा पाठीशी ठाम उभे असतात!
ताईचा ओढा स्पोर्ट्स कडे जास्ती..माझा भराभर चिंध्या..थोडा कलेकडे आणि बरोबर स्पोर्ट्स..आमच्या दोघींच्याही आवडी जपत लागेल तिथे बरोबर येत, केव्हातरी एकट्याला सोडून पाणावलेल्या डोळ्यांनी कामाला जात हा प्रवास आईने केला.. ताई अगदी ३ वर्षांची असताना आमच्या आत्याबरोबर कोकणात आमच्या गावी महिनाभर रहायला गेली! ती तिकडे मजेत आणि आई मात्र इकडे रोज रडत! त्यानंतर मी सुद्धा थोडी मोठी झाल्यावर मे महिन्याच्या सुट्टीत जाऊ लागले. कुठल्याच वर्षी सुट्यांमध्ये आम्ही कुठली इंटरनॅशनल टूर केली नाही.. पण त्या सुट्यांमध्ये आम्हाला जे आजोळ लाभलं, तेही कोकणातलं..त्याने, तिथल्या माणसांनी, त्या मातीने काय दिलं हे आज फक्त आम्हालाच कळू शकतं! 

मला आजही आठवतं, खेळायला गेलो असताना कधी लागलं म्हणून रडत घरी आलो तर आई सुरवातीला ऐकून घ्यायची, नंतर मात्र ठणकावून सांगायची..खेळ म्हंटला की लागणारच. असं रडत बसायचं असेल तर खेळायला जायचं नाही! मग काय बोलता?
अनेक वेळा ढोपरं-कोपरं फोडून घेतली आणि आज खमक्या झालो!

खेळाच्या बाबतीत असं, तर अभ्यासाच्या बाबतीत मात्र आई अतिशय किचकट! गणिताच्या पेपर मधे २० पैकी साडे एकोणीस मिळाले तर ती सगळ्यात जास्ती ओरडायची!! का? तर साध्या चुकीमुळे अर्धा मार्क गेला. एकवेळ दोन मार्क कमी पडले असते तर चाललं असतं, पण साध्या चुकीत अर्धा मार्क गेला की आईपुढे जाताना ब्रह्मांड आठवायचं!

आम्हाला कधीही ट्युशन हा प्रकार करावाच लागला नाही कारण आईच इतका सुंदर अभ्यास घ्यायची..आणि परत बाकी सगळ्या activity सांभाळून त्या ट्युशनला वेळच उरायचा नाही!

आम्ही लहान असताना प्रवासात किंवा घरात सतत विविध विषयांवर आमच्याशी गप्पा मारत असायची.. वेगवेगळे खेळ शोधून काढून आमच्याशी खेळायची..ट्रेन / st मधे असलो की त्याच्या लयीवर गाणी म्हणायला लावायची..चांगले लेख वाचून दाखवायची..पौष्टिक पण अतिशय चविष्ट असे विविध पदार्थ करुन आम्हाला खाऊ घालायची... 
अशा विविध पैलुनी आम्हाला ती अलगद घडवत गेली आणि त्याबरोबरच स्वतःही घडत गेली.. मी नववीत असताना तिने MSc केलं आणि त्याही वयात चिकाटीने अभ्यास करुन, घर-आम्हाला सांभाळून अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण सुद्धा झाली. ती एवढ्यावरच थांबली नाही तर नंतर २०१९ साली तिने PHd पूर्ण केली आणि आज ती डॉक्टर पल्लवी लेले झाली आहे! 
माझ्या बहिणीने जेव्हा graduation नंतर Sports and Exercise या post graduate diploma साठी New Zealand ला जायचं ठरवलं तेव्हा अख्या दुनियेने वेड्यात काढलं होतं. असं कुठे फिल्ड असतं का? भारतात कुठे स्कोप आहे का? एकदा बाहेरच्या देशात गेली की परत येणारच नाही. एवढा पैसा तिथे कशाला घालायचा. इत्यादी इत्यादी. बँकेने एज्युकेशन लोन नाकारलं कारण तारण ठेवायला काही नव्हतं...पण आई बाबा खूप खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले आणि तिनेही त्यांचा विश्वास सार्थकी लावला..तिथे शिकली, नोकरी करुन लोन फेडलं आणि परत आली..नुसतं आली नाही तर आज ती भारतातली सगळ्यात उच्चशिक्षित महिला strength and conditioning कोच आहे !

आमच्या आईचा दुसरा पार्ट टाईम जॉब म्हणजे तिचं counselling सेंटर जे बारा महिने चोवीस तास खुलं असतं! आणि इथे कुठलीही वयाची, ओळखीची, हुद्याची अट नाही! नातेवाईकांपासून, क्लीग्स, विद्यार्थी, हॉस्पिटलमध्ये भेटलेले पेशन्ट, शेजार पाजारचे असं कुणीही तिला कुठल्याही वेळेला फोन करतं आणि ती अर्ध्या झोपेतून उठून सुद्धा त्यांचं ऐकून घेऊन त्यांचं समाधान करते.

मला सगळ्यात जास्ती कौतुक हे तिच्या diagnosisचं वाटतं. काय होतंय हे तिला नुसतं फोनवर जरी सांगितलं तरी एखाद्या डॉक्टरला लाजवेल असं परफेक्ट diagnosis ती करते आणि त्याचं solution सुद्धा सांगते. माझा जगातील कुठल्याही डॉक्टरपेक्षा तिच्यावर कायमच विश्वास जास्ती राहील!

नर्स म्हणून अनेक वर्षे काम केल्यावर तिचं प्रोमोशन लेक्चरर म्हणून झालं आणि ती जे जे हॉस्पिटलच्या नर्सिंग कॉलेज मध्ये शिकवू लागली. असंख्य विद्यार्थी घडवले जे आजही तिच्या संपर्कात आहेत..कुणाचं काय चाललंय, काय अडचण आहे यावर तिचं बारीक लक्ष असतं. तिची शिकवण्याची तळमळ आणि पद्धत अतिशय वाखाणण्याजोगी आहे. माझी आई म्हणून नाही, पण तिला भेटलेली प्रत्येक व्यक्ती या गोष्टीशी सहमत असेल. ती सेवानिवृत्त झाली तेव्हा तिच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून लोणावळ्याला जाऊन एक सहल वजा कार्यक्रम केला..विशेष म्हणजे त्या एका दिवसासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून तिचे सगळे विद्यार्थी आले होते!

२०१३ साली आम्ही पहिली गाडी घेतली..ती सुद्धा बाबांनी आईला ऑफिसला गाडीने सोडायचं म्हणून त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशातून घेतलेली...आमची alto 800!
पहिल्या दिवशी जेव्हा मी तिला सायन स्टेशनला सोडायला गेले तेव्हा थोडीशी घाबरुन अवघडून शेजारी बसलेली आई मला आजही आठवते. आपण कधी स्वतःची गाडी घेऊन, त्यात बसून ऑफिसला जाऊ हेच तिच्यासाठी मोठं अप्रूप होतं!
 पण तो एकच दिवस, त्यानंतर ती अतिशय आनंदाने माझ्या/ताईच्या/बाबांच्या शेजारी बसायची! आम्ही दोघी फास्ट चालवायला लागलो की बाबा जरा सावध करायचे पण आई मात्र अतिशय आनंदाने ते सगळं एन्जॉय करत असायची, आजही करते!
आम्ही दोघी कमवायला लागलो तेव्हा आमच्या डोक्यावर बसून ८०% पगार हा इन्व्हेस्ट करायला लावला तो आईने! ती कायम म्हणते मी वयाच्या २३व्या वर्षीपासून कमवायला लागले, पण कधी कुणी हे शिकवलं नाही की पैसे नुसते सेव्हिंग मधे ठेवायचे नाही तर invest करून वाढवायचे असतात! त्याचबरोबर आम्हाला कळायला लागल्यापासून एक एक महिना आमच्याकडे घरखर्चाचे पैसे देऊन तो सगळा खर्च सांभाळायला लावायची..व्यवस्थित लिहून काढायला लावायची..अगदी स्वतःला लागले तरी पैसे आमच्याकडून मागून घ्यायची. मी शाळेत असताना आईचं डेबिट कार्ड घेऊन जायचे आणि काही हजार रुपये withdraw करुन आणायचे..कुणी बरोबर नसायचं पण कधी तिने अविश्वास दाखवला नाही किंवा कुणी पाठलाग करेल, मजह्याकडून पैसे गहाळ होतील म्हणून घाबरली नाही! आम्ही दोघी शाळेत असल्यापासून फि भरणे, बँकेतले चेक लिहिणे, बिल भरणे असं सगळं करायचो..त्याचबरोबर बाजारातुन भाजी-किराणा सामान आणणे हे सुद्धा आमच्याकडे असायचं! त्यामुळे आज स्वयंपाक करण्यापासून अगदी घर/गाडी घेण्यापर्यंत कुठल्याही प्रोसेस साठी आम्ही कुणावरही अवलंबून नाही.
आम्ही दोघींनीही जेव्हा लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यात मोलाचा सल्ला आईबाबांनी दिला तो म्हणजे माणसं चांगली बघा. पैसा-अडका-घर या सगळ्या गोष्टी नंतर कमावता येतात, मुळात माणूस चांगला पाहिजे! आणि यावर आईची मुख्य अट अशी होती की गप्पा मारणारे जावई पाहिजेत! ती देवाने दोन्ही वेळी पूर्ण केली!
या सगळ्या यशात कधी हवेत न जाणं, प्रामाणिकपणे सातत्याने व जिद्दीने कष्ट करत रहाणं, कायम आपल्याला जे आणि जेवढं मिळालं आहे त्याची कदर करणं, त्यात समाधानी आणि आनंदी रहाणं, माणसांना धरुन ठेवणं, कधी कुणाला लागेल असं न बोलणं, चांगलं काम करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणं, जमेल तिथे आणि जमेल तेवढा दानधर्म करत रहाणं..हे सगळं आम्ही तिच्या आचरणातून शिकत आलो..

तिला काय आवडतं? पैसा-प्रॉपर्टी-सोनं.. असलं काहीहीही नाही! 
तिला आवडतो एक साधा मोगऱ्याचा गजरा..झाडावरून पाडलेल्या चिंचा-कैऱ्या-आवळे-करवंद...आणि चहा-फरसाण आणि मिरच्या आणि माणिजचा इडली वडा आsssणि आंबे! इतकं साधं सोपं आहे सगळं!
दोन वर्षांपूर्वी ती निवृत्त झाली..आणि त्यानंतर स्वस्थ कुठे बसवंतय? 
खरतर निवृत्त व्हायच्या आधी आणि आत्तासुद्धा अनेक लोक विविध प्रकारच्या नोकऱ्या घेऊन तिच्याकडे सतत येत असतात आणि आम्हाला मात्र त्याची धास्ती वाटते! सध्या ती नर्सिंग बोर्डात काम करते..भ्रष्टाचाराविरुद्ध अतिशय स्वच्छ आचरणाने काही प्रमाणात का होईना पण तिथेही शिस्त लावायचा तिचा प्रयत्न सुरु आहे! आणि या व्यतिरिक्त आपल्या काही विद्यार्थ्यांना आणि काही मैत्रिणींना घेऊन एक सोसायटी स्थापन केली आहे जे सगळे मिळून मेडिकल सर्जिकल नर्सिंग या विषयावर काम करतात.
 मेडिकल कॅम्प घेतात, वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्यासाठी काम करतात! आणि एक गोड तक्रार अशी की आई हल्ली आम्हा दोघींपेक्षा दोन्ही जावयांचे आणि आमच्या मनीचे लाड जास्ती करते!
येणाऱ्या आयुष्यात मात्र तिने तिला मनापासून आवडेल तेच काम तिने करावं..थोडं बाहेर पडावं, देशभर फिरावं असा माझा प्रेमळ आग्रह तिला कायमच असतो! पण आजही कुणाला मदत केल्यावर तिच्या चेहऱ्यावर असणारं समाधान आम्हाला तिला काम करु द्यायला भाग पाडतं! 
लिहिण्यासारखं इतकं आहे की जागा आणि वेळ पुरणारच नाही! म्हणून आता थांबते..
 देव तिला उत्तम आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य देवो..तिचा उत्साही आणि आनंदी चेहरा आम्हाला ऊर्जा देत राहो आणि पुढील प्रत्येक जन्मी आम्हाला हीच आई लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना! 

तिला वस्तूंचं फार अप्रूप नाही म्हणून आजच्या वाढदिवसासाठी हा लेख हीच तिला भेट! :) 
 
- कांचन

Sunday 22 May 2022

चंद्रमुखी - Film Review!


चंद्रमुखी!


नावच इतकं सौंदर्यपूर्ण आहे तर चित्रपट त्या नावाला जागेल असा करणं हे खूप मोठं आवाहन असलं पाहिजे!
प्रसाद ओक हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक अनमोल हिरा आहे हे त्याने सिद्ध केलं आहे! एक सर्वांगसुंदर चित्रपट असं चंद्रमुखीला म्हंटलं तरी ते कमीच पडेल.

सुरवातीलाच सांगते की नैतिकतेचे निकष घेऊन सिनेमागृहात जाऊ नका. विषयाला कुठल्याही पूर्वग्रहातून बघू नका. तरच ती कलाकृती म्हणून आपल्याला भिडेल.
खरंतर नैतिकतेच्या सर्व मर्यादा झुगारुन केलेल्या प्रेमाची ही कथा. 
पण ते झुगारणं असं आहे की त्यात आधीच्या प्रेमाचा अपमान नाही, उलट एक अपराधी भावना आहे, द्विधा मनस्थिती आहे, या आधी हे आयुष्यात का नाही झालं याची सल आहे, यापुढे हे थांबवलं पाहिजे असं म्हणणारी बुद्धी आणि त्या बुद्धिपलीकडे जाऊन प्रामाणिक भावनेला दिलेली साद आहे..समज गैरसमजातून सुरू झालेल्या नात्याचा समजुतीपर्यंतचा प्रवास आहे. निरपेक्षता नाही, पण अपेक्षा ठेऊनही अपेक्षाभंगला स्वीकारण्याची प्रेमाची ताकद आहे!
आणखी काय आणि किती वर्णावं!

विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर आधारित हा चित्रपट. सगळ्यात आधी कौतुक या गोष्टीचं की प्रोमोशन करण्यात कुठेही कसूर सोडलेली नाही. जे लोक मराठी सिनेमापासून कोसो दूर आहेत त्यांना सुद्धा एकदा का होईना पोस्टर, गाणं, जाहिरात कुठे ना कुठे दिसलीच असेल. अक्षय बरदापुरकर व त्यांच्या सह निर्मात्यांचं विशेष कौतुक. अनेक मराठी सिनेमे उत्कृष्ट असूनही ते पोहोचत नाहीत, किंबहुना पोहोचवले जात नाहीत याचं एक महत्त्वाचं कारण बजेट असू शकतं त्यामुळे निर्माता चांगला असणं ही खूप मोठी गरज आहे.

चित्रपटाकडे येताना, पहिल्याच सिन मधले मृण्मयी देशपांडेंच्या चेहऱ्यावरचे भाव अस्वस्थ करुन जातात. आणि तिथून जागृत होते ती रसिकांची उत्सुकता की हे का? कशामुळे?. जरी विषय बऱ्यापैकी माहीत असला, तरीही आपल्या लोकांची खोलात शिरण्याची सवय अगदी अचूक हेरली आहे ती पटकथेत.

संजय मेमाणे यांची अप्रतिम सिनेमॅटोग्राफी अक्षरशः डोळे दिपवून टाकते. इतका ताकदीचा सिनेमॅटोग्राफर आपल्या इंडस्ट्रीला लाभला हे भाग्यच म्हणायचं. प्रत्येक फ्रेम, त्यातला appealing लाईट, चंद्रमुखीच्या रंगमंदिरातील सीन्स मध्ये काळोख आणि दिव्यांचं साधलेलं अप्रतिम समीकरण..काय आणि किती वर्णावं?
प्रत्येक सिन घेऊन त्यावर एक एक परिच्छेद लिहिता येईल!
त्याचबरोबर एडिटरचं सुद्धा कौतुक, काही काही transitions इतक्या सुंदर अलगद येऊन जातात की दाद दिल्याशिवाय रहावत नाही.
अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे या दोघांचं कास्टिंग तसं बघायला गेलं तर रिस्की होतं. पण म्हणतात ना, गुरुला शिष्य बरोब्बर हेरता येतो, तसंच दिग्दर्शकाच्या नजरेतही ती जादू असावी!
इतका सहज सुंदर काळजाला भिडणारा अभिनय असणारा चित्रपट अनेक दिवसांनी पाहिला. खरंतर मला उलट नमूद करावंसं वाटतं की फक्त काही मोजक्या ठिकाणी अभिनय केल्याचं जाणवतं, बाकी ९०% चित्रपट बघताना अभिनेते फक्त वावरले आहेत, म्हणजेच भूमिका जगले आहेत असं म्हंटलं तर वावगं ठरु नये. 
मुख्यतः डोळ्यातून व्यक्त झालेली प्रत्येक भावना, "बाई गं" गाण्यात आणि आणखी एक दोन सीन्स मध्ये बरोब्बर एका विशिष्ट क्षणी डोळ्यात येणारं पाणी! आणि नीट बघितलं तर ते हळू हळू वाढत जाताना सहज दिसतं..त्यातून उमटणारे उत्कट भाव, आणि क्षणात शब्द बदलल्यावर पूर्ववत होऊन गाणं पुढे नेणारी अमृता मनात घर करते.
एका सिन मध्ये रस्त्यात एका टर्निंगला चंद्रमुखी कडे जावं की परत घरी जावं असा प्रश्न पडला असतानाचा आदिनाथ कोठारे आणि समीर चौघुले यांचा गाडीतील सिन आहे, त्यात आदिनाथ विचार करायला गाडी थांबवतो, आणि पुढच्या क्षणी गाडी स्टार्ट करतो तेव्हा सरळ कळतं की याने घरी परत जायचा निश्चय करुन गाडी सुरू केली आहे,  पण गाडी स्टार्ट केल्यावर गाणं लागून त्या स्वरांनी चंद्रमुखीची आठवण होऊन चेहऱ्यावरचे बदललेले भाव क्षणात सांगतात की त्याचा विचार बदलला आहे आणि तो गाडी सुरू करुन तिच्याकडे जातो...अक्षरशः ४-५ सेकंदांचा सिन आहे, पण तो इतका सुंदर अभिनित केला आहे की कायम लक्षात राहील!
मृण्मयी देशपांडे बद्दल काय लिहावं? व्याकुळता आणि प्रेम याच्या मध्यावर उभं असलेलं पात्र "डॉली" यावर तिने छाप उमटवली आहे.

याचबरोबर मोहन आगाशे, समीर चौघुले, प्राजक्ता माळी, राजेंद्र शिरसाटकर, वंदना वाकनिस प्रत्येकाने तितक्याच तोडीचा अभिनय केलेला आहे.

वेशभूषा आणि रंगभूषा यांचा सुद्धा ही पात्र वठण्यात महत्वाचा वाटा आहे.

कथा व पटकथा याकडे येताना, चिन्मय मांडलेकर यांचं सर्वोत्कृष्ट लिखाण असलेला सिनेमा असं नक्कीच म्हणता येईल.
प्रत्येक डायलॉग टपोऱ्या थेंबांसारखा धरणीवर पडून चित्रपट
सुगंधित करुन गेलेला आहे. सुरुवातीला मी एक दोन डायलॉग लक्षात ठेवले कारण ते इतके अप्रतिम होते, म्हंटलं review मधे लिहिता येतील. पण काहिच मिनिटांनी मला लक्षात आलं तसं करायचं असेल तर जवळपास अख्खं स्क्रिप्टच द्यावं लागेल!
वैशिष्ट्य असं की उगाच भावना व्यक्त करायच्या म्हणून लांब लचक वाक्य दिलेली नाहीत. अगदी कमी संवाद, त्याला कायिक अभिनयाची साथ आणि त्यातुन उभ्या रहाणाऱ्या संवेदना! निव्वळ अप्रतिम!
चिन्मय मांडलेकर यांना त्रिवार वंदन!

मंगेश धाकडे यांनी केलेलं सुंदर पार्श्वसंगीत सुद्धा चित्रपटाची शोभा वाढवतं. आणि अर्थात, केंद्रबिंदू असणारं संगीत, व ते करणारे संगीतकार अजय-अतुल, गीतकार गुरू ठाकूर यांना सलाम!
गुरू ठाकूर यांच्या शब्दांमध्ये विलक्षण ताकद आहे! आणि अजय अतुल तर या बाजाचे राजेच आहेत. गाण्याची चाल, व त्याबरोबरच केलेली सुंदर arrangement! तबल्यातील बोलांचा, तबल्याचा आणि अनेक गोष्टींचा arrangement मध्ये केलेला वापर लक्ष वेधून जातो. सर्व गायकांनीही या सांगितलं न्याय दिलेला आहे. विशेषतः श्रेया घोषाल आणि आर्या आंबेकर!

दीपाली विचारे, आशिष पाटील यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तम पेलली आहे!

आता या सगळ्यात दिग्दर्शक कुठे आहे? हा प्रश्नच पडतो आणि मग लक्षात येतं की या सगळ्यात नाही, तर हे सगळं म्हणजे दिग्दर्शक आहे! 

किती सीन्स असे सांगू की जे मनात घर करुन राहिलेत! पण सांगितले तर चित्रपटाची मजा घालवण्यासारखं आहे ते.. त्यातल्या त्यात मृण्मयी देशपांडेचा एक फिशटॅन्कचा सिन! तिथे ती एका सेकंदासाठीच येते, पण असं वाटून जातं पाण्यात राहून मासा तहानलेला आहे तशी तिची झालेली अवस्था तो सिन दाखवतो आणि "घे तुझ्याच सावलीत कान्हा" या ओळीला अमृता खानविलकर वर कृष्णाच्या मूर्तीची सावली पडणारा सिन इतका भिडतो मनाला! पणत्यांची पार्श्वभूमी चित्रपट बघूनच कळेल, त्याची अधिक माहिती इथे दिली तर मजा जाईल!

एकुणात एक अतिशय balanced आणि सर्व गुणांनी बहरलेली कलाकृती. काही ठिकाणी कथा खूपच प्रेडिक्टेबल वळणं घेते आणि काही ठिकाणी अभिनय करुन त्या सीन्सची मजा थोडी कमी झाल्यासारखे वाटते. चंद्रा हे गाणं व त्याची ट्रीटमेंट वेगळी झाली असती तर आवडलं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या काळात हा चित्रपट बेतलेला आहे त्याला शोभणारं गाणं चंद्रा नक्कीच नाही असं वाटून जातं. 

विश्वास पाटलांची एक अतिशय ताकदीची कादंबरी आणि त्याचं  तितक्याच ताकदीने केलेलं रुपांतर म्हणजे चंद्रमुखी आहे!

~ ©राधा उवाचं ~

- कांचन लेले

Saturday 30 April 2022

शेर शिवराज..स्वारी अफझलखान!

शेर शिवराज...स्वारी अफझलखान!

फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज (स्वारी अफजलखान)!
श्री शिवराज अष्टकातील चौथा मणी!

"अहोरात्र लाथा बुक्क्यांचा अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. दाही दिशा थरथरल्या. कालपुरुषाचाही कानठळ्या बसल्या आssणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करित करित प्रगटला. अनंत हातांचे आणि अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते, शिवराय!!"

चित्रपटाची सुरवात मला थेट इथे घेऊन गेली. शिवकल्याण राजा या अल्बम मध्ये शिवशाहीर बाबासाहेबांनी केलेल्या निवेदनाचा हा भाग. 
लेखकाला जर ही सुरवात इथून सुचली असेल तर त्याचं कौतुक आहे, कारण शिवशाहीरांइतकं महाराजांना कुणी वाहून घेतलेलं नाही. आणि नवीन पिढीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं तर ते कौतुकास्पदच आहे. यातून लेखकाचा अभ्यास, निरीक्षण व समयसुचकता दिसून येते. 
पण जर ही सुरवात तिथून आली नसेल तर मात्र लेखकाच्या प्रतिभेचं विशेष कौतुक करावं, कारण ती थेट बाबासाहेबांच्या प्रतिभेच्या जवळ गेलेली आहे!

आता ही सुरवात सुरवात म्हणजे काय असा प्रश्न चित्रपट न बघितलेल्या लोकांना पडेल, पण त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघा! आणि अगदी सहकुटुंब जाऊन बघा, कारण शिवरायांचे संस्कार पुढच्या पिढीवर होणं अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्यालासुद्धा त्या चरित्रातले अनेक बारकावे कळणं गरजेचं आहे.

गेल्या बुधवारी चित्रपट पहायचा योग आला. मधला वार आणि अगदी संध्याकाळच्या सुरवातीला शो असल्याने थेटर बऱ्यापैकी रिकामं होतं. प्राईम टाइम शो या चित्रपटाला दिलेले नाहीत याचं प्रचंड दुःख वाटतं.

पावनखिंड बघितल्यावर प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. आणि अगदी लगेचच शेर शिवराज आल्याने दुधात साखर असा योग आला! काही लोकांनी असाही सूर छेडला आहे की लागोपाठ एकाच विषयावरचे किंवा एका सिरीजचे दोन चित्रपट आल्याने इंटरेस्ट वाटत नाही किंवा तोचतोचपणा येतो. पण प्रेक्षकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पावनखिंड हा कोविड मुळे उशिरा release झाला. व त्यामुळे तो रिलीज होईपर्यंत पुढचा पिक्चर शूट करुन तयार होता म्हणून ते लागोपाठ आले. असो, तर आता चित्रपटाकडे येताना..

सुरवातीचा गोंधळ (गाणं) अगदीच मनात रुंजी घालेल असा झालेला आहे. नंतर बराच काळ ते मनात आणि डोक्यात फिरत रहातं!
 तिथून चित्रपट उत्तम गती घेतो. चिन्मय मांडलेकरांनी घेतलेलं महाराजांचं बेअरिंग प्रत्येक चित्रपटागणिक सहजसुंदर आणि परिणामकारक होताना दिसून येतं. त्याचप्रमाणे या चित्रपटात त्यांची शरीरयष्टी (एक सीन वगळता) विशेष डौलदार दिसून येते!
बहिरजींच्या भूमिकेत यावेळी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर झळकत आहेत. त्यांचा अभिनय अगदी सहज आहे, पण विषेश लक्ष वेधून घेते ती त्यांच्या गालावरची खळी! हरीश दुधाडेंनी आजवर बहिर्जी या पात्राला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, की त्यांचं कास्टिंग बदलणं हे एक धाडसच म्हणावं लागेल. पण जर तुलना नाही केली, तर पात्राला न्याय दिला आहे असं म्हणता येईल.

मृणाल कुलकर्णी नेहेमीप्रमाणेच अतिशय लक्षवेधी ठरतात! पण सईबाई आणि सोयराबाई यांच्याबरोबरच्या सीन्समध्ये त्या फारच तरुण दिसतात अशी गोड तक्रार करावी लागेल!

मुकेश ऋषी यांनी साकारलेला अफझलखान आपलं रक्त उसळायला भाग पाडतो. या व्यतिरिक्त त्यांच्या अभिनयाबद्दल आणखी काहीच बोलायची गरज नाही!

वर्षा उसगावकर यांचं कास्टिंग एकदम चपखल झालेलं दिसून येतं. सईबाई राणीसाहेबांचं पात्र साकारलेल्या ईशा केसकर यांनी संपूर्णतः डोळ्यातून व्यक्त केलेला अभिनय मनात घर करुन रहातो, त्याच बरोबर माधवी निमकरांनी साकारलेल्या सोयराबाई त्याला उत्तम साथ देतात.

दीप्ती केतकरांनी दीपाईआऊ बांदल हे पात्र उत्तम साकारलं आहे. अगदी लढाईचे सीन सुद्धा सफाईदारपणे केलेले जाणवतात.

अजय पुरकर यांनी साकारलेले तान्हाजी मनात घर करुन रहातात. व सगळ्यात सुखद धक्का येतो तो म्हणजे समीर धर्माधिकारी यांनी साकारलेले कान्होजी जेधे. विशेषतः त्यांच्या costumes मध्ये  वापरलेला "इकत" कपडा अतिशय डौलदार दिसतो. आता त्या काळी इकत होतं का अशा भंपक चर्चा न केलेल्या बऱ्या. पण ते अतिशय सुंदर शोभलं आहे हे मात्र निश्चित. हेच दुसऱ्या कुठल्याही किरदाराला दिलं असतं तर ते अजिबात शोभलं नसतं हेही निश्चित!
बाकी एकूणच महाराजांचे कपडे सुद्धा अतिशय रुबाबदार आणि तरीही भपकेदार वाटत नाहीत. सर्व costumes अप्रतिम झालेले आहेत व त्याने screen presence नक्कीच अधिक सुखावह झालेला आहे यात वादच नाही.

आयुर्वेदाचार्य आणि शस्त्रकार यांची पात्र विशेष सहजसुंदर निरागस अभिनयाने नटलेली आहेत! त्या दोन्ही अभिनेत्यांचं विशेष कौतुक.

आस्ताद काळे, निखिल लांजेकर, सुश्रुत मंकणी, रोहन मंकणी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, संग्राम साळवी, विक्रम गायकवाड, अलका कुबल, बिपीन सुर्वे आणि बऱ्याच नवीन कलाकारांनीही आपली पात्र उत्तम वठवली आहेत.
अनेक अभिनेत्यांची नावं माहीत नसल्याने उल्लेख करता येत नाही त्याबद्दल माफी!
तरीही अंकित मोहन या तशा बाहेरच्या असलेल्या पण या सिरीजचा अविभाज्य भाग झालेल्या कलाकाराची कमी, तसेच हरीश दुधाडेंची कमी नक्कीच भासते!

वैभव मांगलेंनी साकारलेले गोपीनाथपंत बोकील त्यांच्या नेहेमीच्याच शैलीतील अभिनयाने व्यापले आहेत. रंजकता आणायच्या दृष्टीने मिश्किल पात्र असणं गरजेचं असलं तरीही महाराजांचे वकील असे बाष्कळ वागत असतील हे मनाला पटत नाही. मांगलेंचा अभिनय उत्तम असला तरी दिग्दर्शकाने या गोष्टीचा विचार जरुर करावा.
कृष्णाजी भास्कर व सय्यद बंडा ही पात्र सुद्धा अभिनेत्यांनी चांगली साकारली आहेत.

रवींद्र मंकणी शहाजी राजे म्हणून उत्तम शोभतात. एके काळी स्वामी मध्ये मृणाल कुलकर्णी आणि त्यांची जोडी हिट झालेली आपल्याला माहीतच आहे. पण आता परिस्थिती व वय यात फार फरक आहे. पण त्या दोघांचे यात एकत्र सीन्स नसल्याने हे कास्टिंग अगदीच उत्तम चालून गेलेलं आहे.

सुरवातीपासून आजूबाजूला कुठेही न जाता चित्रपट थेट मुद्द्यावरच येतो. गती उत्तम आहे, रटाळपणा नाही. अनेक पात्र ज्यांचा महाराजांच्या कारकिर्दीत वाटा आहे त्यांचा उल्लेख आवर्जून दिग्दर्शक करतो हे विशेष कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर एका बलाढ्य शत्रूला शक्तीने नाही तर युक्तीच्या बळावर शक्तीने मारलं हेच आजवर आपल्याला माहीत होतं. पण त्या युक्तीचं व्यापक रूप या चित्रपटात पहायला मिळतं. त्याचे अनेक बारकावे उत्तम रीतीने दाखवलेले आहेत. ते इथे फोडून मी spoiler देणार नाही, पण आवर्जून बघावं अशी ही विचारमांडणी आहे. 
पटकथा, संवाद, सिनेमॅटोग्राफी, संगीत, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा इत्यादी सगळं उत्तम प्रतीचं झालेल दिसून येतं. व cinematic quality च्या बाबतीत मराठी सिनेमा करत असलेल्या प्रगतीबद्दल विशेष अभिमान वाटतो.

चित्रपटात काही प्रमाणात VFX चा वापर केलेला दिसून येतो. काही ठिकाणी तो उत्तम साधला आहे, तर काही ठिकाणी अनावश्यक वाटतो. मधे बहिरजींच्या तोंडी असलेलं गाणं चित्रपटाची लय खेचतंय असं वाटून गेलं, थोडं अनावश्यक वाटलं पण रंजकतेच्या गणितानुसर ते ठेवलं असल्याची शक्यता आहे. सईबाई राणीसाहेब गेल्याची बातमी काळतानाचा सीन थोडा कमी परिणामकारक झाल्यासारखं वाटतं. काही पुस्तकांमध्ये त्याचं नुसतं वर्णन इतकं अंगावर येणारं केलेलं आहे की प्रत्यक्ष अभिनयात तो दिसत असेल तर साहजिकपणे अपेक्षा खूप उंचावल्या जातात. महाराज तलवारबाजी करतानाचा एक bare body सीन आहे त्यात शरीर पिळदार नसलेलं दिसल्याने परिणाम किंचित कमी झालेला वाटतो. त्याचबरोबर मृणाल कुलकर्णींच्या सीन ने शेवट झाला असता तर तो आणखी उंचीवर गेला असता असंही जाणवलं. 
या काही गोष्टी वगळता चित्रपट सर्वांगसुंदर जाहला आहे हे माझं वैयक्तिक मत आहे!

त्याचबरोबर शेवटी नवीन चित्रपटाची घोषणा करणं हा प्रकार मस्त आहे! आग्रा स्वारीची आम्ही आतुरतेने वाट बघू!

या सिरीजचा प्रत्येक चित्रपट आपण सर्वांनी पाहणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. नवीन पिढीला चौथी आणि सातवीच्या इतिहासातील पुस्तकांपलिकडे महाराज कळले पाहिजेत. आणि चित्रपटासारख्या मनोरंजनाच्या माध्यमातून जर ते कळत असतील तर मुलं सुद्धा आवडीने त्याकडे वळल्याशिवाय रहाणार नाहीत. तूर्तास इतकेच!

जय शिवराय!

- राधा
©कांचन लेले

Sunday 13 March 2022

पावनखिंड - एक अनुभव!

थिएटर पुन्हा सुरु झाल्यापासून दर्जेदार सिनेमांची खैरात प्रेक्षकांपुढे मांडली जात आहे याचा प्रचंड आनंद आहे. पावनखिंड आणि द काश्मीर फाईल्स, हे दोन्ही सिनेमे दर्जेदार असूनही कितपत बघवतील ही भीती मनात होती.
माझ्या सुदैवाने लहानपणापासून चांगलं साहित्य आई वडिलांनी हातात दिल्याने शिवचरित्र अनेक वेळा डोळ्याखालून गेलेलं होतं.
अनेक रात्री जागवल्या होत्या.
अनेक वेळा उशी भिजली होती.
आता हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघायचं म्हणजे काय होईल?
हा विचार करुन एवढे दिवस गेले नव्हते.
पण मग वाटलं आपण जर आज गेलो नाही, तर उद्या आपण एक रसिक प्रेक्षक म्हणून व्यर्थ ठरु.
आपले काही शिवभक्त कलाकार आपला वेळ-पैसा आणि घाम गाळून महाराजांची व त्यांच्या अनेक शूर साथीदारांची कीर्ती जगासमोर मांडतायत आणि आपण घरात बसून रहाणं हे चूक नाही, 

हा गुन्हा आहे.

म्हणून फोन उघडून तिकीट काढावं म्हंटलं, तर एक शो होता ज्याची वेळ जमण्यासारखी होती आणि अजून house full नव्हता. बाकी बरेच शो house full होते याचा मनोमन आनंदच वाटला. मग त्या शो चं तिकीट काढावं म्हणून booking process केलं तर पहिल्या रांगेतली पहिली एकच सीट बाकी होती.

काही वेळेला इतके अचाट अनुभव येतात ना, तरीही माझी ट्यूब पेटली नाही. मी मागे जाऊन दुसरे शो बघितले...पण मग लक्षात आलं, ती एक सीट माझ्या नावाची आहे. आणि एवढा विलंब झाल्याने पहिल्या रांगेतली आहे.
माझ्यासाठी रिकामी राहिली आहे. 
आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की एक मराठी सिनेमा चौथ्या आठवड्यात असूनही पहिल्या रांगेतल्या पहिल्या सीटवर बसून बघावा लागतोय.
मी लगेच ती सीट बुक करुन थेटर कडे कूच केली!

कुठलाही स्पोइलर देण्यात मला काडीचा रस नाही, किंवा हे पिक्चरचं परीक्षण नाही. हा फक्त माझा अनुभव आहे.


चित्रपट सुरु झाल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक माणूस, त्याने वठवलेलं प्रत्येक पात्र, संगीत, संवाद, चित्रीकरण, वेशभूषा, रंगभूषा, अभिनय, नृत्य, दिग्दर्शन हे काम म्हणून केलेलं नाही तर निव्वळ जीव ओतून केलेलं आहे याची प्रचिती येते.

विशेष कौतुक करावंसं वाटतं ते समीर धर्माधिकारी आणि आस्ताद काळे यांनी वठवलेल्या सिद्दी जोहर आणि सिद्दी मसूद या पात्रांचं.
समीर धर्माधिकारीने इतकं अप्रतिम बेअरिंग घेतलं की एंट्रीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवलं. जोडीला आस्ताद काळे! खरं सांगते, चित्रपट संपल्यावर गूगल करुन बघितलं तेव्हा कळलं की सिद्दी मसूद हे पात्र आस्ताद काळेने साकारलं आहे..अतिशय सुंदर अभिनय!

चिन्मय मांडलेकर हा कायमच माझा अतिशय प्रिय अभिनेता, लेखक राहिला आहे. खरंतर दिगपाल लांजेकर आणि या त्यांच्या समस्त शिवभक कलाकार टोळीने सुरवात केली तेव्हापासून सुरवातीला थोडी शंका होती की चिन्मय मांडलेकर महाराजांच्या भूमिकेत कितपत शोभेल. पण आज डोळे मिटले आणि विचार केला तर त्यानेच दिसावं हे त्याच्या अभिनयाचं यश आहे. खरंतर अमोल कोल्हेनी एक काळ असा गाजवला की गडागडांवर महाराजांची म्हणून लॉकेट, प्रतिमा, पोस्टर विकली जात होती ती म्हणजे अमोल कोल्हेची. अशावेळी हे धाडसी काम करणं फारच अवघड आणि जबाबदारीचं, पण ती जबाबदारी पूर्ण पार पाडली आहे. विशेषतः एका दृश्यात सिद्दीच्या वेढ्याची गडावरुन पहाणी करुन महाराज वळतात आणि पाठमोरे होऊन चालत जातात, ते अदृश्य होईपर्यंत शॉट घेतला आहे. ती त्यांची चाल मनात भरते!

विशाळगडाकडे निघण्यासाठी मावळ्यांना संदेश देत असतानाच्या दृश्यात मशालीचं प्रतिबिंब बुबुळात पडलं आहे, आणि त्या क्षणी डोळ्यातले भाव, ते संवाद आणि त्या मशालीच्या प्रतिबिंबाने लावलेले चार चांद ही दिग्दर्शकाची कमाल व्हिजन दिसून येते!

मृणाल कुलकर्णीशिवाय दुसऱ्या कुणाला आऊसाहेबांच्या भूमिकेत बघणं, अजूनही मनाला पटत नाही, पटणार नाही!
काय ते तेज!

बाजी(अजय पुरकर), फुलाजी (सुनील जाधव), रायाजी(अंकित मोहन), कोयाजी (अक्षय वाघमारे) हे  चार अभिनेते या चित्रपटाचे खांब होऊन पायरीपासूम कळसापर्यंत जाईस्तोवर प्रेक्षकांना खुर्चीत रुतवून ठेवतात!
याचबरोबर मातोश्री बयोबाई, दिपाईआऊ बांदल, भवानीबाई, गौतमबाई ही यांच्या मातोश्री व धर्मपत्नींची पात्र तितक्याच तोडीने साकारली आहेत.

हरीश दुधाडेने साकारलेला बहिर्जी नाईक मनात घर करुन जातो!
बहिर्जी हे महाजांचे अतिशय हुशार हेर होते. ती हुशारी डोळ्यात आणणं हे कसबीचं काम हरीश दुधाडेनी अप्रतिम केलं आहे!

त्याच बरोबर फाजलखान, रुस्तमेजमा, अगिन्या, हरप्या, शिवा काशीद, नेताजी, गंगाधरपंत, बडी बेगम, सोयराबाई राणीसाहेब अशी सर्वच पात्र सर्व अभिनेत्यांकडून उत्तम वठली आहेत.

शेवटच्या दृश्यात दिसलेले राजन भिसेंसारखे कसदार नट, फक्त एका संवादात का होईना, अतिशय सुखावून जातात!

चित्रपट संपल्यावर प्रेक्षागृहात जय भवानी, जय शिवाजी..हरहर महादेव अशा झालेल्या गर्जना पुन्हा एकदा रोमांचित करुन जातात.

हा चित्रपट फक्त दृष्यस्वरूपातच नाही, तर अंतरंगात साठवून ठेवण्यासारखा आहे. चिंतन केलं असता काही गोष्टी जाणवतात त्या म्हणजे..
पूर्ण एकाग्र होऊन जर शिवचरित्र अनुभवलं तर एकप्रकारचं तेज अंगात असल्याची जाणीव होते. चित्रपट संपल्यापासून घरी येईपर्यंत माझ्या नजरेत आग आणि चालीत त्याचा प्रभाव आल्याची जाणीव होत होती. त्यातच बाहेर पडल्यापासून मी कानात राजा शिवछत्रपती या सिरीयलसाठी अजय-अतुलने केलेलं शिर्षकगीत इंद्रजिमी जम्बपर रिपीट वर ऐकत होते.
डोक्यात दुसरे कुठले विचार येणं शक्यच नव्हतं. वाट चालत जाताना महाराजांनी आणि मराठ्यांनी तुडवलेली दऱ्या खोऱ्यातली, राना वनातली पाऊस पाण्यातली वाट आठवत होती. त्यांनी तेही केलं स्वराज्यासाठी. आपण सरळ रस्त्यावर असूनही काय करतो?

इतकं काहीतरी संचारल्यासारखं वाटत होतं पण त्या तेजाला वाट कुठं द्यावी हे मात्र कळत नव्हतं. घरी येऊन शांत झाल्यावर अनेक विचार येऊन गेले.

मावळ्यांची स्वामीनिष्ठा, स्वराज्याच्या स्वप्नाकडे जीवाचा विचार न करता घेतलेली धाव सुन्न करुन जाते.

बाजी-फुलाजी कामी आले हे सांगायला महाराज बयोबाई मतोश्रींकडे येतात तेव्हा त्यांना ओवाळून त्या म्हणतात, "माझं नशीबच खोटं, आणखी दोन पोरं असती तर ती सुद्धा स्वराज्याच्या कामी आली असती."
काय लोकं असतील ही? कुठल्या मातीची बनलेली असतील? काय खात असतील? काय संस्कार झाले असतील त्यांच्यावर?

या लोकांनी महाराजांना साथ देऊन स्वराज्य स्थापन केलं. 
आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी पुन्हा एकदा सुराज्याची स्वप्न बघून या मायभूमीला परकीय पारतंत्र्यातून स्वतंत्र केलं.

पण आज ते राखलं जातंय का?

आजही सीमेवर असंख्य जवान आपल्या रक्षणाखातर बर्फात गाडून घेऊन, समुद्रात वाहून घेऊन किंवा रणरणत्या उन्हात उभं राहून आपली निष्ठा सिद्ध करतायत. 
देशाच्या प्रत्येक नागरिकाला याची जाणीव जन्माला आल्यापासून आपण का नाही देऊ शकत?

आपण अनेकदा ऐकतो की पाकिस्तानात कोवळ्या मुलांना कशाप्रकारे ट्रेनिंग दिलं जातं, निर्दयी केलं जातं वगैरे वगैरे. त्याचा उल्लेखही नकोय खरंतर आत्ता, पण ते किती परिणामकारक असेल याचा अनुभव मी या काही काळात घेतला. 
असं ट्रेनिंग महाराजांचा इतिहास दाखवून आपण आपल्या पुढच्या पिढीला का देत नाही? का शाळा शाळांमधून महाराजांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा आणि देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचा इतिहास जास्तीत जास्त प्रमाणात पाठ्यपुस्तकात येत? 
आणि जर पाठ्यपुस्तकात येत नसेल, तर आपण आपल्या मुलांच्या हाती तो देणं हे आपलं कर्तव्य आहे. हा विषय खूप मोठा व गंभीर आहे, पण अशा कलाकृती समोर आल्या की विचार करायला भाग पाडतात! असो!
आज मात्र थिएटर मध्ये 20% लहान मुलं होती. आणि ते बघून खरंच खूप बरं वाटलं! 

हा सिनेमा मी पुन्हा एकदा बघणार आहे, आणि त्यातले मोजके पण अतिशय मोलाचे संवाद टिपून त्यावर एक लेख लिहिणार आहे.
नीट ऐकलं तर चित्रपट बघितलेल्या प्रत्येकाच्या ते लक्षात येईल की अनेक ठिकाणी असे संवाद आहेत जे डोळ्यात अंजन घालतात, जे आजच्या काळातही लागू होतील.
ही ताकद आहे शब्दांची. आणि अनेक असे प्रसंग आहेत ज्यात एकही संवाद नसताना ते अंगावर काटा उभा करतात. ही ताकद आहे अभिनयाची.

दिगपाल लांजेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष विशेष कौतुक आणि प्रचंssड आभार की ही पर्वणी ते आम्हा मराठी माणसांसाठी आणत आहेत. 

त्यांच्या येणाऱ्या "शेर शिवराय" या कलाकृतीला अनेक शुभेच्छा.
याच बरोबर विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स पुढच्या आठवड्यात नक्की बघण्याचा निश्चय केला आहे. 
कारण चांगल्या कलाकृती ह्या थिएटर मध्ये जाऊनच बघितल्या पाहिजेत. त्यामागे अपार अपार मेहनत गेलेली असते.

हा लेख जर संपूर्ण वाचला असेल, तर एक कळकळीची विनंती. लवकरात लवकर जाऊन पावनखिंड आणि द काश्मीर फाईल्स जरुर बघा.

जय भवानी, जय शिवाजी!

- कांचन लेले