Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Sunday 22 May 2022

चंद्रमुखी - Film Review!


चंद्रमुखी!


नावच इतकं सौंदर्यपूर्ण आहे तर चित्रपट त्या नावाला जागेल असा करणं हे खूप मोठं आवाहन असलं पाहिजे!
प्रसाद ओक हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक अनमोल हिरा आहे हे त्याने सिद्ध केलं आहे! एक सर्वांगसुंदर चित्रपट असं चंद्रमुखीला म्हंटलं तरी ते कमीच पडेल.

सुरवातीलाच सांगते की नैतिकतेचे निकष घेऊन सिनेमागृहात जाऊ नका. विषयाला कुठल्याही पूर्वग्रहातून बघू नका. तरच ती कलाकृती म्हणून आपल्याला भिडेल.
खरंतर नैतिकतेच्या सर्व मर्यादा झुगारुन केलेल्या प्रेमाची ही कथा. 
पण ते झुगारणं असं आहे की त्यात आधीच्या प्रेमाचा अपमान नाही, उलट एक अपराधी भावना आहे, द्विधा मनस्थिती आहे, या आधी हे आयुष्यात का नाही झालं याची सल आहे, यापुढे हे थांबवलं पाहिजे असं म्हणणारी बुद्धी आणि त्या बुद्धिपलीकडे जाऊन प्रामाणिक भावनेला दिलेली साद आहे..समज गैरसमजातून सुरू झालेल्या नात्याचा समजुतीपर्यंतचा प्रवास आहे. निरपेक्षता नाही, पण अपेक्षा ठेऊनही अपेक्षाभंगला स्वीकारण्याची प्रेमाची ताकद आहे!
आणखी काय आणि किती वर्णावं!

विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर आधारित हा चित्रपट. सगळ्यात आधी कौतुक या गोष्टीचं की प्रोमोशन करण्यात कुठेही कसूर सोडलेली नाही. जे लोक मराठी सिनेमापासून कोसो दूर आहेत त्यांना सुद्धा एकदा का होईना पोस्टर, गाणं, जाहिरात कुठे ना कुठे दिसलीच असेल. अक्षय बरदापुरकर व त्यांच्या सह निर्मात्यांचं विशेष कौतुक. अनेक मराठी सिनेमे उत्कृष्ट असूनही ते पोहोचत नाहीत, किंबहुना पोहोचवले जात नाहीत याचं एक महत्त्वाचं कारण बजेट असू शकतं त्यामुळे निर्माता चांगला असणं ही खूप मोठी गरज आहे.

चित्रपटाकडे येताना, पहिल्याच सिन मधले मृण्मयी देशपांडेंच्या चेहऱ्यावरचे भाव अस्वस्थ करुन जातात. आणि तिथून जागृत होते ती रसिकांची उत्सुकता की हे का? कशामुळे?. जरी विषय बऱ्यापैकी माहीत असला, तरीही आपल्या लोकांची खोलात शिरण्याची सवय अगदी अचूक हेरली आहे ती पटकथेत.

संजय मेमाणे यांची अप्रतिम सिनेमॅटोग्राफी अक्षरशः डोळे दिपवून टाकते. इतका ताकदीचा सिनेमॅटोग्राफर आपल्या इंडस्ट्रीला लाभला हे भाग्यच म्हणायचं. प्रत्येक फ्रेम, त्यातला appealing लाईट, चंद्रमुखीच्या रंगमंदिरातील सीन्स मध्ये काळोख आणि दिव्यांचं साधलेलं अप्रतिम समीकरण..काय आणि किती वर्णावं?
प्रत्येक सिन घेऊन त्यावर एक एक परिच्छेद लिहिता येईल!
त्याचबरोबर एडिटरचं सुद्धा कौतुक, काही काही transitions इतक्या सुंदर अलगद येऊन जातात की दाद दिल्याशिवाय रहावत नाही.
अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे या दोघांचं कास्टिंग तसं बघायला गेलं तर रिस्की होतं. पण म्हणतात ना, गुरुला शिष्य बरोब्बर हेरता येतो, तसंच दिग्दर्शकाच्या नजरेतही ती जादू असावी!
इतका सहज सुंदर काळजाला भिडणारा अभिनय असणारा चित्रपट अनेक दिवसांनी पाहिला. खरंतर मला उलट नमूद करावंसं वाटतं की फक्त काही मोजक्या ठिकाणी अभिनय केल्याचं जाणवतं, बाकी ९०% चित्रपट बघताना अभिनेते फक्त वावरले आहेत, म्हणजेच भूमिका जगले आहेत असं म्हंटलं तर वावगं ठरु नये. 
मुख्यतः डोळ्यातून व्यक्त झालेली प्रत्येक भावना, "बाई गं" गाण्यात आणि आणखी एक दोन सीन्स मध्ये बरोब्बर एका विशिष्ट क्षणी डोळ्यात येणारं पाणी! आणि नीट बघितलं तर ते हळू हळू वाढत जाताना सहज दिसतं..त्यातून उमटणारे उत्कट भाव, आणि क्षणात शब्द बदलल्यावर पूर्ववत होऊन गाणं पुढे नेणारी अमृता मनात घर करते.
एका सिन मध्ये रस्त्यात एका टर्निंगला चंद्रमुखी कडे जावं की परत घरी जावं असा प्रश्न पडला असतानाचा आदिनाथ कोठारे आणि समीर चौघुले यांचा गाडीतील सिन आहे, त्यात आदिनाथ विचार करायला गाडी थांबवतो, आणि पुढच्या क्षणी गाडी स्टार्ट करतो तेव्हा सरळ कळतं की याने घरी परत जायचा निश्चय करुन गाडी सुरू केली आहे,  पण गाडी स्टार्ट केल्यावर गाणं लागून त्या स्वरांनी चंद्रमुखीची आठवण होऊन चेहऱ्यावरचे बदललेले भाव क्षणात सांगतात की त्याचा विचार बदलला आहे आणि तो गाडी सुरू करुन तिच्याकडे जातो...अक्षरशः ४-५ सेकंदांचा सिन आहे, पण तो इतका सुंदर अभिनित केला आहे की कायम लक्षात राहील!
मृण्मयी देशपांडे बद्दल काय लिहावं? व्याकुळता आणि प्रेम याच्या मध्यावर उभं असलेलं पात्र "डॉली" यावर तिने छाप उमटवली आहे.

याचबरोबर मोहन आगाशे, समीर चौघुले, प्राजक्ता माळी, राजेंद्र शिरसाटकर, वंदना वाकनिस प्रत्येकाने तितक्याच तोडीचा अभिनय केलेला आहे.

वेशभूषा आणि रंगभूषा यांचा सुद्धा ही पात्र वठण्यात महत्वाचा वाटा आहे.

कथा व पटकथा याकडे येताना, चिन्मय मांडलेकर यांचं सर्वोत्कृष्ट लिखाण असलेला सिनेमा असं नक्कीच म्हणता येईल.
प्रत्येक डायलॉग टपोऱ्या थेंबांसारखा धरणीवर पडून चित्रपट
सुगंधित करुन गेलेला आहे. सुरुवातीला मी एक दोन डायलॉग लक्षात ठेवले कारण ते इतके अप्रतिम होते, म्हंटलं review मधे लिहिता येतील. पण काहिच मिनिटांनी मला लक्षात आलं तसं करायचं असेल तर जवळपास अख्खं स्क्रिप्टच द्यावं लागेल!
वैशिष्ट्य असं की उगाच भावना व्यक्त करायच्या म्हणून लांब लचक वाक्य दिलेली नाहीत. अगदी कमी संवाद, त्याला कायिक अभिनयाची साथ आणि त्यातुन उभ्या रहाणाऱ्या संवेदना! निव्वळ अप्रतिम!
चिन्मय मांडलेकर यांना त्रिवार वंदन!

मंगेश धाकडे यांनी केलेलं सुंदर पार्श्वसंगीत सुद्धा चित्रपटाची शोभा वाढवतं. आणि अर्थात, केंद्रबिंदू असणारं संगीत, व ते करणारे संगीतकार अजय-अतुल, गीतकार गुरू ठाकूर यांना सलाम!
गुरू ठाकूर यांच्या शब्दांमध्ये विलक्षण ताकद आहे! आणि अजय अतुल तर या बाजाचे राजेच आहेत. गाण्याची चाल, व त्याबरोबरच केलेली सुंदर arrangement! तबल्यातील बोलांचा, तबल्याचा आणि अनेक गोष्टींचा arrangement मध्ये केलेला वापर लक्ष वेधून जातो. सर्व गायकांनीही या सांगितलं न्याय दिलेला आहे. विशेषतः श्रेया घोषाल आणि आर्या आंबेकर!

दीपाली विचारे, आशिष पाटील यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तम पेलली आहे!

आता या सगळ्यात दिग्दर्शक कुठे आहे? हा प्रश्नच पडतो आणि मग लक्षात येतं की या सगळ्यात नाही, तर हे सगळं म्हणजे दिग्दर्शक आहे! 

किती सीन्स असे सांगू की जे मनात घर करुन राहिलेत! पण सांगितले तर चित्रपटाची मजा घालवण्यासारखं आहे ते.. त्यातल्या त्यात मृण्मयी देशपांडेचा एक फिशटॅन्कचा सिन! तिथे ती एका सेकंदासाठीच येते, पण असं वाटून जातं पाण्यात राहून मासा तहानलेला आहे तशी तिची झालेली अवस्था तो सिन दाखवतो आणि "घे तुझ्याच सावलीत कान्हा" या ओळीला अमृता खानविलकर वर कृष्णाच्या मूर्तीची सावली पडणारा सिन इतका भिडतो मनाला! पणत्यांची पार्श्वभूमी चित्रपट बघूनच कळेल, त्याची अधिक माहिती इथे दिली तर मजा जाईल!

एकुणात एक अतिशय balanced आणि सर्व गुणांनी बहरलेली कलाकृती. काही ठिकाणी कथा खूपच प्रेडिक्टेबल वळणं घेते आणि काही ठिकाणी अभिनय करुन त्या सीन्सची मजा थोडी कमी झाल्यासारखे वाटते. चंद्रा हे गाणं व त्याची ट्रीटमेंट वेगळी झाली असती तर आवडलं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या काळात हा चित्रपट बेतलेला आहे त्याला शोभणारं गाणं चंद्रा नक्कीच नाही असं वाटून जातं. 

विश्वास पाटलांची एक अतिशय ताकदीची कादंबरी आणि त्याचं  तितक्याच ताकदीने केलेलं रुपांतर म्हणजे चंद्रमुखी आहे!

~ ©राधा उवाचं ~

- कांचन लेले