Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Sunday 17 December 2017

एक उनाड दिवस!


खूप दिवस काही वेगळं केलं नव्हतं…खरंतर काही केलंच नव्हतं असं तिला वाटत होतं..
मुंबईतलं आयुष्य म्हणजे मुंबईच्या गर्दीसारखंच झालं होतं..फक्त उभं राहिलं की गर्दी आपोआप तुम्हाला ट्रेनमध्ये चढवते आणि उतरवतेही…तसंच पहाटे गजर वाजला की यंत्रमानवासारखं एकामागून एक ठरलेली कामं करायची, घाई नेहेमीचीच..चहा सुद्धा एकीकडे भाजी हलवत प्यायचा..एका वेळी एक काम करणं म्हणजे तर पापच जणू..इतका वेळ वाया घालवायला तो काय झाडाला थोडीच लागतो..?
एकीकडे कणिक मळायला घेताना आधी कूकर गॅसवर ठेवायचा..कणिक भिजेपर्यंत भाजी चिरायला घ्यायची, कूकर होत असताना दुसरीकडे चहाचं आधण ठेवायचं..कूकर बंद केला की तो काढून कढई ठेवायची, भाजी फोडणीला द्यायची मग चहा होतोच तोवर..एकीकडे भाजी, दुसऱ्या हातात चहा आणि डोक्यात ७.३२ ची ट्रेन!
त्यात मुलांना उठवायचं, डबे भरायचे, सकाळचे केर-वारे कोणाला चुकले नाहीतच..संध्याकाळी येताना कुठली भाजी आणायची..? घरात कुठली भाजी आहे..? रात्री काय स्वयंपाक करायचा..? अरे देवा, उद्या उपवास आहे, रात्रीचं उरायला नको..मग साबुदाणे आहेत का..? येताना रताळी मिळतील का..? असे विचार करत, आदल्या दिवशीचं शिळं अन्न उभ्या उभ्याच, पर्स मध्ये सामान टाकता टाकता खायचं..मुलांना, नवऱ्याला एक दोन सूचना देऊन मग तसंच धावत पळत स्टेशनकडे जायचं..कशीबशी ट्रेन पकडायची..ऑफिसला जायचं..कामं करायची मग निघालं की परत मनात विचार सुरू..मग विचारांचा विचार करायचा..
किती विचार करतो आपण..एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा.. विचारचक्र सतत डोक्यात सुरूच असतं...कृष्णाच्या सुदर्शनासारखं..ते कधी थांबलेलं बघितलं असेल का कोणी..?
अरे बापरे..हे कसले विचार येतायत आपल्या मनात..नको देवा..उगच पाप लागायचं! इतक्यात स्टेशन आलं..आणि ती उभ्या उभ्याच बाहेर ढकलली गेली..नेहेमीसारखी..
पण आज स्टेशन बाहेर पडल्यावर तिने भाजी मार्केटचा रस्ता नाही धरला..काय मनात विचार आला, पुन्हा स्टेशनकडे गेली, पश्चिमेकडे जाणाऱ्या ब्रिज वर चढली आणि तिकडे असणाऱ्या गार्डनचा रस्ता धरला..
हे गार्डन बऱ्यापैकी मोठं होतं..तिची नजर रिकामा बाक शोधत होती पण तो काही तिला सापडेना..
शेवटी नाईलाजाने ती बाहेर पडली, शेजारी मुलांसाठी खेळायला जागा होती तिकडे खूप जागा होती बसायला..तिथे जाऊन ती बसली..आणि मुलांना बघायला लागली..ती निरागसता बघून तिचं मन आपोआप सुखावत गेलं..पलीकडे चालायचा ट्रॅक होता..एक वृद्ध जोडपं एकमेकांचा हात घट्ट धरून हळूहळू चालत होतं..नकळत एक smile तिच्याही चेऱ्यावर आली..आणि तितक्याच नकळत 'आपण या वयाचे होऊ तेव्हा आपण दोघांनी एकमेकांना अशीच साथ द्यायची' असं तिने मनोमन ठरवलंही..थोड्या वेळाने तिथून उठली..बाहेर पडली..बाहेर एक मुलगी गजरे विकत होती..'ताई घ्या ना, शेवटचे चार राहिले आहेत..कमी करून देते'
तिने एकवार त्या मुलीकडे पाहिलं..चटकन तिच्या डोक्यावरुन हात फिरवावा अशी तिची इच्छा झाली..एरवी तिने तसं केलं नसतं, पण आजचा दिवस वेगळाच होता..तिने तिच्याकडचे गजरे घेतले आणि तिला म्हणाली चल माझ्याबरोबर..
शेजारी एका हॉटेलात तिला घेऊन गेली..त्या मुलीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक तिला दिसली..तिच्याशी गप्पा मारल्या, तिला पोटभर खाऊ घातल्यावर हिचंच पोट भरलं खरंतर..मग तिनेही आनंदाने पळ काढला, आणि ही पुन्हा तिच्या वाटेल लागली..
तेवढ्यात फोन वाजला
'अगं काय झालं..? कुठे आहेस..? बरी आहेस ना..?'
समोरून नवरा काळजीत बोलत होता..
'हो, थोडं काम निघालं, सांगायची विसरले..येतेच घरी..'
'हो का..ठीक आहे गं..घरी आलो तर तू दिसली नाहीस, काळजी वाटली..आणायला येऊ का..?'
'नको नको, येतेच मी!'
आपली काळजी करणारं कोणीतरी आहे ही भावना सगळ्यात सुखावह असते..हे तिला आज मनोमन पटलं..
जाता जाता घराजवळ नवीन उघडलेल्या restaurant मधून तिने चक्क बिर्याणी पार्सल घेतली..बरोबर ice-cream घेतलं..मनोमन आज मुलं खुश होणार असा विचार करतच ती घरी पोहोचली..
आजचा दिवसही नेहेमीसारखाच आला होता, पण जाताना मात्र वेगळा होऊन गेला होता..रोजच्या गडबडीत असे छोटे मोठे आंनद शोधणं हे आपलंच काम असतं! आणि आनंद म्हणजे तरी काय..? आपण मानतो ते..त्यासाठी युरोप टूरला जायची गरज नसते, आपलं युरोप आपल्या आसपासच असतं खरंतर..गरज असते त्यापर्यंत जायची..गरज असते केव्हातरी उनाड व्हायची..!
©कांचन लेले
Image Credits - Google

Thursday 5 October 2017

चंद्र!

चांदोबा/चांदोमामा, इथून सुरवात होते..त्याची ओळख होते..
त्याच्याशी लपाछपी खेळण्यात दिवस पुढे जातात..
मग त्याला शाप मिळाल्याची गोष्टही सांगतं कोणीतरी..
मग त्यावर बालवयाला शोभतील असे प्रश्नही पडतात..
मग शाळेत जायला लागल्यावर त्याच्याबद्दल वैज्ञानिक माहिती मिळते..मग त्याच्या कलेकलेने वाढण्याचं कारण कळतं, त्याच्या नाहीसं होण्याचं कारण कळतं..ग्रहणाबद्दल कळतं, पण अजूनही पगडा असतो तो बाप्पाने त्याला दिलेल्या शापाच्या गोष्टीचाच!

मग वय वाढत जातं आणि चंद्राचे विचार मागे पडत जातात..
मग कॉलेज मधे गेल्यावर गुलाबी दिवसांमधे पुन्हा चंद्राची आठवण होते…आणि पुढे जाऊन विरहात फक्त चंद्राचीच साथ उरते!
आयुष्य पुढे सरकत असतं, पण चंद्र मात्र कायम सोबत असतो..अगदी प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा!
कधी ग्रहणातल..तर कधी कोजागिरीचा..नजर ठरणार नाही असा!
अमावास्येला मात्र चंद्र दिसत नाही, पण जाणवतो…
डोळ्याला दिसला नाही तरी त्याचं अस्तिव जाणवल्याशिवाय रहात नाही…
हे संपूर्ण चंद्रचक्र खूप विचार करायला लावणारं आहे! निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काही ना काही शिकवायचा प्रयत्न करत असतो…फक्त नजर पाहिजे!

अमावस्येने सुरवात करूया..
मगाशी म्हंटल्याप्रमाणे अमावास्येला चंद्र डोळ्यांना दिसत नाही, पण अस्तित्वात नसतो असंही नाही!
तसंच जीव गर्भात असताना डोळ्याला दिसत नाही, पण अस्तित्व असतंच की..
मग कलेकलेने वाढत जातो..
बालवयातील पौर्णिमा गाठतो!
ती गाठली की पुढचं पाऊल जरा मोठ्या जगात पडतं..स्थिरावायला  वेळ लागतो...कधीकधी नैराश्याची अमावस्या पुन्हा वेढा घालते..
पण त्यातून पुन्हा कलेकलेने वाढत जातो, तोच खरा चंद्र, तोच खरा माणूस!
पुन्हा वाढत जातो..प्रगतीकडे वाटचाल करतो..मग आयुष्यात अनेक अमावस्या-पौर्णिमा येत रहातात…कधी ग्रहण लागतं..तर कधी कोजागिरीच्या चंद्रासारखं डोळे दिपवणारं यश मिळतं!
पण तसे डोळे दिपण्यासाठी आधी अमावस्येच्या भयाण अंधाराला पार करावं लागतं..धैर्याने!
चंद्रग्रहणाकडे वाईट म्हणून मोठ्या प्रमाणावर बघितलं जात असलं, तरी त्याच ग्रहण लागलेल्या चंद्राकडे अप्रुपाने बघणारे लोक असतातच की, थोडे का असेना! तसेच माणसाच्या ग्रहण काळात त्याच्याकडे प्रेमाने बघणारे लोक म्हणजेच त्याची हक्काची माणसंही असतातच की..!
कधीकधी खूप मळभ येतं..आणि झाकून टाकतं अगदी पौर्णिमेच्या चंद्रालाही! पण त्याही परिस्थितीत त्या काळ्या ढगांना आपल्या तेजाने त्यांच्याआड दडून प्रकाश देतो, तोच खरा चंद्र...आपलं वाईट करू पाहणाऱ्या माणसांवर चांगुलपणाने मात करतो, तोच खरा माणूस !

आयुष्य हे एक अनमोल देणं आहे,
फक्त चंद्र होता आलं पाहिजे!

©कांचन लेले

Monday 25 September 2017

SlowFast!


नेहेमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून निघाले..
रम्य संध्याकाळ होती..स्टेशनला आले तर नुकतीच ट्रेन फलाटावर येत होती..वेग मंदावला होता ट्रेनचा, आणि वाढला होता माणसांचा..
खोपोली फास्ट…लांब पल्ल्याची गाडी..अनेक लोकांची नेहेमीची ठरलेली, काही लोकांची पहिलीच वेळ, काहींची हुकलेल्या ट्रेनची रिकामी जागा भरण्यासाठीची..
गाडी स्थिरावायच्या आतच अनेक लोक आत शिरून मोकळे झाले होते…त्यात मी ही होतेच..निघेपर्यंत ट्रेन नेहेमीप्रमाणे भरलेली होती..माझ्या समोरच्या खिडकीत एक लहान मुलगा त्याच्या आईबरोबर बसला होता..बसल्या बसल्या त्याने थोडं इकडचं तिकडचं निरीक्षण केलं आणि मग कंटाळून कुरबुर करू लागला..
आई त्याला समजावत होती इतक्यात ट्रेन सुरू झाली..त्या मुलाने डोळे टवकारले!
आणि जसजशी ट्रेन वेग घेत होती, तो मुलगा आनंदाने पण शांतपणे बाहेर बघत होता..डोळ्यात एक प्रकारचं कुतूहल होतं..ट्रेन पुढेपुढे जात होती..आणि काही वेळात आमच्या ट्रेनने एका स्लो ट्रेनला ओव्हरटेक केलं..मुलगा आनंदाने ओरडला!
'आम्ही पुढे गेलो...टुकटुक!' असं त्या ट्रेनच्या दिशेने बघत वेडावू लागला!
मला गंमत वाटली..इतका वेळ शांतपणे बाहेर बघणारा मुलगा अचानक एवढा ओरडला, हर्षित झाला..आणि त्याचं कारण काय तर कोणालातरी मागे टाकलं म्हणून?!
किती साधा विचार पण तरीही मला विचारात पाडून गेला..
खरंतर त्या मुलाच्या मनात निरागस आनंद होता, पण कुठेतरी तेच बीज असू शकतं का स्पर्धेचं…?
मग अनेक विचार माझ्या डोक्यात येऊ लागले…
माणूस आणि ट्रेन ह्यात फरक तो किती..?
आता हे अगदी शब्दशः खरं असूच शकत नाही! पण ढोबळ अर्थाने बघता, बरंच साम्य दिसतं.. कदाचित ट्रेन ही माणसाचीच निर्मिती असल्याने, त्याचं प्रतिबिंब त्यात न दिसलं तरंच नवल!
तर माणसं आणि ट्रेन!
ट्रेन स्लो-फास्ट असतात..माणसांचंही बरंचसं तसंच असतं की!
स्लो ट्रेन खूप लांबच्या पल्ल्याच्या कमी असतात..जवळच्याच जास्ती..
नावाप्रमाणे वेग कसा असतो ते वेगळा सांगायला नकोच!
सगळ्याच स्टेशनवर थांबत जातात..सगळ्यांना बरोबर घेऊन जातात..कितीही लहान स्टेशन असो, कितीही कमी माणसं असो, सगळ्यांसाठी थांबत जातात…
आता फास्ट ट्रेन! लांब पल्ल्याच्या जास्ती..जवळपासच्या कमीच..आणि वेग पुन्हा नावाप्रमाणेच!
मोजक्याच महत्वाच्या स्टेशनवर रहाणाऱ्या लोकांसाठी थांबतात..
आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आधी निघालेल्या स्लो ट्रेनला मागे टाकून पुढे जाते!
आता माणसं..काही माणसांची गाडी आयुष्यात उशिरा सुरू होते..थोडा धक्काही लागतो काहींना…पण अशी माणसं हळू हळू प्रगतीकडे जात असतात..मधे अनेक माणसं जोडत असतात, भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला पुढे घेऊन जात असतात..कधी कधी त्यांना खूप विलक्षण यश नाही मिळत, पण अगदी मिळत नाही असंही नाही! लौकिक दृष्ट्या खूप काही मिळत नसलं तरी सामाजिक, कौटुंबिक दृष्ट्या ते वेगळीच उंची गाठत असतात..
दुसऱ्या प्रकारातली माणसं वेग घेऊनच जन्माला येतात..झपाटल्यासारखे यशाकडे, प्रगतीकडे धाव घेत असतात..
आणि अर्थातच त्यांना अगदी डोळे दिपवणारं यश मिळतही असेल, बाकीच्यांपेक्षा खूप लवकर! पण या प्रक्रियेत मात्र त्यांची अनेक स्टेशनं हुकतात…आयुष्यातले सोनेरी क्षण अनुभवायचेच राहून जातात…उद्दिष्ट गाठतात, पण अनेकदा एकटेच!
बरं frequency स्लो ट्रेनची जास्ती, पण demand मात्र फास्ट ट्रेननला! तसंच लोकप्रियता स्लो माणसांना आणि वचक मात्र फास्ट माणसांचा जास्ती!
आता हे झालं ढोबळअर्थी वर्गीकरण..पण पुढे विचार येतो तो त्या मुलाचा..खरतर लहान मूल निरागस असतं..पण तसं बघता सगळ्याच लहान मुलांना गाडी, ट्रेनने दुसऱ्याला मागे टाकलं की आनंद होतो! आपल्यालाही लहानपणी झालाच असेल की! हा आनंद जेव्हा लहान मुलांना होतो तेव्हा समजू शकतो, कारण असतं त्यांची निरागसता..
पण हाच आनंद जेव्हा माणसांना होतो, किंबहुना तसा आनंद मिळवण्याचा ते मुद्दाम प्रयत्न करतात तेव्हा मात्र कीव करावीशी वाटते…आपल्याला पुढे नेणाऱ्या माणसालाही मागे टाकायला माणसं मागेपुढे बघत नाही..
आणि अशावेळी विंदांना आठवल्याशिवाय रहावत नाही..
प्रतिभावान कवींच्या लिखाणात एक प्रकारची गंमत असते!
ते दोन ओळींमध्ये सुद्धा आयुष्याचं सार सांगून जातात, पण त्याकडे बघण्यासाठी आपण आपला लोलक वापरायची गरज असते..
प्रत्येकाचा लोलक वेगळा असतो, सगळ्यांना तो फिरवता येतोच असं नाही!
विंदा म्हणून गेले
           "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
                   घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे!"
आता ह्या ओळी माहीत नाहीत असे खूप कमी लोक असतील, पण ह्या ओळींचा अर्थ जाणणारे कमी, आणि त्या ओळी अमलात आणणारे आणखीनच कमी!'
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हंटलं की नक्की काय घ्यावं हेच कळत नसतं लोकांना, किंवा आयुष्याचा वेगात ते कळवून घेण्याइतकी उसंतही नसते!
पण तरीही जगाचं चक्र कुठेही थांबत नाही, काळ आपली गती सोडत नाही..
हल्ली घेणारे अक्षरशः देणाऱ्यांचे हात कापून घेऊन जातात, पण तरीही देणारे पुन्हा जन्म घेतातच! आणि घेणारेही!
देणाऱ्यांचे हात घेऊन दाते झालेले लोकही असतात, आणि दिलेल्याची किंमत नसणारेही!
पण नेहेमीच वाईटाचा विजय होतो असंही नाही..
एखादी वेळ अशीही येऊन जाते, फास्ट ट्रेनला मधेच सिग्नल लागतो, बराच वेळ आणि स्लो ट्रेन मात्र आपल्या गतीने तिला मागे टाकून पुढे जाते! माणसांबद्दल हे वेगळं सांगायला नकोच!
आयुष्याला गती देणं गरजेचं असतंच, पण ते करताना वेगमर्यादा सांभाळता आली की आयुष्य सफल होतं हे जरी खरं असलं तरी
दुसऱ्या बाजूला स्लो-फास्टचा खेळ रंगत नसेल तर आयुष्याला मजाही येत नाही!
कारण आयुष्याचा काय किंवा ट्रेनचा काय, प्रवास मात्र चालूच रहातो, कुठल्याही वेगात…!
©कांचन लेले

Pic Credits - Google

Wednesday 13 September 2017

शकुन..

'हे लागलं शेवटचं कपाट! आणि त्याबरोबर आपलं नवीन घरही!'
'किती उशीर झालाय पण..आणि इकडे आसपास काहीच नाही..अनिल, आपण परत एकदा विचार करायला हवा असं नाही वाटत तुला..?'
'रेवा..तू ऐक माझं..हे सगळे विचार सोड आणि ह्या निसर्गाचा आस्वाद  घे फक्त!'
'अरे पण माझ्या ह्या अशा अवस्थेत काही लागलं सवरलं तर..?'
'मी त्याचा विचार केला नसेल असं वाटतं का तुला..? फोनजवळ सगळ्यात पहिला नंबर ambulance चा आहे..जी फक्त ५ किलोमीटर लांब असते इथून. आणि ती सुविधा आपल्याला २४ तास मिळणार आहे. तू अजिबात काळजी करू नको. प्रश्न फक्त तीन महिन्यांचा तर आहे आणि आपण तुला सोबतीला बाई शोधत आहोतच ना..?'
'हो..बरं..'
'चल मी पटकन चहा करतो आपल्यासाठी! मग स्वयंपाकाचं बघू! तू थोडावेळ बाहेर बस बरं शांतपणे..आलोच मी..'
रेवा बाहेर जाऊन तिथे ठेवलेल्या खास आरामखुर्चीत बसते..
थंड वारा वाहात असतो..दुरुन नदीच्या खळाळण्याचा आवाज अस्पष्ट  कानी येत असतो..ती डोळेभरून आजूबाजूची हिरवळ न्याहाळत असते..अनिल वनविभागात अधिकारी असतो, पण कसल्या इंस्पेक्शनच्या कारणाने त्याला ह्या जंगलात येऊन काही दिवस रहावं लागणार असतं..
अनिलला हे जरी सवयीचं असलं तरी रेवामात्र अशी एकटी, लोकांपासून दूर कधीच राहिलेली नसते, त्यामुळे इथे आल्यापासून तिला एक विचित्र एकटेपणाची जाणीव होत असते, त्यात ती गरोदर असल्याने आणखीनच असुरक्षित वाटत असतं..
पण आता मात्र हे निसर्गवैभव तिला मोहिनी घालत असतं..
आतून चहाचा वास हवेबरोबर बाहेर येतो, आणि त्याच बरोबर कानावर पडतो अनिलचा आवाज..
'जेव्हा तुझ्या बटांना…
उधळी मुजोर वारा...'
रेवाचं आवडतं गाणं…तिच्या चेहऱ्यावर नकळत हास्य विलसतं..
ती डोळे बंद करुन मागे टेकते..खुर्ची हळूहळू मागेपुढे होत असते..
गाणं कानाला सुखावत असतं आणि थंड-स्वच्छ-शुद्ध हवा शरीराबरोबरच मनालाही स्पर्शून जात असते..
इतक्यात अनिल चहाचा कप तिच्या समोर धरतो!
त्याच्या जवळ आलेल्या आवाजाने ती आपोआप डोळे उघडते आणि समोर तो गात चहाचा कप समोर धरून वाकून उभा असतो!
ती हसून तो घेते..त्याचं गाणं संपतं!
'कधीपासून हे हसू तुझ्या चेहऱ्यावर बघण्यासाठी प्रयत्न चालू आहेत माझे..आज कामियाबी हासिल हुई!'
'काहीही हा तुझं..पण खरंच खूप सुंदर जागा आहे ही..इथे असं बसून अगदी प्रसन्न वाटतंय..'
'मग..?! मी सांगत होतो ना..अगं अशा छोट्या-मोठ्या जंगलांमध्ये मी जाऊन आलो आहे. ह्या निसर्गाच्या सानिध्यात कुठेही प्रसन्नच वाटतं..आणि ह्या शुद्ध हवेनी तुझी तब्बेत पण किती छान होईल बघ..चांगले विचार येतील आणि आपलं पिल्लू अगदी तसंच सुदृढ जन्माला येईल!'
'हो रे..इथे खरंच खूप फ्रेश वाटतं आहे मला..नाहीतर त्या शहराच्या धुळीत गुदमरल्यासारखं व्हायचं हा पोटात असल्यापासून!'
'हा..? ही म्हण..'
'हो रे बाबा..ही..खुश..?'
'ती झाल्यावर एकदम खुश!'
इतक्यात रेवा समोर बघून दचकते..
'काय गं..?'
'अरे ते बघ..घुबड आहे ना त्या पलीकडच्या झाडावर..?'
'इतकंच ना..हो..काय क्युट आहे ना..?'
'घुबड आणि क्युट..? हा आवाज त्याचाच आहे का रे..?'
'हो..'
'आजी म्हणायची हा आवाज ऐकणं म्हणजे अपशकुन असतो..'
'वेडी आहेस का.? इंग्लड मध्ये घुबड विद्वत्तेचं लक्षण मानतात..आणि तुमचं काय..? अपशकुन म्हणे.. बघ हा...ते रागावून येईल तुझ्याकडे'
'त्याला कशाला मी दिसेन, घुबडांना दिसत नाही दिवसा..'
'अज्ञान अज्ञान! कोणी सांगितलं हे.? त्यांना चांगलं दिसतं दिवसा!'
'चल..मस्करी करतोस ना माझी..?'
'नाही गं बाई..खरंच त्यांना दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला दिसतं..फक्त रात्री जास्ती चांगलं दिसत आणि तेव्हा त्यांच्या शिकारीला दिसत नाही आणि त्याचा फायदा ते घेतात..म्हणून रात्री शिकार करतात..'
'ए खरंच का रे..? म्हणजे ते खरंच बघत आहे आपल्याला आत्ता..?'
'अगं हो बाई..चल तिकडे जाऊन सेल्फी काढूया का त्याच्याबरोबर..? चल चल'
'जा तूच..मी जाते आत..उगच मला घाबरवतोस..'
इतकं म्हणून ती उठून आत जाते..आणि अनिल तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत हसत असतो!
दोन-तीन दिवस छान जातात..अनिलचं कामही सुरळीत सुरू असतं, रेवाची तब्बेतही अजिबात कुरकुर करत नसते..फक्त अजून तिला सोबतीला कोणी मिळालेलं नसतं..
चौथ्या दिवशी अनिलला जंगलाच्या दुसऱ्या टोकाच्या चेक पॉईंटला रिपोर्ट करायचं असतं..तो तसं रेवाला सांगतो..
'काय रे..लगेच उद्याच..?'
'अगं हो..जरा अर्जंट आहे..'
'अजून सोबतीलाही कोणी नाही..तुझं असंच असतं नेहेमी..'
'शेवटी मी अनिल आहे ना! क्षणात इकडे..क्षणात तिकडे! हा जाऊन आलो..आणि काही लागलं तर गार्डचा नंबर आहेच..त्याला कळव.'
दुसऱ्या दिवशी सकाळीच तिथली गाडी त्याला न्यायला येते..
'संध्याकाळी कदाचित थोडा उशीर होईल, पण मी लवकर यायचा प्रयत्न करतो' असं रेवाला सांगून तो लवकर निघतो..
रेवलाही आता थोडी सवय होत असते..दिवस कामात कसा जातो कळतही नाही..दुपारी वामकुक्षी उरकून ती चहा आणि नवीन नवीन शिकलेलं शिवणकाम करत बाहेर बसते..काही वेळाने तिला
थोड्या अंतरावर हलचाल जाणवते..ती काहीवेळ निरखुन बघायचा प्रयत्न करते पण तिला काही दिसत नाही..ती पुन्हा कामात मग्न होते..काही वेळाने पुन्हा हालचाल जाणवते..आणि माणसाचा आवाज ऐकू येतो..
आता मात्र ती सावध होते..ती आत जाते दार लावून घेते आणि सिक्युरिटी पॉईंटला फोन करते..पण गार्डच्या म्हणण्याप्रमाणे त्याने कोणालाही आत सोडलेलं नसतं..पण तो तरी तिला यायचं कबूल करतो..ती अनिलला फोन करायचा प्रयत्न करते..आता दिवस मावळलेला असतो..पण अनिलचा फोन काही लागत नाही..
काही वेळात दारावर टकटक असा आवाज येतो..
ती क्षणभर घाबरते..पण लगेचच गार्डचा आवाज येतो आणि ती दार उघडते..गार्ड तिला सांगतो की त्याने सगळीकडे बघितलं आहे, एका ठिकाणी पायाचे ठसे दिसले पण आसपास कोणी माणसं नाही, ती गेली असतील असा अंदाजही तो वर्तवतो आणि तिला दार बंद करायला सांगतो.
थोडावेळ तो तिथेच बाहेर बसून रहातो..पण काही हालचाल न जाणवल्याने तो तिला सांगून निघतो आणि आसपास पुन्हा एक चक्कर मारून जातो..
तो जातो आणि अनिलचा फोन येतो..त्यांची गाडी एक दलदलीच्या ठिकाणी अडकली असल्याने त्यांना पुढे चालत त्या पॉईंट पर्यंत जावं लागलं आणि आता त्याला सकाळशिवाय परत येता येणार नाही असं तो सांगतो…ती त्याला लवकर ये इतकंच सांगते..
मनातून मात्र घाबरलेली असते..
आता मिट्ट काळोख झालेला असतो..
ती पुस्तक घेऊन वाचत बसते..आणि विचार न करण्याचा प्रयत्न करते..
थोडा वेळ शांततेत जातो..
आणि अचानक तिला परत तोच आवाज ऐकू येतो!
घुबडाचा आवाज..
आधी तिला भास वाटतो, पण थोड्यावेळाने पुन्हा तोच आवाज ऐकू येतो..
आणि आजीचे शब्द आठवतात..'अपशकुन'!..
तिच्या मनात चर्रर्र होतं..ती देवाचं नाव घेते..
काहीवेळ पुन्हा शांतता..
पुन्हा घुबडाचा आवाज…
इकडे दोन लोक चोरी करायला त्यांच्या घराभोवती आलेले असतात..
सुरवातीला तिला बाहेर बघून ते चरकतात..मग गार्ड येतो..
त्यामुळे ते एका झाडावर चढून बसतात..
बसल्याबसल्या त्यांनाही घुबडाचा आवाज येत असतो..
त्यावर तेही कुठल्या अपशकुनी दिवशी बाहेर पडलो असा मनात विचार करत असतात..
जशी रात्र चढते तसे ते खाली उतरतात तेवढ्यात परत गार्डच्या बाईकचा आवाज कानावर येतो..ते परत वर चढतात..
अनिलचा निरोप मिळल्याने गार्ड पुन्हा रेवाकडे जायला निघालेला असतो..
इकडे रेवा डोळे मिटून बसलेली असते..इतक्यात दारावर पुन्हा टकटक होते..आता मात्र ती पूर्ण भेदरलेली असते..इतक्यात पुन्हा गार्ड तिला हाक मारतो आणि तिच्या जीवात जीव येतो..
तरी ती दार उघडत नाही..आतूनच त्याच्याशी बोलते..
तो ही तिला मी पहाटेपर्यंत थांबतो आहे बाहेरच, तुम्ही निश्चिन्त झोपा असं सांगतो..
हे लोक लांबून कानोसा घ्यायचा प्रयत्न करत असतात पण काहीच आवाज येत नाही..ज्या अर्थी गार्डच्या बाईकचा आवाज आला नाही त्या अर्थी तो तिथेच थांबला आहे असं ते समजतात..त्याच्याकडे असते बंदूक त्यामुळे ह्यांना पळून जायची सोयही उरत नाही..
फुकट अडकलो अशी त्यांच्यात चर्चा सुरू असते..मग थोडावेळ ते नशिबाला आणि घुबडाला दोष देण्यात घालवतात व काही वेळाने त्यांना तिथेच झोप लागते..
इकडे रेवा मात्र मधेच दचकून जागी होत असते..घुबडाच्या आवाजाने…पण मग ती दरवाजाकडे बघते..तिला बाहेरच्या आकृतीवरून गार्ड बसलेला आहे असं दिसतं व ती पुन्हा झोपायचा प्रयत्न करते..
रात्र सरत जाते..काहीच हलचाल होत नाही..सूर्योदय होतो आणि गार्ड  रेवाला उठवतो आणि जाऊ का असं विचारतो..
ती त्याला थांबायला सांगते..पटकन चहा करते..
त्याला पाणी आणि चहा देते व त्याचे आभार मानून त्याला जायला सांगते..
आता उजाडू लागलेलं असतं..
गार्डच्या बाईकच्या आवाजाने झाडावरचे दोघेजण जागे होतात..एक तर पडता पडता वाचतो..
ते परिस्थितीचा अंदाज घेतात..आणि काय करावं ह्यावर थोडी कुजबुज करुन पुन्हा खाली येतात..ह्या वेळी मात्र त्यांनी पूर्ण दक्षता घेतलेली असते आवाज न करता जाण्याची..
आणि अचानक पुढचा चालता चालता थबकतो..
पुन्हा घुबडाचा आवाज येतो..
'चल बे आता दिवस उगवलाय..'
'अरं पन म्हणून अपशकन टळतो व्हय..?'
'तू चल..पैकं गावल्यावर न्हाई आठवायचा अपशकन..'
दोन चोर चोरपावलांनी रेवाच्या घराजवळ येतात…
खिडकीतच घुबड त्यांची वाट बघत असतं..
पुढचा परत घाबरतो आणि मागे जातो..
'अरं मर्दा त्याला दिसत नसतंय आता..आपन त्याला काई नगं करायला. हाय काय नाय काय! आता बोलू नगं..'
दुसरा त्याच्या कानात कुजबुजत त्याच्या पुढे होत म्हणतो..
ते हळू हळू पुढे जात असतात..
इकडे रेवा बऱ्यापैकी सावरलेली असते..अनिलचा फोन येऊन जातो, तो निघालेला असतो, त्यामुळे तिला हायसं वाटत असतं..
पण पुन्हा घुबडाचा आवाज येतो..
ती पुन्हा विचार झटकायचा प्रयत्न करते..अनिलने सांगितलेली माहिती आठवते..व दोघांसाठी नाष्टा करायला लागते..
इकडे चोर पुढे सरसावत असतात..
ते खिडकीजवळ येतात..पलीकडच्या खिडकीतलं घुबड येऊन त्या खिडकीवर बसतं..पुढचा चोर त्याला हाताने हकलवायचा प्रयत्न करतो..पण ते काही हलत नाही..
रेवाला खिडकीपाशी काहीतरी आवाज आल्याची चाहूल लागून ती खिडकीकडे जायला निघते..
इकडे चोर घुबड घालवायला काठी-दगड बघायला खाली वाकतो..दुसरा तर घुबडाला बघून आधीच दोन पावलं मागे झालेला असतो..
तेवढ्यात रेवा खिडकीपाशी येते..तिला पक्षाची आकृती दिसते व क्षणात पक्षी उडून गेल्याचं दिसतं..त्यामुळे ती खिडकी उघडते..
बघते तर काय तोवर घुबडाने त्या माणसाच्या अंगावर झेप घेतलेली असते..समोर दोन माणसं आणि त्यात घुबड बघून ती खूप घाबरते..
इतक्यात त्या माणसाने घुबडाचा वार चुकवलेला तिला दिसतो..हे सगळं बघून दुसरा माणूस पळायला लागतो, पहिला त्या घुबडावर दगड मारायचा प्रयत्न करतो..पण घुबड झप झप करत त्याच्या दिशेने झेपावतं व अगदी त्याच्या बाजूने पुढे जातं...असं चार-पाच वेळा होतं व शेवटच्या फेरीत ते आपली चोच त्याच्या डोक्यावर मारतं..
क्षणात तिथून रक्त वहायला लागतं..व तो चोर जिवाच्या आकांताने पळायला लागतो..घुबड त्याचा पाठलाग करत जातं..
रेवा हे सगळं जीव मुठीत घेऊन बघत असते..अगदी खिडकीतून वाकून ते दिसेनासे होईपर्यंत बघत असते..
शेवटी ते दिसेनासे होतात..
ती क्षणभर भांबावते, मग लगेच जाऊन गार्डला फोन करून सगळं सांगते..तोही तिला दारं-खिडक्या लावून घ्यायची सुचना देऊन कामाला लागतो.. रेवा स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिते..
तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज येतो..
अनिल परत आलेला असतो..
रेवा दार उघडते आणि त्याच्या कुशीत शिरते..त्यालाही एकदम काही कळत नाही..एवढ्यात फोन वाजतो..अनिल फोन घेतो, गार्डचा फोन असतो..झालेली सगळी हकीकत तो अनिलला सांगतो व त्या चोरांना पकडल्याचंही सांगतो..
पुढील प्रक्रियेची चौकशी करून अनिल फोन ठेवतो..रेवाला सांगायला म्हणून वळतो तर रेवा तिथे नसतेच..तो पटकन गॅलरीत जातो तर रेवा तिथे उभी असते..समोर बघत..
समोरच्या झाडावर तेच घुबड असतं..
काही अपशकुन शकुनात बदललेले असतात..
आणि काहींसाठी मात्र अपशकुन ही व्याख्या आणखी दृढ झालेली असते..
©कांचन लेले
Photo Credits - Sameer Dixit

Thursday 3 August 2017

श्वास...

अंधार…
गडद अंधार…
काळा रंग…
भोवळ येण्याइतका जर्द काळा..
अस्तित्वाची जाणीव हळू हळू होऊ लागली होती..
डोळे किलकिले होत होते.. त्यातूनही अंधारच दिसत होता..
मग हळू हळू आवाज कानी येऊ लागले..
सुरवातीला बारीक..मग थोडा मोठा एकसारखा आवाज 'कींssss' फोन बिघडल्यावर येतो तसा…मग आणखी मोठा झाला..
दिसत काहीच नव्हतं…
अंधार..
गडद अंधार..
सगळं असहाय्य होऊन मी जोरात ओरडलो..
क्षणभर थांबलो, मला जाणवलं मी ओरडल्याचा आवाजही नाही आला मला… मी पुन्हा ओरडलो.. जिवाच्या आकांताने..
तरी तेच… मग काही वेळ असाच गेला..
डोळे मिटून पडून राहिलो..
मिटले काय, उघडले काय..? दिसत होता अंधारच…
आणि हळू हळू पुन्हा तोच आवाज 'कींSSS'..
हळू हळू मोठा होणारा..
पुन्हा डोळे किलकिले..ह्या वेळी मात्र दिसणाऱ्या रंगात थोडा बदल..
काळा रंग हळू हळू नाहीसा होत होता..
'कीं SS' चा आवाजही हळूहळू कमी होत होता..
मी पुन्हा जोरात ओरडलो.. संयम मुळातच नव्हता माझ्या अंगी..पण जरा थांबलो असतो तर चित्र स्पष्ट झालं असतं..पण नाही..
ओरडलो..
ह्या वेळी माझा आवाज मला आला..
पण, हा आवाज माझ्यासारखा वाटणारा, पण माझा नव्हता! ओरडण्याचाही नव्हता..
रडण्याचा होता… माझ्या वडिलांचा होता…
ह्या विचाराने मनावर काटा आला… अंगावर येणं शक्य नव्हतं..
एव्हाना अंधार नाहीसा झाला आणि उजेड केव्हा आला कळलंच नाही.. उजेड नाही..
पांढरा रंग..
पुन्हा तसाच.. गडद..
आणखी पांढरा होत जाणार…
जर्द पांढरा…
हळू हळू पूर्ण पांढरं असणारं चित्र धूसर होत गेलं.. आणि दिसू लागल्या आकृती..
पांढरा रंग कायम..
एक मृतदेह मधोमध.. ठिकाण ओळखीचं.. माणसांचे चेहरे अजूनही अस्पष्ट… पण त्या प्रेताचा चेहरा स्पष्ट.. निर्विकार.. ओळखीचा..
ते घरही ओळखीचं..
थोडा ताण दिला.. आणि कळलं माझाच मृतदेह होता तो..
माझ्याच घरात…
शेजारी मगाशी आलेला आवाज असणारे माझे वडील..टाहो फोडत होते.. ज्या माणसाला उभ्या आयुष्यात मी तोंड पाडलेलंही बघितलं नाही, तोच माणूस छाती बडवून रडत होता.. माझ्यासाठी..
पण मी असूनही नव्हतोच तिथे.. होतं फक्त शरीर माझं.. निर्विकार..
दुसऱ्या बाजूला एक चेहरा.. जो दिसल्यापासून कधी नजरेवेगळा केला नाही.. प्रेमच होतं तितकं.. माझी बायको..आशु.. ती मात्र शांत..
आणी माझ्यासारखीच निर्विकार.. फक्त जिवंत असून..
एकटक बघत होती माझ्याकडे.. तिला नेहमीच आवडायचं माझ्या डोळ्यात बघत रहायला… पण आज तेच डोळे मिटले होते.. तरी ती बघत होती एकटक… एकही शब्द न बोलता.. एकही अश्रू न ढाळता..
शेजारच्या खोलीतून आवाज येत होता खिदळण्याचा..
एक अश्राप जीव..
माझाच अंश.. मस्त खेळत होता त्याच्या आजीशी..
आई किती खमकी आहे हे आज पुन्हा जाणवलं मला..
तिचे डोळे तसेच निर्विकार.. अधूनमधून अश्रुधारा.. आणि नातवाचं लक्ष दुसरीकडे वळवून ते पुसायची केलेली केविलवाणी खटपट..
ती त्याच्यात मलाच शोधत होती.. मधेच त्याला कवटाळत होती..
तोही एक गोड पापा तिच्या गालांवर देऊन पुन्हा खेळू लागत होता..
एवढ्यात मला आवाज आला..
'का केलंस असं अभी..? मलाही सांगावंसं नाही वाटलं का रे तुला..?
इतकी परकी होते का रे मी..? सगळं छान आहे असं दाखवत का राहिलास..? म्हणून मला माहेरी जाऊन ये म्हणालास..? दे ना ह्या सगळ्याची उत्तरं..उठ ना अभी….'
मी बायकोकडे बघितलं… एक शब्दही नव्हता काढला तिने.. पण आता मला तिच्या मनातलंही ऐकू येऊ शकत होतं.. आता मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.. पण नजर तशीच एकटक माझ्यावर रोखलेली..आणि शरीर जिवंत असूनही निश्चल…
इतक्यात बाहेर हालचाल झाली.. काही मंडळी आत आली..
चेहरे हळू हळू स्पष्ट होत होते..
'बाबा SS' … दादूचा आवाज… चेहरा अजूनही अस्पष्ट..पण दादूच होता नक्की… बाबांना जाऊन बिलगला.. दादू.. माझा हिरो..
माझा आयडियल बिग ब्रदर.. आता वाटतं, एकदा दादूला फोन केला असता तर..? त्याने सगळं नीट केलं असतं.. फक्त कामामुळे लांब रहात होता तो..पण मनाने अगदी जवळ आम्हा सगळ्यांच्या..
आज तोच माझा खमका हिरो दादू रडत होता बाबांना मिठी मारून..
काय केलं हे मी…?
स्वतःचं रडणं थांबण्यासाठी इतका स्वार्थी झालो मी..?
बसलेल्या लोकांचे चेहरे स्पष्ट होत होते..
माझे भाऊ, बहिणी, जुन्या ऑफिस मधले कलीग..
बाहेर एकीकडे डोळे पुसत तिरडी बांधणारे मित्र.. खरंच जीवाला जीव देणारे मित्र.. नाही.. आज मीच त्यांच्यावर अविश्वास दाखवला आहे.. जीवाला जीव देणारे होते मग का नाही मी त्यांना विश्वासात घेऊ शकलो..? का…?
इतक्यात एक गाडी येऊन थांबली..
एक बुजुर्ग व्यक्ती उतरली.. देशमुख सर…
माझे शिक्षक..शाळेचे मुख्याध्यापक.. आणि बाबांचे जिगरी दोस्त..
त्यांच्या शिकवणीत लहानाचा मोठा झालेलो मी.. कुठे कमी पडले ते शिकवण्यात..? किती अभिमान होता त्यांना माझा..
मी इतका करंटा कसा निघालो..? काय वाटत असेल आज त्यांना..?
आवाज वाढु लागले..
सगळे रडण्याचे.. सांत्वनाचे शब्दही फिके पडत होते..
आवाज वाढत होते.. असहाय्य होण्याइतके वाढत होते..
मी पुन्हा दोन्ही हात कानावर ठेऊन ओरडलो 'थांबाss'
पण आवाज आलाच नाही.. घशातून निघालाच नाही..
मी मात्र आणखी केविलवाणा..
आता वाटत होतं परिस्थिती बिकट नक्कीच होती, पण एकदा बोलायला हवं होतं.. कोणाशीही.. कोणीही समजून घेतलं असतं आपल्याला… आपणच दोन वेळा दोघा मित्रांना ह्यापासून परावृत्त केलं होतं.. मग आज तसंच कोणी आपल्यालाही केलं असतं..
परिस्थिती सुधारली असती.. आणि अगदी नसती लगेच सुधारली तरी तशाही परिस्थितीत मला कोणी सोडून, टाकून गेलं नसतं..
नाहीच.. हे तेव्हा का नाही कळलं.. माझे झाले त्यापेक्षा कैकपटीने हाल हे सगळे लोक ह्या क्षणी भोगत होते..बघवत नाही मला…
'थांबाSSS'
मी सैरावैरा पळत होतो.. एकेकापुढे जात होतो..
'बाबा..नका रडू.. दादू.. नको ना रे.. हस ना पुन्हा पहिल्यासारखा..'
माझे शब्द फुटतंच नव्हते..
मी आईपाशी गेलो.. अर्णव, माझं पिल्लू.. त्याच्या डोक्यावर हात ठेवताच तो आरपार गेला.. पुन्हा प्रयत्न केला..तरी तेच.. मग आईचे गुडघे धरुन हलवलं तिला..म्हंटलं 'बघ ना माझ्याकडे एकदा तरी..' तिने हात पुढे केला.. आणि अर्णवच्या डोक्यावरुन फिरवला..
'अभी..' असे अस्पष्ट शब्द तिच्या तोंडून आले.. तिला कळलं होतं का माझं अस्तित्व..?
'अभिजीत असं नाव ठेवलं रे तुझं.. असा हरून का गेलास…?'
तिने एक शब्दही काढला नव्हता..तिचं मन बोलत होतं..
तिने चटकन अर्णवला कवटाळलं..
मी पुन्हा हतबल होऊन बाहेर आलो..
'आशु.. तू तरी ऐक ना गं माझं..'
तिची नजर माझ्या शरीरावर स्थिरावलेली..
माझ्या भिरभिरणाऱ्या आत्म्याची मात्र तिला जाणीवही नाही..
मी पुन्हा बघितलं स्वतःकडे..
दोन हात - दोन पाय - एक तोंड.. सगळं तर होतं..
का नव्हतो दिसत कोणाला मी..
मी पुन्हा जिवाच्या आकांताने ओरडलो..
'आशुSSSS' … आवाज आला फक्त रडण्याचा.. इतरांच्या..
वाढत गेला.. मी पुन्हा स्वतःकडे बघितलं.. मग माझ्या निपचित पडलेल्या शरीराकडे बघितलं..
शरीर अजूनही शाबूत..
नव्हता फक्त श्वास,
त्यात जीव आणणारा...
©कांचन लेले

Image Source - Internet

Sunday 30 July 2017

उधळण...!


कधी कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं जर वेड असेल तर त्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. किंवा ते वेड तुम्हाला खेचून घेतं असं म्हंटलं तरी वावगं ठरू नये..शेवटी बाबासाहेबांनी शिवकल्याण राजा मध्ये म्हणूनच ठेवलं आहे, 'वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही!'..आपल्याला काही इतिहास घडवायचा नाही, पण असो! 
तर काल संध्याकाळी काम आटपून असाच बसलो होतो. सहज बाहेर लक्ष गेले. पावसाने जरा विश्रांती घेतली होती. मस्त वारं सुटला होते. थोडे थोडे निळे आकाश दिसत होते. हे वातावरण म्हणजे 'between the lines' म्हणतात तसं म्हणायला हरकत नाही..कोसळणाऱ्या पावसाचं सौंदर्य सगळ्यांनाच दिसतं..पण ह्या वातावरणातही एक वेगळंच सौंदर्य दडलेलं आहे..आणि त्याच सौंदर्याच्या ओढीने पटकन गाडी काढली, बायको (कॅमेरा)ला बरोबर घेतले आणि पटकन ARAI टेकडी गाठली. पावसामुळे गर्दी कमी होती. असलं भारी वाटलं...! आणि जरा दृष्टी फिरवली तर निसर्गाचे अनोखे रुपडे दिसत होते. 
मधे निळे, मधेच काळे, त्याच्या बरोबर मधेच सांजवेळेचा केशरट पिवळा,  खाली धरतीच हिरवा अशी सुरेख रंगात माखलेली सृष्टी दिसत होती!
मागच्या बाजूला गेलो. बोटावर मोजण्या एवढीच लोक होती. प्रचंड भारी वाटत होते. फोटो काढून घेतले. नंतर एका दगडावर जाऊन शांत पणे  निसर्गाचा अनुभव घेत बसलो. हा सुद्धा 'between the lines' आनंद असतो बरं का! 
देवही आपल्या आकाशरूपी कॅनव्हास वर मुक्त हस्ताने ब्रश फिरवत होता, निराळे रंग दाखवत होता. एकूणच मस्त वाटत होतं... मधेच एक पावसाची छोटी सर आली. जणू त्या चित्राला मिळालेली उत्स्फूर्त दादच! तीही एका वेगळ्याच आनंदात न्हाऊ घालून गेली!

'आयुष्याची आता, झाली उजवण।
येतो तो तो क्षण अमृताचा..'

 बाकीबाब यांचे शब्द आपोआपच कानात रुंजी घालू लागले...

'संधीप्रकाशात अजून जो सोने,
तो माझी लोचने मिटो यावी..'

 खूप शांत वाटत होतं. आनंद म्हणजे वेगळा काय असतो..? 
बाजूला गायी मस्तपैकी चरत होत्या. कुठलं दडपण नाही-व्यथा नाही, निसर्गाच्या कवेत, त्यानेच मांडलेल्या मेजवानीचाच जणू आस्वाद घेत होत्या..!
अशा रम्य वातावरणात तृप्त न वाटेल तरच नवल!
वेळ पुढे सरकत होती तसे रंग पालटत होते..एका वेगळ्या दुनियेला उजळून टाकायला, तेही प्रवास करत होते..
आणि ते परत येईपर्यंत आपल्यावर पांघरूण घालायला मागून आला अंधार.. त्यातही एक वेगळंच सौंदर्य आहेच की! शेवटी काळा हा सुद्धा रंगच आहे ना!
मग मनाचे काही तुकडे झाले…एक तुकडा त्या जाणाऱ्या रंगांबरोबर गेला..दुसरा गाईंबरोबर त्यांच्या घरी निघाला..तिसरा माझ्याबरोबर माझ्या घरी निघाला आणि चौथा मात्र त्या अंधाऱ्या सौंदर्याचा आनंद घेत आणि घेतलेला अमृतानुभव गाईंसारखा रवंथ करत तिथेच घुटमळला..!

©कांचन लेले






Photo & Write-up Concept Credit - स्वप्नील भदे

Wednesday 26 July 2017

अंगणी पारिजात फुलला!


'अंगणी पारिजात फुलला..'
गाणं रेडिओ वर वाजत होतं..
पहाटेकडून सकाळकडे जाणाऱ्या प्रहरात पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडत होता..
आणि गाण्याच्या प्रत्येक ओळीला खिडकीबाहेरील पारिजातकाची काही फुलं गळुन पडत होती..
पारिजातक म्हणजे इन्ट्रोव्हर्ट माणसासारखं वाटतं मला..
एरवी अख्खं जग सूर्याच्या आगमनाने जागं होतं..पण हे मात्र सगळं जग शांत झालं की रातराणीच्या सुगंधाने जागं होतं!
रात्रीच्या कुशीत फुलणारं..पहाटेचं तांबड फुटल्यावर बहरणारं..
आणि दिवस सुरू झालं की मात्र गळून पडणारं..आगळंच झाड!
'बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला..पारिजात फुलला'
जयमालाबाई गातच होत्या..
झाडावरुन पडणाऱ्या आणि पडायची वाट बघणाऱ्या फुलाच्या मनात काय विचार असतील असा विचार सहज मनात येऊन गेला..
काही फुलं नुसतीच खाली गळून पडतात..काही पडलेली फुलं वेचली जातात..पुढे एखादीच्या केसात माळलेली दिसतात..झाडावरची काही फुलं तोडून पूजेसाठी नेली जातात..
तर काही फुलं नुसतीच ओंजळीत घेऊन प्रिय व्यक्तीवर बरसली जातात..प्रेमाचा नाजूक सुमन वर्षाव!
पण खरं सौंदर्य असतं ते पडलेलं फूल तसंच रहाण्यात..
त्यात प्रत्येक पडणाऱ्या फुलाची भर पडण्यात..
आणि काही वेळा नंतर अगदी पायघड्या घालाव्या तसा सुंदर सडा तयार होण्यात…
काही तासांचं आयुष्य त्या नाजूक कोमल फुलाचं..
पण किती आयुष्यांमध्ये बहर आणून जातं..नाही..?!
आपल्याला मिळतात अनेक दिवस-महिने-वर्ष…
खरंच त्याचा उपयोग करतो का आपण…?
'धुंद मधुर हा गंध पसरला, गमले मजला मुकुंद हसला,
सहवासातून मदीय मनाचा कणकण मोहरला..
पारिजात फुलला…'
रेडिओवरचं गाणं आणि परिजातकाचा सुंदर बहर अंताकडे मार्गस्थ होत होता…आणि दुनिया धावत्या आयुष्याची वेगवान सुरवात करण्यात मग्न होती…©कांचन लेले


Photo Credit - Swapnil Bhade

Saturday 24 June 2017

अन्नपूर्णेश्वर!

ऐकून जरा नवल वाटलं का..? नाही..परत वाचू नका..योग्य तेच वाचलत.. हो..अन्नपूर्णेश्वर!
जन्माला आल्यापासून सर्वसाधारणपणे आपण कायम अन्नपूर्णा म्हंटलं की आई, आजी, काकू, मामी, आत्या, ताई इत्यादी इत्यादी शा बायकांनाच बघत असतो..आणि मग जरा मोठं झाल्यावर, बाहेर पडायला लागल्यावर, इडियट बॉक्स नामक यंत्र वापरल्यावर आपली ओळख होते ती या अन्नपूर्णेश्वरांशी! म्हणजेच थोडक्यात स्वयंपाक करणाऱ्या पुरुषांशी!
अगदी मोजक्या काही घरांचं उदाहरण वगळता तसं बघायला गेलं तर पुरुष स्वयंपाक करत नसतात..किंवा माझ्या लहानपणी तरी असं चित्र दिसलं तर ते पाप समजलं जायचं! असो! हल्ली जरा चित्र बदलताना दिसतं आहे ( टचवुड ;) ) तर..मूळ मुद्द्याकडे येताना..घरात पुरुष किती काम करतात  ते जाऊदे, पण बाहेर खाण्याची वेळ येते तेव्हा समस्त खाबूमोशाय अर्थात खाद्यप्रेमी वर्ग पसंती देतो ती पुरुष आचाऱ्यांना..अर्थातच पुन्हा पुरुष प्रधान संस्कृतीच कारणीभूत असू शकते कारण बायकांनी बाहेर जाऊन 'असलं' काही केलं की घरचा उद्धार वगैरे वगैरे..असो..आपल्याला त्यात पडायचंच नाही!

आपल्याकडे पूर्वीपासून स्वयंपाक कसा चांगला होतो याचं एक रसायन सांगितलं जातं…ती थियरी म्हणजे 'माँ का प्यार!'
अर्थात प्रेमाने, ममत्वाने स्वयंपाक केला आणि नुसता केला नाही तर तितक्याच प्रेमाने खाऊ घातला की तो चविष्टच असतो ही आपली संस्कृती…आणि अर्थात ममत्व पुन्हा साधारणतः महिलांशीच निगडित..तर ह्याच भावनेच्या संदर्भाने अन्नपूर्णेश्वरांचे तीन प्रकार पडतात…
आता काही वेळेला विक्रेते असतात ते घरुन जिन्नस आणून मग विकतात..उदा. इडली वडा विकणारे अन्ना..तर दुसरा प्रकार म्हणजे स्वतः बनवून विकणारे..इथेही उदा. अन्नाच असू शकतो पण तो डोश्याची गाडी लावणारा..
तर अन्नपूर्णेश्वरांचे तीन प्रकार असे!

पहिला प्रकार म्हणजे प्रेमाने खायला घालणारे..
लहानपणी शाळेच्या बाहेर एक वडापाववाला असायचा..बाबू..शाळा सुटली रे सुटली की त्याच्याकडे  अलोट गर्दी असायची..हा बाबू म्हणजे पहिल्या प्रकारात मोडणारा..प्रेमाने खायला घालणारा…कितीही गर्दीत मी गेले तर फक्त चेहरा बघून चटणीने ओसंडून वाहणारा भजी पाव हातात..त्याला बरोब्बर माहिती असायचं मला ती चटणी फार आवडते..! दुसरं उदाहरण म्हणजे
हल्ली सकाळच्या कॉलेजला जाताना स्टेशनजवळ एका अन्नाकडे खाणं होतं…हा सुद्धा पहिल्या प्रकारात मोडणारा बरं का..
सुगरण गृहिणीचं जेवणाऱ्या माणसाच्या ताटाकडे बरोब्बर लक्ष असतं…पानातला जिन्नस संपायच्या आत तो ताटात वाढुन मोकळ्या होतात..तसच या अन्नाचं बरोब्बर लक्ष असतं..ताटातली चटणी संपली की आपण त्याच्याकडे बघायची खोटी..वाढून मोकळा..ती सुद्धा हिरवी हवी की लाल हवी आणि कुठली किती हवी ते
ही त्याला बरोब्बर कळतं..कसं देव जाणे!
तर हे असे प्रेमाने वाढणारे अन्नपूर्णेश्वर प्रकार एक!

दुसरा प्रकार म्हणजे आवडीने व्यवसाय करणारे..
म्हणजे आवडीने इंजिनियरिंग करणाऱ्या मुलांसारखं म्हंटलं तर वावगं ठरू नये! ह्या प्रकारातले लोक मेहनती असतातच पण ते स्वतःच्या व्यवसायाला कमी किंवा तुच्छ अजिबात लेखत नाहीत..आहे त्यात अगदी आनंदी असतात..!
आमच्याकडे खूप वर्षांपासून घराजवळच्या एका गल्लीत एक शेवपुरीवाला भय्या संध्याकाळी गाडी लावतो..गाडी म्हणजे तरी काय..एक स्टँड आणि त्यावर पाणीपुरीची पुरी वरून थोडी फोडली आणि उभी ठेवली की जशी दिसेल तसं दिसणार भांड, ज्यात त्याची सगळी सामग्री कशी काय बुवा मावते हा गहन प्रश्नच आहे!
तर हा भय्या म्हणजे एकदम मस्त..गप्पा वगैरे मारत शेवपुरी बनवणारा..ग्राहकाला आपलंसं करण्याची कला त्याला बरोब्बर अवगत आहे..आणि शेवपुरही भारी असते त्याची, पण क्वचित कधी बिघडलीच तर आम्हीही असुदे..कधीतरी होतंच, आपलाच भय्या आहे, असा विचार करून तीही आनंदाने खातो हे त्याचं यश!
तर हा अन्नपूर्णेश्वर दुसऱ्या प्रकारात मोडणारा!

आणि तिसरा प्रकार म्हणजे 'आलिया भोगासी असावे सादर' असं म्हणत पैशासाठी शुद्ध भाषेत 'धंदा' करणारे लोक, मूलखाचे अरसिक किंवा परिस्थितीपुढे हतबल..!
आमच्या स्टेशनजवळ एक छोटं हॉटेल आहे..आणि बाहेर त्यांचाच पाणीपुरीचा स्टॉल आहे..आता ही पाणीपुरी म्हणजे खास असते..मुंबई स्पेशल थंड पाणीपुरी! आत जाऊन कुपन घेऊन यायचं आणि बाहेर भय्याला द्यायचं..मग तो अष्टकोनी चेहऱ्याने ते घेणार, आपल्याला द्रोण देणार आणि पुन्हा 'काय कटकट आहे' असा चेहरा करून हातात प्लॅस्टिकचे ग्लोव्हज घालून पाणीपुरी द्यायला लागणार…याच्याकडे आल्यावर पाणीपुरीचा मुख्य सिद्धांत खोटा आहे याचा मला साक्षात्कार झाला..ओळखा बरं कुठला..?
भय्याने आपले स्वच्छ-सुंदर हात तिखट पाण्यात बुडवल्याशिवाय पाणीपुरीला चव येत नाही हा!
अप्रतिम चव असते..फक्त त्या भय्याच्या तोंडाकडे न बघता खायचं..तरच!
तर असा हा तिसरा औरंगजेब प्रकार!
म्हणजे एखाद्याला संगीत कळत नसेल तर तो संगीतातील औरंगजेब मानला जातो..तसंच हे खाद्यविश्वातील औरंगजेब म्हणायला हरकत नाही..!

काही ठिकाणी टू-इन-वन पण दिसतं बरं का..मग ते १-२, १-३ किंवा २-३ असं कुठलंही कॉम्बिनेशन असू शकतं!
उदाहरणार्थ..
म्हणजे मालक असतो प्रेमाने खायला घालणारा आणि कामाला असलेला माणूस चौकोनी चेहऱ्याचा..
आमच्याकडे एक भजीची गाडी आहे..राजू भय्याची...तो स्वतः तळणीवर असतो आणि कामाला ठेवलेला मुलगा ऑर्डर बांधून देत असतो..मग गेल्या गेल्या कांदाभजी गरम नाही दिसत, आता काढणार आहात का? सँडविच गरम आहे का? इत्यादी प्रश्न राजुभय्याला विचारून ऑर्डर सांगितली की भय्या तसं त्या माणसाला खुणावतात आणि तो साधारण 'साला इतक्या गर्मीत ह्या वाफा घेत उभं रहायचं आणि त्यात ह्यांची नाटकं' असंच मनातल्या मनात म्हणत असणार अशी आपल्याला खात्रीच व्हावी, इतके समर्पक हावभाव करून ऑर्डर बांधून देतो!

तर असे हे माझ्या निरीक्षणातून आलेले तीन प्रकार..पुढच्यावेळी बाहेर खायला गेलात की नक्की निरीक्षण करुन बघा..नक्की कुठल्या कॅटेगरीत बसतो विक्रेता..की कॉम्बिनेशन असतं..की ह्या सगळ्या व्यतिरिक्तही प्रकार आहेत..वेळ मजेत जाईल आणि खाण्याचा आनंद द्विगुणित होईल..!
तूर्तास थांबते!
खाद्य धर्म, आद्य धर्म…अन्नपूर्णेश्वर सुखी भव!

- कांचन लेले

Thursday 25 May 2017

दर्द


#दर्द
#यादपियाकीआए

दर्द..

'अम्मी..मै खेलने जाऊ..?!'
'साया…और तालीम कौन लेगा..?'
'अम्मी..अभी मुझे खेलने जाना है, मुमताज राह देख रही होगी..'
'फिर वापीस घर मत आना…'
साया रागातच घरात निघून गेली...
अम्मी पुन्हा स्वयंपाकात मग्न झाली..
थोड्या वेळाने दार वाजलं, अम्मीने सायाला दार उघडायला सांगितलं..
'अम्मीss सलीम चाचा और रियाझ आए है!'
अम्मी बाहेर आली..
'अरे चाचा, आओ ना..समान लगवाओ तबतक हम आते है'
'जी..'
सामान लावलं जातं, ताबला-डग्गा घेऊन चाचा बसतात..रियाझ शेजारी बसतो, साया तानपुरा काढून समोर बसते..तेवढ्यात अम्मी येते.. तानपुरा लावते आणि तो सायाकडे देते..
गाणं सुरू होतं..

याद पिया की आये..
यह दुःख सहा ना जाये- हाये राम..

बाली उमरिया सूनी री सजरिया..
जोबन बीता जाये- हाये राम..

बैरी कोयलिया कूक  सुनावे…
मुझ बिरहन का जियरा जलावे..
हाँ पी बिन रहा ना जाये.. हाये राम
याद पिया की आए…

मधे-मधे चाचा दाद देत असतात..आणि गाणं संपतं..
'आज तो कमाल कर दिया बेगम साहिबा…'
'बस, अल्लाह मेहरबान है भाईजान, पर सिर्फ आवाज पे..तकदीर तो खुदा ने ऐसी लिखी की ये दर्द अपने आप गानेमे उतरता है..'
अम्मीचा कंठ दाटून आला..चाचाने घाई घाईने मुलांना खेळायला जायला सांगितलं, सायाला तर कोण आनंद झाला..रियाझचा हात पकडून त्याला ती धावतच घेऊन गेली..

आणि ते गेल्यावर अम्मीने अश्रूंना वाट मोकळी करुन दिली..
चाचा तिला समजावत होते..शांत करत होते..शेवटी सायाकडे बघून सावरायला हवं असं सांगून त्यांनी अम्मीला शांत केलं..
आणि रात्रीच्या मैफिलीची चर्चा करुन निघाले..
खाली रियाझ आणि साया आणखी दोघांबरोबर खेळत होते..
चाचाने रियाझला हाक मारली..तो लगेच यायला निघाला पण सायाने त्याचा हात पकडला आणि चाचांना आणखी थोडा वेळ खेळुदे असं सांगू लागली..चाचाने सुद्धा रियाझला थोडाच वेळ, असं सांगून लवकर घरी यायला सांगितलं..दोघे पुन्हा खेळात मग्न झाले..

चाचाचं घराणं हे अम्मीच्या घराण्याला पिढ्यानपिढ्या साथ करत होते, चाचा ही तिसरी पिढी..आणि आता रियाझ सुद्धा मन लावून चाचांकडे शिकत होता.. सायापेक्षा ५ वर्षांनी मोठा होता..तरी दोघांची अगदी लहानपणापासून खूप छान गट्टी होती..

रात्री मैफिलीची तयारी सुरु होती, अम्मी, तिची बहीण, साया, चाचा आणि रियाझ असे सगळे पोहोचले..जुजबी बोलणं, चहा वगैरे होऊन अम्मी गायला बसली..
मैफिल रंगत होती..सायाला मधेच स्वर लावायला सांगितल्यावर तिच्या आवाजालाही दाद मिळत होती..आणि शेवटी अम्मीने 'याद पिया की आए' गायला घेतली...आणि ती खूप रंगली, अगदी लोकांचे डोळे पाणावले इतकी रंगली..

अम्मी, तिची बहीण आणि सायाला त्यांच्या घरी सोडून चाचा आणि रियाझ घरी गेले..
घरी आल्यावर राहिला मौसिनेही अम्मीचं कौतुक केलं..आणि सायाला तर बटव्यातून शगुन काढून दिला..साया खूप खूष झाली आणि झोपायला गेली..
त्या दिवसानंतर साया अम्मीकडे मन लावून शिकू लागली..रियाझ तिला साथ करु लागला..काही वर्ष गेली..दोघेही आता मोठे झाले होते..
रियाझचं शिक्षणही पूर्ण होत आलं होतं..आणि तबला वादनातही उत्तम प्रगती केली होती त्याने, आणि अशातच सायाची पहिली स्वतंत्र मैफिल करायचा योग आला..आणि अम्मीने रियाझने सायाला साथ करावी असा आग्रह धरला! झालं, ठरलं..सायाची मैफिल आणि रियाझची साथ..
आदल्या दिवशी तालीम झाली..अम्मीने सायाला काय काय गायचं ते सांगितलं, रियाझच्या साथीने ते गाऊन घेतलं..

दुसऱ्या दिवशी सगळे अगदी उत्सुकतेत होते, सायाचा उत्साह तर ओसंडून वहात होता!
आता कार्यक्रम सुरू व्हायला अगदी काही मिनिटं राहिली होती..
साया येऊन बसली, तानपुरा आधीच मिळवून ठेवलेला, तो घेतला..
उजवीकडे रियाझ साथीला बसला..
आणि सायाने डोळे बंद केले..
तिला आठवत होती अम्मीची तीच मैफिल..
शेवटी गायलेलं याद पिया की…
मागे तानपुरा वाजवताना टिपलेले प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे भाव..
काहींचे पाणावलेले डोळे...
गाणं संपल्यावर काही क्षण दाद म्हणूनच आलेली पूर्ण स्तब्धता..
आणि मग 'क्या बात है, सुभान अल्लाह, लाजवाब.. जिती रहोचे घुमलेले आवाज..
तिने मनोमन ठरवलं होतं..आज तेच सगळं ती पुन्हा उभं करणार होती.. अम्मीचं नाव रोशन करणार होती..
आणि या निग्रहानेच तिने डोळे उघडले..
स्वर लावला आणि गायला सुरवात केली..
दाद चांगलीच मिळत होती, तिचा पहिला कार्यक्रम, तसं लहान
वय आणि अम्मीची मुलगी म्हणून दाद जास्ती होती..
आवाज उत्तम होता, फिरत सुंदर होती, रागज्ञान उत्तम होतं..

आणि हळूहळू मैफिल शेवटाकडे आली..
अम्मीने तिला भैरवीतली एक बंदिश म्हणून शेवट करायला सांगितला होता..पण आयत्या वेळी सायाने 'याद पिया की आए' गाऊन शेवट करते असं जाहीर केलं..अम्मीची नाराजगी तिला दिसत होती, तिने नको अशी केलेली खुणही तिला तिरक्या नजरेने दिसली, पण तिने डोळे बंद केले आणि गायला लागली..

याद पिया की आए…

अधून मधून ती लोकांचे भाव टिपत होती..पण तिची निराशा होत होती..सगळे शांतपणे ऐकत असले, तरी त्या त्यादिवशीचे ते भाव एकाही माणसाच्या चेहऱ्यावर नव्हते..
तिने गाणं संपवलं..टाळ्याही पडल्या..
लोकांनी अम्मीकडे कौतुक केलं, तिला येऊन सांगितलं..
सगळे घरी आल्यावर चाचा म्हणाले, 'बोहोत खूब गाया बेटा, पर तुम्हारे उमर के हिसाब से गाया करो, सूर सही है, बस दर्द आना बाकी है!'
अम्मी चिडली होती..पण काहीच बोलत नव्हती..
म्हणून चाचाने दोघांना दर्ग्याला जाऊन यायला सांगितलं आणि दोघे गेले..

इकडे अम्मीने चचांना रूह अफझा दिलं..आणि दोघे गप्पा मारू लागले..अम्मी म्हणाली
'इसकी मनमानी ना करती तो कितना अच्छा होता..!'
'बच्ची है, समझ आनेमे थोडा वक्त लगेगा..खैर एक बात बतानी थी..रियाझ विलायत जा रहा है..सिखना चाहता है, मैनेभी मना नही किया..'
'ये तो बडी अच्छी बात है..बडा काबिल बनेगा रियाझ..हाए..और एक हमारी लडकी..!'
'जी ये बात तो नामंजूर है..साया बेटी बडी प्यारी है..जिसके नसीब होगी, उसका साया बन के रहेगी..नाम ही ऐसा रखा है!'
'ये सब आपके भाईजान की देन है..ये नई झिंदगी मुझे सोपकर खुद चल बसे अकेले…'
'अब मु कडवा मत करो..खुशी का दिन है, बच्चे आतेही होंगे..'

इकडे दर्ग्याला दर्शन करुन दोघे बाहेरच्या आवारात बसले..
'इतनिभी आझादी नही ले सकते..मै बेटी हू या कटपुतली..?'
'साया..जबान संभालो..'
'इतनाभी क्या गलत किया मैने..? बताओ..?'
'सयानी हो..अब्बाने कहा ना..दर्द आना बाकी है..'
'सयानी..? मोहोब्बत करते है तुमसे..'
'साया..? होश मे हो..?'
'बेशक..वही बताना था..'
'ये अभि मुमकीन नाही है..'
'क्यू..? अभि नही तो कब..?'
'कहा ना सयानी हो अभि..'
'नही..जवाब दो..अभि नही तो कब..?'
'अच्छा..? तो सुनो..जब दर्द आएगा तब..'
इतकं बोलून रियाझ त्याच्या घरी निघून गेला..
काही दिवसातच तो परदेशी गेला..
आणि सायाने त्याला हव्या असलेल्या दर्दचा पिच्छा पुरवायला सुरवात केली..दिवस रात्र रियाज करु लागली..
अशातच तिचा आवाज खराब होऊ लागला..
आणि एके दिवशी पूर्ण बंद झाला…
अम्मीने वेळोवेळी सांगितलं होतं अतिरेक वाईट..पण हिने ऐकलं नाही..
डॉक्टर, हकीम, बाबा होतील ते उपचार सुरू झाले..
साया फक्त तानपुरा घेऊन अम्मीच्या मागे बसू लागली..
उपचारांनी हळूहळू आवाज सुधारू लागला..आता बोलता येऊ लागलं..
आता मात्र तिने अम्मी सांगेल ते ऐकायचं ठरवलं..
नीट तालीम घेऊ लागली..
रियाझची खबर चाचाकडून कळायची..
त्याचंही शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीला लागला होता..
सायाचं ऐकून त्यालाही मनोमन वाईट वाटलं आणि त्यानेही अल्लाकडे दुवा मागितली, की तिचा आवाज पूर्ववत होउदे..पण या पलीकडे काहीही करण्याला तो हतबल होता..
साया आता थोडं थोडं गाऊ लागली...फार उंच आणि फार खाली गाता येत नव्हतं तिला अजून..पण मध्य सप्तकात स्वर स्थिर करायचा प्रयत्न करायची..
अम्मीबरोबर सगळ्या मैफिलींना जायची..
या काळात तिला खरं गाण्याचं आयुष्यातलं महत्व कळलं होतं..
पण ती खचली नाही..स्वतःची चूक सुधारायला झटत राहिली..
आणि हळूहळू तिच्या प्रयत्नांना चांगलंच यश मिळालं..
तिला आता बरंच पहिल्यासारखं गाता येऊ लागलं..
पण ती सध्या बाहेर कुठे गात नव्हती…
आणखी काही दिवस गेले..ह्या सगळ्यात रियाझच्या आठवणींमधून तिला आणखी स्फुरण चढत होतं..कारण तिला गाण्यात तो दर्द हवा होता…
आणि अम्मीची ५०वि सालगिराह जवळ आली..
अम्मीने एक कार्यक्रम करुन सायाला पुन्हा लोकांसमोर आणायचं ठरवलं..या सगळ्यात तिचीही खूप फरफट झाली होती..
पण त्यामुळे तिच्या हाती तिचा हिरा अगदी तावून सुलाखून पडला होता..आणि त्या हिऱ्यालाच आता जगापुढे आणायचं होतं..

दिवस जवळ येत होता..तालीम जोरात सुरू होती..
साथीला चाचा स्वतः असायचे..
रियाझ त्याच दिवशी सकाळी यायचा होता, पण हे अम्मीने आणि चाचाने सायापासून लपवून ठेवलं होतं..कारण त्या दोघांमध्ये झालेलं सगळं रियाझने हल्लीच निकाहचा विषय निघाल्यावर चाचांना सांगितलं होतं..त्यामुळे अम्मी आणि चाचा दोघेही खुश होते..
बघता बघता दिवस उजाडला..
लोकं येत होती..अम्मीला दुवा देत होती..सायालाही भेटत होती..
आणि आता सायाचं गाणं सुरू व्हायची वेळ झाली..
साया गायला बसली..
डोळे मिटले..आणि त्या दिवशीचे चाचांचे शब्द तिला आठवले..
तिने गाणं सुरू केलं..
दाद मिळत होती पण त्याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं..
तल्लीन होऊन गात होती..
आणि शेवटी तिने सरळ याद पिया की गायला घेतलं…
आज मात्र अम्मी नाराज नव्हती..
सायाने डोळे मिटून सुरवात केली..

बैरी कोयलिया कूक  सुनावे…
मुझ बिरहन का जियरा जलावे..
हाँ पी बिन रहा ना जाये.. हाये राम
याद पिया की आए…

जोबन बीता जाये- हाये राम..
याद पिया की आए…

गाणं संपलं..

सायाच्या बंद डोळ्यांमागे अश्रूंनी आडोसा धरला होता..
आणि बंद डोळ्यांमागे एक चित्रपट सुरू झाला होता..
अब्बूचं जाणं..तिची पहिली मैफिल..रियाझने दिलेला नकार..गमावून पुन्हा मिळवलेला आवाज…आणि सहज प्रश्न पडला..आवाज गमावून मिळाला..पण रियाझ..?
टाळ्यांच्या कडकडाटाने तिची तंद्री भंगली..
पुन्हा तेच सुभान अल्लाह, बोहोत खूप, जिती रहो, लाजवाबचे घुमणारे आवाज..
भरून पावलेले चेहरे..आणि पाणावलेल्या नजरेने तिच्याकडे पाहणारी अम्मी..आणि अम्मीला सावरुन धरलेला….
रियाझ….

आज सायाच्या यादला रियाझची साद मिळाली ती कायमचीच!

समाप्त

- कांचन लेले