Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Wednesday 11 January 2017

Being Woman

Being Woman!

Yesterday was one such busy day that I had no time even to have food !
In the evening as I ran to the station (already exhausted) to reach my class which was mere two stations away..
It was 5.30 pm.. It just takes 17 minutes to reach my class which was scheduled at 6..still being a Kobra..Reaching 5-10 minutes before time is mandatory! ;)
I hurriedly reached the station and searched for a working ATVM machine to get my ticket..
At such times being third in the queue of ATVM machine also seems irritating..
After few minutes I got my ticket and ran to the bridge..it was the middle bridge and I had planned to board the last compartment, which meant I had to walk all the way to it before the train departed...
The train was announced even before I was even on the bridge..I increased my speed from 100 to 150 in typical Mumbai style..
As I was getting down the bridge to the platform I saw a pregnant woman slowly climbing down the stairs..
Within a microsecond my speed was automatically reduced to hers..
I walked beside her till the end of the bridge..
As we were on the last step, she gave me a thankful wink..and I winked back..!
I hurried and boarded the middle compartment..with a happy mind inspite of the compromise..my day was made..!

- Kanchan Lele

Sunday 8 January 2017

Demonetization

#Demonetization

आज पहिल्यांदाच सध्याच्या ज्वलंत विषयावर बोलत आहे!

सरळ बघायला गेलं तर काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचललेलं एक पाऊल..
खळबळ माजवणारं आणि तितकंच सुखावणारं सुद्धा..ज्यांना कळलं त्यांना सुखावेल, नाही कळलं त्यांना न कळून किंवा न आवडून काहीही पर्याय नाही..(टीका करणं, बोटं मोडणं, शिव्या घालणं, अफवा पसरवणं हे निरुपयोगी पर्याय असतात) …त्यामुळे आहे ते स्वीकारावंच लागेल..

सध्या काही राजकारण्यांची अशी टीका आहे की सामान्य लोकांचे हाल होतायत..काही प्रमाणात खरं असेलही..
पण सामान्य माणूस त्याला हाल मानतो आहे का..? कि आपल्या देशासाठी, आपल्या व पुढच्या पिढ्यांच्या उज्वल भविष्याकडे बघून आनंदाने सहकार्य करतोय हे मात्र राजकारण्यांनी नक्की पडताळून बघावं..
स्वानुभव - रस्त्यावरच्या अनोळखी माणसाला सहज विचारलं की ATM कुठे आहे?  तर, कुठे कुठलं ATM आहे, कुठल्या ATM मध्ये फक्त कॅश डिपॉझिट होते आहे आणि कुठे पैसे मिळत आहेत असं सगळं अगदी तोंड वाकडं न करता लोकं सांगतात..
ATM च्या लायनीत आपल्या आजू-बाजूचा माणूस 'फक्त २००० ची नोट आहे' असं स्वतःहून सांगतो..मग काही लोक ज्यांना १००-५०० अपेक्षित असतात ते लाईन मध्ये वेळ घालवत नाहीत, सांगणाऱ्या माणसाचे आभार मानतात..
आणखी एक म्हणजे लाईन मध्ये उभे राहिलेले लोक मस्त एकमेकांशी गप्पा मारत, खेळीमेळीच्या वातावरणात उभे असतात..
काही अपवाद नक्कीच असतील, हा माझा वैयक्तिक अनुभव होता..
दुकानदार थोडी उधारी घेऊन-ठेऊन काम चालवत आहेत..
माणसा-माणसातला विश्वास वाढतो आहे..
एकूणच वातावरण सौजन्यपूर्ण आहे..!

आणखी एक पैलू म्हणजे, धर्म, जाती हे भेदभाव लोक सपशेल विसरले आहेत..लोकं हसून एकमेकांना मदत करत आहेत ज्यांना मदत करणं शक्य नाही ते दिलासा देत आहेत, समजावत आहेत..
काही ठिकाणि ठरलेली लग्न किंवा मंगल कार्य पार पाडायला पूर्ण गाव एक होऊन मदत करत आहे अशी बातमी वाचली..श्रीमंतांकडे पैसा असून उपयोग नाही आणि गरीबाकडे मोजकाच असल्याने फार त्रास नाही..
आज देशातला प्रत्येक नागरिक समान दर्जाकडे जात आहे..हि नक्कीच उल्लेखनीय कामगिरी आहे..

आणि आता त्रासाबद्दल म्हणायचं तर त्रास झाला नसता तर ही एकी दिसलीच नसती..तो आपला गुणधर्मच आहे बहुतेक!

Cashless transactions वाढत आहेत..त्याचं महत्व पटत आहे..काही वर्षात भारत बऱ्याच प्रमाणात cashless नक्कीच होईल अशी आशा वाटत आहे..!

५० दिवसांची मदत आपण नक्कीच करु शकतो..घरच्या कार्यासाठी जसे खस्ता सहन करतो तसंच हे घरचं कार्य समजून एकत्र पुढे पाऊल टाकूया.. कुठला पक्ष, कुठला नेता हे सगळं विसरुन आपलं हित कशात आहे हे बघून पाठिंबा देऊया..घेतलेल्या शिक्षणाचा वापर स्वतःसाठी व इतरांसाठीही करुया..!
एक पाऊल प्रगतीकडे टाकूया…! :)

©कांचन लेले

Wednesday 4 January 2017

गिरनार - एक अद्भुत अनुभव..!



काल एका पोस्ट मध्ये गिरनारचा उल्लेख आला आणि फेब्रुवारी २०१६ रोजी केलेल्या गिरनार यात्रेच्या आठवणी ताज्या झाल्या.. आम्ही १४ जण होतो..साधारण वयोगट १२-७२..गिरनार ला जायच्या आधी ८ दिवस आमचा श्री क्षेत्र सोमनाथ येथे मुक्काम होता..कारण होतं जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण..हा योग साधून आला तो माझे गुरू श्री.अंकुश दीक्षित यांच्यामुळे, ज्यांच्याकडे मी संगीत शिकत आहे (आम्ही त्यांना सर असं संबोधतो..पुढील उल्लेख तसाच येईल)..मुंबईतून निघताना गिरनार कडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे एक challenging trek असा होता..९,९९९ पायऱ्या असलेले तीन डोंगर असं सारखं घुमत होतं डोक्यात…पण सोमनाथ मधले दिवस जसे उलटत गेले तसा दृष्टिकोनही बदलत गेला..आता ओढ लागून राहिली होती ती दत्तगुरूंच्या दर्शनाची…
गाथा पारायण झाल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो गिरनार कडे..साधारण रात्री ९ च्या दरम्यान पोहोचलो आणि गाडीतून खाली उतरता क्षणी डोळ्यात भरली ती डावीकडे दिसणारी दीपमाळ…मिट्ट काळोख आणि जणूकाही हवेतच तरंगत असलेले पांढरे दिवे गिरनारच्या पहिल्या टप्प्याची उंची दाखवत होते..नुसतं बघत रहावं असं दृष्य.. राहायची व्यवस्था करून, जेऊन, झोपायला १२ वाजून गेले..पहाटे ३ वाजता सुरु करायचं ठरवलं होतं व त्याप्रमाणे ३ च्या दरम्यान बाहेर पडलो, काठ्या घेतल्या व पायथ्याशी पोहोचताच सरांच्या मार्गदर्शनाने एकत्र प्रार्थना व ओंकार करून चढण्यास प्रारंभ केला.. ऐकून होतो कि तीन डोंगर आहेत एकूण, पण दिसताना एकच दिसत होता, अंदाज बांधत बांधत मार्गक्रमण करत होतो.. हवेत गारवा होता..जसजसं वरती जात गेलो तसतसं हवेतल्या गारव्याच्या विशेषणाची जागा घेतली शीतलतेने…ती शीतलता होती एका शक्तीचं अस्तित्व जाणवून देणारी, भिऊ नकोस निर्धास्त होऊन चढ, मी आहे…असं सांगणारी…

 तब्बल सहा तासांनी 'अंबाजी' म्हणजेच पहिल्या डोंगराच्या टोकाला पोहोचलो…दर्शन घेऊन बाहेर बसल्याबसल्याच झोप काढली आणि पुढे निघालो..पुढचा डोंगर तसा तुलनेत छोटा होता..मात्र त्याच्या टोकावर गेल्यावर जे तिसऱ्या टप्प्याचं दर्शन घडलं त्याने एकीकडे जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं आणि दुसऱ्या क्षणी आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं अशक्य आहे असं वाटून गेलं..आम्ही असे नकारार्थी बोलायला लागलो कि आमचे सर आम्हाला तिथेच थांबवतात, या वेळीही तसंच झालं..आणि त्यांनी सुरवात केल्यावर आम्हाला जावंच लागलं.. पण प्रामाणिकपणे कबुल करावंसं वाटतं कि तिसरा टप्पा गाठताना सगळ्यात कमी क्षीण जाणवला..दर्शनाच्या ओढीने असेल कदाचित..आणि एक-दोन एक-दोन करत शेवटी आम्ही टेकडीवर असलेल्या इवल्याश्या मंदिरात पोहोचलो…दर्शन झालं..मूर्तीसमोर बसलो…
आता त्या शीतलतेची जागा घेतली शांततेने…शांतता मनाची, शांतता देहाची आणि शांतता विचारांची…आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो..तशी गर्दी होती खरंतर.. चपला काढल्या होत्या तिथे सर बसले आणि अचानक 'पैल मेरूच्या शिखरी, एक योगी निराकारी..' हा अभंग म्हणू लागले..मी नजरेनेच आत जाऊया का असं विचारलं आणि ते तत्काळ उठले..आत बसले..मग दत्तगुरूंसमोर सर, त्यांच्या पायाशी पायरीवर मी आणि समोर त्यांची कन्या..असे तिघं मिळून गात होतो..विशेष म्हणजे त्या दहा मिनिटात तिथे फक्त एक किंवा दोन भक्त आले..आता हि दत्तगुरूंची सेवा रुजू करून घ्यायची इच्छा म्हणा, किंवा निव्वळ योगायोग…कृतार्थ होऊन आम्ही परत दर्शन घेऊन खाली निघालो…….


आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो..डोळ्यासमोरुन दत्तगुरूंची प्रतिमा हलत नव्हती..कानात 'पैलमेरुच्या शिखरी' अभंग घुमत होता..त्या भारावलेल्या अवस्थेतच तो डोंगर उतरून खाली आलो, तिथे दोन वाटा होत्या..एक परतीचा रस्ता होता आणि दुसरा रस्ता अन्नदान होत होतं त्या जागी नेणारा होता.. आम्ही चढत असताना काही लोक खांद्यावर-डोक्यावर पोती घेऊन जाताना दिसले होते, एक माणूस तर चक्क सिलेंडर घेऊन गेला..आम्हाला जिथे पाठीवरच्या छोट्या बॅगेचं ओझं वाटत होतं तिथे या लोकांमध्ये एवढं वजन तिसऱ्या डोंगराच्या पायथ्याशी आणायची शक्ती येते कुठून….? हे फक्त शारीरिक सामर्थ्य आहे का..? 

नक्कीच नाही..त्यामागे एक शक्ती आहे जिच्यामुळे आजतागायत गिरनार येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तास अन्नदान होतं.. कधी काही कमी पडण्याचा प्रश्नच येत नाही..सूर्य चांगलाच तळपत होता आणि पुढचा पल्ला बघता आम्ही अनिच्छेनेच पहिला, परतीचा रस्ता धरला.. जिथे पायऱ्या उतरतानासुद्धा पायाला झिणझिण्या येत होत्या तिथे आम्ही आता दुसऱ्या डोंगराचं चढण सुरु केलं....
सलग काही पायऱ्या चढायच्या, मग दोन मिनिटं थांबायचं असा प्रवास सुरु होता..उन्हाच्या चांगल्याच झळा लागत होत्या, पण मनाला मिळालेल्या थंडाव्यापुढे अजूनही फिक्याच होत्या.. मधे-मधे पाणी-लिंबु सरबत-छास असं घेत होतो..खाणं मात्र टाळत होतो..एवढं असूनही १२ तासात शरीरधर्माची जाणीव झालेली मला आठवत नाही…एवढ्या तळपत्या उन्हात सुद्धा दोन ठिकाणी  थांबलो तिथे काही मिनिटंच का होईना पण शांत झोप लागली आणि परत चढाईसाठी आम्ही ताजेतवाने झालो..
खाली येईपर्यंत पाय मात्र चांगलेच भरुन आले होते…तरी हळू हळू मार्गक्रमण करत आम्ही रहात होतो तिथे पोहोचलो…
रात्री जेवायला बाहेर पडलो तेव्हा परत पहिल्यावेळी दिसलेलं दृष्य दिसलं..मिट्ट काळोख आणि त्यात मार्ग दाखवणारे पांढरे दिवे....शरीर अशा स्थितीत होतं कि उठता-बसता धड येत नव्हतं तरी ते दृश्य बघुन परत जायचा मोह झाल्यावाचून राहिला नाही...पण इलाज नव्हता, दुसऱ्या दिवशी पहाटे समाधानाने भरुन तरीही जड अंतःकरणाने पुढच्या नियोजित प्रवासाला निघालो….

खाली काही फोटो जोडले आहेत त्यातले पहिले दोन दत्तात्रयांच्या स्थानाचे आहेत..दुसऱ्या डोंगरावरुन दिसलेलं दृश्य हे होय..मागच्या लेखात मंदिराला 'इवलंसं' म्हणायचं कारण दुसऱ्या फोटोत दिसून येईल..ते मंदीर कसं बांधलं असेल, आजवर ते कसं टिकलं असेल असे प्रश्न पडले नाहीत, कारण श्री क्षेत्र केदारनाथ येथे गेलो असता तिथेही हि प्रचिती आली होती..सगळं उध्वस्त झालं तेव्हा मंदिराला मात्र धक्कासुद्धा लागलेला नाही..असो..
उर्वरित फोटो प्रथम पल्ला गाठल्यावर तिथून काढलेले आहेत..एका फोटोत एक प्रचंड शिळा, त्यावर झेंडा आणि फासलेलं शेंदूर दिसतं.. पण ती शिळा अश्या ठिकाणी आहे, कि तिथपर्यंत पोहोचणं निव्वळ अशक्य आहे..
आणि एक फोटो माझा विशेष आवडता आहे..दोन डोंगर आणि त्यातून जाणारी चिंचोळी वाट...संकटाचे कितीही डोंगर आयुष्यात आले तरी त्यातून एक चिंचोळी का होईना वाट असते, ती आपण शोधायची असते..जणू असंच काहीसं सांगणारं ते दृश्य..

एकूणच गिरनारचा संपूर्ण प्रवास सुंदर अनुभव देऊन गेला..
आणि हा अनुभव पुन्हा पून्हा घेण्याची इच्छा उरी बाळगून इथेच थांबते..! :)

- कांचन लेले 













-कांचन लेले

आकाशात उंच झेप घेताना..!

आकाशात उंच झेप घेताना…
तारिख- ८ जून २०१६.
स्थळ- मुंबई.

साधारण ५.३० च्या दरम्यान टॅक्सी विमानतळाच्या बाहेर थांबली..एक मोठी बॅग आणि एक माझं अर्धांग, म्हणजे पाठीवरची सॅक, अशा दोन बॅगा घेऊन प्रवेशद्वारातून पदार्पण केलं..थोडं पुढे गेल्यावर चेक-ईन लगेज जमा करायचं काउंटर होतं, तिकडे बॅगेचं वजन झालं आणि जशी ती आत जाऊ लागली तसा माझा ऊर भरुन येत होता..परत दिसेल ना, आहे तशीच पोहोचल्यावर मिळेल ना, ह्याच कार्गो मधून येईल ना ई. विचारांना झुगारुन पुढे गेले तरी एकदा वाटलंच कि एक काळी तीट लावायला हवी होती..

पुढे घेतलेले टॅग माहिती भरुन अर्धांगावर अडकवले आणि पुढे माझी आणि अर्धांगाची झडती झाली..सुखरुप सुटलो..आणि मग काय..आता जवळपास दीड तास होता..मग थोडा फेरफटका मारला आणि एके ठिकाणी बसले..थोड्यावेळ भ्रमणध्वनी तपासला आणि शेवटी हुकमी एक्का म्हणून एक जाड पुस्तक काढुन बसले..कसा वेळ गेला कळलं सुद्धा नाही..पुस्तक हातात घेतलं तेव्हाची तुरळक लोकसंख्या आता तुडुंब म्हणण्याइतपत झाली होती...रांगेत उभी राहिले आणि ५ मिनिटात झाला विमान प्रवेश..! 
विंडो सीट आधीच घेतल्याने आरामात लाईनीत शेवटी उभी होते…बस आणि ट्रेन मध्ये असं रोज करता आलं असतं तर काय मज्जा ना..? असं आपलं उगाच माझ्यातल्या 'खिडकीप्रेमी मुंबईकर' मनाला वाटून गेलं..सीट अगदी मध्यावर म्हणजे विमानाच्या पंखाला लागुन होती..मी शेवटी असल्याने २-४ सोडता सगळे लोक बसले होते आणि नंबर बघत मी सीटपाशी आले.. (सीट रिकामी बघून काय बरं वाटलं..म्हणजे उगाच 'हमारा रिझर्वेशन है' असं सांगून बसलेल्या माणसाला उठवायला मला इतकं जिवावर येतं म्हणून सांगू….)…

तर बॅग वर ठेऊन मी एकदाची स्थानापन्न झाले.. एअर होस्टेस दोन फेऱ्या मारुन गेली…मी लगेच त्यांच्या भाषेतली 'कुर्सी कि पेटी' बांधून घेतली..मग हळूहळू कंपनं जाणवू लागली आणि उगाच माझ्या मध्यमवर्गीय पोटात एक पिटुकला गोळा येऊन गेला..मग अनौन्समेंट सुरु झाली..एअर होस्टेस जागोजागी उभं राहून त्याचं प्रात्यक्षिक दाखवत होते...आणि त्याच वेळी विमान पुढे जाऊ लागलं..शकलं झाली ओ काळजाची, काय सांगू..?..एकीकडे अज्ञानामुळे त्या एअर होस्टेस कडे लक्ष द्यावसं वाटत होतं आणि एकीकडे पहिल्या वहिल्या विंडो सीट विमान प्रवासाचे सुरवातीचे क्षण चुकवायचे नव्हते..मग अर्धं इकडे अर्धं तिकडे असं करत ५ मिनिटं गेली आणि थांबली एकदाची अनौन्समेंट..मग अगदी शहाण्या मुलासारखं एकटक लक्ष खिडकीकडे..! 

आता विमान जरा वेग घेऊ लागलं आणि रेल्वेच आठवली..३०-४० सेकंद अगदी रेल्वेच वाटली..! आणि मग भरारी घेतली एकदाची आमच्या विमानाने…खाली माझी सुंदर मुंबई (विमानातून बरीच झोपडपट्टीच दिसली आधी..तरी) मागे सोडून जाताना जsssरा वाईट वाटल्याशिवाय राहिलं नाही..मग खालचा अथांग समुद्र दिसला आणि जीव सुखावला..आणि आता मी वाट बघत होते ती ह्याच्या पार जाण्याची..मऊ मऊ ढगांची..आणि हाकेसरशी आलेच ते लगेच…आहाहा…पांढऱ्या रंगाचं हे सौंदर्य पहिल्यांदाच अनुभवत होते मी..मधेच दूरवर निळसर रेघ दिसत होती..मग उगाच आपलं 'ढग एकमेकांना आपटले कि आवाज येतात..मग ढगांना विमान आपटलं तर आवाज येत असेल का..? विमानाचा तोल ढळत असेल का..? एका ढगामधुन विमान गेलं तर त्याचे दोन भाग होत असतील का..? असे प्रश्न सतावून गेले..

आता जरा कानात दडे बसू लागले होते..आणि आईने कानात घालायला दिलेला कापूस आपण हुशारीने बॅगेतच विसरलो होतो हे लक्षात आलं..मग काय आलिया भोगासी असावे सादर..! जरा गरगरल्यासारखं पण होत होतं.. पण त्याच्या तयारीतच होते मी..!

मग परत लक्ष बाहेर गेलं..आता सूर्यराव चांगलेच दिसू लागले होते..आणि आणखी वर गेल्याने ढग सुद्धा खूप दिसत होते..एकदा वाटलं टुणकन उडी मारुन खिडकीला लागून असलेल्या पंख्यावर जावं आणि लोकं 'वॉटर सर्फिंग' करतात तसं 'क्लाऊड सर्फिंग' करावं..विचारानेच गुदगुल्या झाल्या आणि परिणाम चेहऱ्यावर झाला..मग लक्षात आलं कि शेजारचा माणूस तिरक्या नजरेने काय गडबड आहे बघत होता..तसा मी परत चौकोनी चेहरा पांघरला आणि मोर्चा खिडकीकडे वळवला…

सूर्यराव चांगलेच फॉर्मात आले आणि मी अनिच्छेने खिडकीचं शटर खाली केलं..मग अधून मधून डोकावून बघत होते..मधेच मात्र एक निराशेचा विचार येऊन गेला..लहानपणी प्रश्न पडायचा कि देवबाप्पा कुठे रहातो..? मग मोठी माणसं उत्तर द्यायची वरती आकाशात रहातो..

विमान जसजसं ढगात प्रवेश करत होतं तसतसं मला अगदी १ टक्का का होईना पण वाटत होतं कि आता एका टुमदार ढगावर शेषशाही विष्णू आपल्या खास पहुडलेल्या पोझ मध्ये दिसतील..साक्षात निळकंठ रामाचं ध्यान करताना दिसतील आणि झालंच तर आपले लाडके बाप्पा ढगावर मांडा ठोकून मोदकाचं ताट रिकामं करत असतील…पण छे…फसवलं सगळ्यांनी आपल्याला…
मग आपल्या वेडेपणाचं परत हसू आलं पण ह्या शुष्क होत चाललेल्या जगात आजही अपल्यायतलं निरागस मुल जिवंत आहे ह्या अनुभवने मात्र सुखावले मी..आणि त्या सुखाच्या आड लँडिंगची अनौन्समेंट आली तसं लगेच मी खिडकीचं शटर उघडलं..हळू हळू खालची हिरवळ दिसू लागली होती..पुढे परत समुद्र दिसला तेव्हा विमान तिरक्या दिशेत खाली जात होतं.. 
मग उगाच वाटून गेलं मगाशी सेफ्टी अनौन्समेंट नीट ऐकली पाहिजे होती..पण सुदैवाने तोवर परत जमीन दिसू लागली अन हायसं झालं..आता हळूहळू चेन्नई शहर  नकाशासारखे दिसू लागले होते..हिरवे चौकोन-गोलाकार भाग, मातीचे चौकोन-गोलाकार-आयताकृती भाग..खेळण्यातल्या वाटाव्या अशा इमारती, मुंगीएवढ्या गाड्या आणि आणखी खाली आलो तेव्हा नीट बघितलं तर काय मस्त रंगीबेरंगी इमारती दिसल्या..आपला चॉईस चुकला नाही राव..छान दिसतंय शहर...अश्या विचारात असतानाच मोssठ्ठी मोकळी जागा दिसली..परत जीवात जीव आला..विमान जमिनीला टेकलं.. परत ३० एक सेकंद रेल्वेचा भास झाला..आणि मग थोडं कंपन स्थितीतून जाऊन विमानाने पूर्णविराम घेतला..!
अश्या प्रकारे आकाशात उंच भरारी घेण्याची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली…! :)

- कांचन लेले

नातं.. (भाग ४)

भाग ४..

विहानला पूर्ण शुद्ध आली नव्हती..अर्धवट शुद्धीत तो बरळत होता..
'आदू..
अदिती…'
हे शब्द कानी पडताच त्याच्या आईने डोळ्यांना पदर लावला..वडिलांनी त्याला हाका मारुन शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला…पण व्यर्थ..शेवटी न राहवून वडिल त्याला समजावत म्हणाले 'आदू येईल हा बाळा..तू लवकर बरा हो आधी..'
इकडे त्याच्या मित्रांना काहीच समजेना..तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितलं की त्याची लहान बहीण अदिती दोन वर्षांपूर्वी देवाघरी गेली होती..त्याचा त्याने खूपच धक्का घेतला होता..आणि म्हणूनच खरंतर ते वर्षभरापूर्वी जुनं सगळं सोडून ह्या शहरात रहायला आले होते..
पण इकडे आल्यापासून विहान बराच सावरला होता..मग असं मधेच काय झालं..? आणि तो जर नीरजाच्या धसक्याने असा झाला होता तर मग अदितीचं नाव का घेत होता..?
कोणालाच काही कळेना..शेवटी सगळे त्या दिवशी तसेच घरी गेले..

प्रितीने नीरजाच्या बाबांच्याच्या फोनवर फोन केला आणि तिला सगळं कळवलं..तिला मोठा धक्काच बसला..इतकं भयंकर काही होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं..तिला तिचं मन खात होतं..सुदैवाने ती दुसऱ्याच दिवशी सकाळच्या फ्लाईटने परतणार होती..आल्या आल्या पाहिलं विहानला जाऊन भेटायचं असं तिने ठरवलं..
दुसऱ्या दिवशी परत सगळे हॉस्पिटलला आले..विहान शुद्धीत आला होता पण काहीच बोलत नव्हता..नीरजा त्याच दिवशी परत येत होती हे प्रितीने ग्रुपमध्ये सांगितलं होतं..इकडे विहानची अवस्था शारीरिकदृष्ट्या थोडी सुधारली असली तरी मानसिक दृष्ट्या खालावलीच होती…डॉक्टरांनी ते जाणलं होतं आणि त्याला तपासायला सकाळीच सायकॉलॉजिस्ट येऊन गेले होते..त्यांनी विहानला लवकरात लवकर बोलतं करायचा सल्ला दिला होता..
अजून कोणीच त्याच्यासमोर नीरजाचं नाव काढलं नव्हतं..पण शेवटी तो कशालाच प्रतिक्रिया देत नाही असं बघून त्याच्या आईने निराजाबद्दल त्याला थेटच विचारलं..
नीरजाचं नाव आईच्या तोंडी ऐकताच विहानने त्याची क्षीण नजर क्षणभर तिच्यावर रोखून धरली…मग मात्र त्याचा बांध फुटला… त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं..तो आईकडे बघून बोलू लागला..'आई..आई…माझी आदू परत आली होती गं..'
त्याला पुढे बोलवेना…आई-बाबांनी त्याला शांत केलं..प्यायला पाणी दिलं…थोडं शांत झाल्यावर विहान बोलू लागला…
'माझी आदू होती तशीच..अगदी तशीच आहे नीरजा..एकदम डॅशिंग…तिच्या आवडी-निवाडीही बऱ्याच आदुसारख्या….आणि आई आदू जशी हसायची तश्शीच अगदी खळखळून नीरजा हसायची गं...मी पहिल्यांदा तिला हसताना बघितलं..आणि मला क्षणभर वाटलं की अदितीच समोर बसली आहे माझ्या…पण अदिती जिवंत नाही हे सत्य आहे…आणि आता..आता मी नीरजालाही गमावून बसलो आहे….'
असं म्हणून तो परत रडू लागला..

दारात नीरजा उभी होती…तिने हे सगळं ऐकलं मात्र तिला ते सहन नाही झालं आणि ती दारातच कोसळली…
त्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष दरवाज्याकडे गेलं आणि नीरजाला पडलेलं बघतच सगळे धावले…
थोड्याच वेळात नीरजा शुद्धीत आली…डोळे उघडले आणि पहिला दिसला तो विहानचा चेहरा…तिने चेहरा हातात झाकला आणि रडू लागली…विहान आता बराच सावरला होता…वास्तवाचं भान त्याला आलं होतं…त्याने नीरजाची समजूत काढली..तिची माफी मागितली..
नीरजा सावरली..तिनेही विहानची माफी मागितली..
सगळ्यांना खूप बरं वाटलं..आई-बाबांची मोठी काळजी मिटली..

विहानला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज मिळाला आणि तो घरी आला..
घरी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी दाराची बेल वाजली..कोण आलं बघायला विहान दाराशी गेला तर समोर नीरजा उभी..
ती त्याला फक्त 'hi' म्हणून आत स्वयंपाकघरात गेली..विहानची आई तिथे होती...विहान तिच्या पाठोपाठ आत जाणार इतक्यात नीरजाचा आवाज आला
'विहान आत येऊ नको, बाहेर खुर्चीत बस..मी आलेच!'…
नाईलाजाने विहान बाहेर बसला..त्याचे बाबाही आतून येऊन बाहेर बसले..थोड्याच वेळात नीरजा आणि विहानची आई बाहेर आल्या..
नीरजाच्या हातात आरतीचं ताट होतं..
विहान काही विचारणार इतक्यात तिने त्याच्या कपाळावर कुंकवाची छान उभी रेघ काढली आणि त्याला ओवळलं..
विहानच्या समोर आणि नीरजाच्या मागे भिंतीवर आदितीचा फोटो लावला होता..नकळत विहानची नजर त्यावर स्थिरावली…!
'अरे कुठे हरवलास…? काय सांगते मी.. हात कर ना पुढे…!'
नीरजाच्या आवाजाने विहान भानावर आला..त्याने हात पुढे केला..
नीरजाने हातावर राखी बांधली..विहानच्या चेहऱ्यावर हास्य विलसलं आणि डोळ्याच्या कडा पाणावल्या…नीरजाने हलकेच त्याच्या हातावर हात ठेवला..आणि डोळ्यांनी त्याला शांत व्हायला खुणावलं..
'मला माहित आहे आज रक्षाबंधनाचा दिवस नाही..पण भावना व्यक्त करायला कधीकधी मुहूर्ताची गरज नसते ना..म्हणून वेळ न घालवता आजच आले..!'
विहान फक्त हसला..त्याचे आई-वडील भरल्या डोळ्यांनी समोरचं दृष्य पहात होते…
त्यांना गमावलेली लेक मिळाली होती..
एका भावाला दुरावलेली बहीण मिळाली होती...
हरवलेल्या रक्ताच्या नात्याची जागा मनाने घट्ट बांधलेल्या नव्या नात्याने अलगद भरुन काढली होती...

समाप्त

- कांचन लेले

नातं.. (भाग ३)

भाग ३..

नीरजाच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं…
एकीकडे तिला विहानचं विचित्र वागणं छळत होतं..तर दुसरीकडे जवळ येणाऱ्या परीक्षेची काळजी छळत होती..
परीक्षेच्या दृष्टीने आत्ता कुठलीच हालचाल करणं योग्य नाही असं तिला खूप विचारांती लक्षात आलं होतं...
सध्या या सगळ्याकडे दुर्लक्ष करु, अभ्यास व्यवस्थित झाला आणि परीक्षा झाली की नंतर या प्रकरणाचा छडा लावू असं तिने मनाशी पक्के ठरवले..

विहानच्या खरेपणाबद्दल तिला मनोमन खात्री होती..पण तरी कुठेतरी एक धाकधूक होती की सगळे म्हणतात तसा खरंच तो प्रेमात पडला नसेल ना माझ्या..? पुन्हा मनात विचारांचा कल्लोळ उठला..तिने स्वतःला शांत केलं..आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम रहायचा निग्रह केला, पण त्याचबरोबर विहानला कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन द्यायचं नाही असंही तिने ठरवलं.
.

दिवस जात होते...परीक्षा जवळ येत होती..अभ्यासाच्या निमित्ताने भेटी खूपच कमी झाल्या होत्या...पण तरी विहान रोज नीरजाला फोन करतच असे..मधेच एखाद दिवशी तिच्या घराजवळ जाऊन तिला फोन करुन खाली बोलवत असे व मग कधी 'सहजच इकडे आलो होतो म्हणून म्हंटलं भेटू तुला' तर कधी 'अमक्या विषयाच्या नोट्स हव्या होत्या' अशी कारणे देऊन तिला भेटत असे..नीरजा खूप शांतपणे हे सगळं हाताळत असली तरी आतून मात्र ती खूप कंटाळली होती ह्या सगळ्याला..

एक दिवस तिला एक कल्पना सुचली..
तिने परीक्षेनंतर सुट्टीत कुठेतरी बाहेर जाण्याचा हट्ट आई-बाबांकडे केला..त्याप्रमाणे काहीच दिवसात सुट्टीची व्यवस्था करुन आई-बाबांनी सुट्टीत केरळला जायचं नक्की केलं..बुकिंग झालं आणि नीरजा जरा निर्धास्त झाली..
तिने ह्या बाबतीत कोणालाच काही सांगितलं नव्हतं..विहानशी नेहेमीसारखंच वागत होती..त्यालाही अभ्यास करायला प्रोत्साहन देत होती..परीक्षा अगदी उद्यावर आली..नीरजा आणि विहानचं परिक्षाकेंद्र वेगळं होतं त्यामुळे परीक्षेच्या काळात तरी भेटण्याचा प्रश्न नव्हता..फोनवर वेळ निभावून नेता येत होती..

एक एक दिवस जात होते..आणि अखेर परीक्षा संपली..त्या दिवशी शेवटच्या पेपरनंतर सगळा ग्रुप एकत्र कॉलेजमध्ये भेटला..
एन्जॉय केलं आणि सगळे घरी गेले..पुढचे दोन दिवस नीरजाने फोनवरच विहानची बोळवण केली..आणि तिसऱ्या दिवशी सकाळीच ती घरच्यांसोबत केरळला गेली..तिने ठरवल्याप्रमाणे नेहेमीचा नंबर तात्पुरता बंद ठेवला होता...
इकडे विहान दिवसभर फोन करत होता पण फोन बंद असल्याचं कळलं..
संध्याकाळी तिच्या घरी जाऊन आला पण तिथे घराला कुलूप दिसलं..तो खूप अस्वस्थ झाला..
सगळ्या मित्र मैत्रिणींना फोन करुन चौकशी केली पण कोणालाच काही माहित नव्हतं..

असं पुढचे तीन दिवस चाललं..पण रोज त्याच्या हाती निराशाच येत होती..
तो पुरता अस्वस्थ झाला…नुसता मख्खासारखा कुठेतरी बघत घरात बसू लागला..
ह्या बरोबरच दिवसेंदिवस त्याचं खाणं-पिणं कमी होत होतं..पाचव्या दिवशी त्याने नेहेमीप्रमाणे सकाळी फोन केला, पण फोन बंदच होता..घरी जाऊन आला तर तिथेही कुलुपच होतं..

आता मात्र तो पुरता हैराण झाला होता..राग, काळजी, अस्वस्थता ह्या सगळ्यांच्या मिश्रणाने त्याची अवस्था फारच बिकट झाली होती..त्याने घरी येऊन स्वतःला कोंडून घेतलं..त्या दिवशी त्याने काहीच खाल्लं नाही..आधीच अशक्त झालेल्या त्याच्या देहाला हे सहन झालं नाही...

घरातल्यांना काही कळेना..त्याच्या मित्रांना विचारलं पण कोणी काही सांगेना..शेवटी अशक्तपणा येऊन दुसऱ्या दिवशी तो बेशुद्ध पडला..त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं..तेव्हामात्र घरच्यांनी सगळ्या मित्रांना बोलावून खडसावून विचारलं आणि त्यांना नीरजाबद्दल खरं सांगावं लागलं…
घरच्यांचा विश्वास बसेना...
इतक्यात विहानला शुद्ध आली..
आणि…आणि त्याचा क्षीण आवाज कानावर पडला…

'आदू……
अदिती…..'

क्रमशः

- कांचन लेले

नातं.. (भाग २)

भाग २..

'Hello..? कुठे तंद्री लागली आहे साहेब..? थंड होईल ना भाजी..टूट पडो!' ..दोघांनी पावभाजी फस्त केली आणि निघाले..
'चल मी निघते..उद्या कॉलेजला भेटू..'
'अगं मी येतो ना तुला सोडायला..'
'नको रे..इतका काही उशीर नाही झालाय..मला सवय आहे..'
'मला आत्ता काही काम नाहीये..आणि तेवढीच तुला कंपनी..!'
विहानने हट्टच केला..मग नीरजानेही ऐकलं त्याचं..तिला त्याचा एवढा आग्रह थोडा विचित्र वाटला पण तिने तितकं सिरियसली घेतलं नाही..
विहान गप्पा मारता मारता नीरजाच्या आवडी-निवडी, शाळा,
घरचे इ. बऱ्याच विषयांची माहिती काढून घेत होता..
आणि ते तिच्या घरापाशी पोहोचले..ती त्याला bye म्हणून निघाली..तो मात्र थोडा वेळ तिथेच रेंगाळला…
दुसऱ्या दिवशी मैत्रिणींनी नीरजाला आणि मित्रांनी विहानला खोपच्यात घेतलं…पण दोघांकडूनही निराशाच पदरी पडली..! 

पण त्या दिवसानंतर विहानचं वागणं मात्र बदलत चाललं होतं..
एरवी जोडप्यांच्या ग्रुपमध्ये बोर होतं असं म्हणणारा विहान आता सारखा ग्रुप बरोबर दिसू लागला..
काही दिवसांनी सगळ्यांना कॉलेजकडून स्टडी लिव्ह मिळाली...त्यामुळे कॅन्टीन आणि लायब्ररी दोन्हीकडे जास्ती वेळ जाऊ लागला..
वेगवेगळ्या वर्गात असल्याने आधी कमी होणाऱ्या भेटी आता खूप वाढल्या...दोघांची आता चांगलीच मैत्री झाली होती..

नीरजा त्याला चांगला मित्रच मानायची..पण ग्रुपमध्ये वेगळेच वारे वहात होते!
आता विहानचा जवळपास जोकर झाला होता…म्हणजे 'ग्रुपचा जोकर' अशीच त्याची ओळख झाली होती..आला रे आला की सगळ्यांना हसवायला सुरवात करायचा ते अगदी सगळे 'आता बास' म्हणेपर्यंत हसवायचा..त्याचा स्वभावच होता तो..पण अलिकडे त्या स्वभावाला जास्तीच उधाण आलं होतं..!
नीरजाचं खळखळून हसणं त्याला खूप आवडायचं…ती हसायला लागली की एकटक तिच्याकडे बघत हरवून जायचा..

इतर मित्रमैत्रिणी हा तिच्या प्रेमात पडला असं वाटून प्रोत्साहनच देऊ लागले..तो आला की नकळत इतर सगळ्यांची मिश्किल नजरानजर होऊ लागली..
त्याला मात्र या कशाचाच गंध नव्हता..
तो आपल्याच जगात होता..जे जग आता नीरजाभोवती फिरत होतं..

आणि तिला…?
सुरवातीला तिला काही विशेष नाही वाटलं..
नंतर ती त्याच्यावर लक्ष ठेऊन असायची..त्याचं तिच्याकडे एकटक बघणं तिला खटकू लागलं..त्याच्या डोळ्यात तिला नेहेमी काहीतरी वेगळंच दिसायचं..सगळे चिडवत असले तरी तिला खात्री होती की हे काही प्रेम नाही…
तिची खूप घुसमट होऊ लागली.. आणि इकडे
विहान मात्र दिवसेंदिवस नीरजाबाबत पझेसिव्ह होत होता..
ती त्याला टाळायचा प्रयत्न करायची पण हा कसंही करुन तिला भेटायचाच..
एक दिवस असहाय्य होऊन तिने प्रीतीला, तिच्या जवळच्या मैत्रिणीला हे सांगितलं कि काहीतरी गडबड आहे..पण प्रीतीने हसून त्यावर तिलाच ऐकवलं कि विहान तिच्या प्रेमात आहे एवढीच गडबड आहे!
नीरजाने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला की हे प्रेम नाही..पण प्रितीने तिलाच वेड्यात काढलं...
नीरजाला आता मात्र टेन्शन येऊ लागलं होतं..

तिचं हसणं विरुन गेलं होतं..सांगायचा प्रयत्न केला तरी ऐकणारं कोणी नव्हतं..घरी सांगितलं तर विहानचं काही खरं नव्हतं..पण तिला तसं करायचं नव्हतं..कारण तो तिला तसा काहीच त्रास देत नव्हता..तिच्यापाठी असला तरी flirt करत नव्हता हे तिला जाणवत होतं...त्याचा भाभडेपणा जाणवत होता…पण मग भानगड काय होती..? का तो असा विचित्र वागत होता..?
तिला काहीच कळेना...

क्रमशः

-कांचन लेले

नातं.. (भाग १)

भाग १

विहानला आज त्यांची कॉलेजमधली, मित्रांनी घडवून आणलेली पहिली भेट आठवत होती..
त्याने शेवटच्या वर्षात कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली होती..पण त्याच्या खुशमस्कऱ्या स्वभावामुळे मुलांनी त्याला लगेच आपलंसं केलं होतं..त्याच्या मित्रांचा आणि आता त्यांच्या खास मैत्रिणींचा असा एक ग्रुप होता..
पहिल्या दोन वर्षात जोड्या जुळल्या होत्या..आणि त्यांच्या भल्या मोठ्या ग्रुप मध्ये एकट्या असणाऱ्या नीरजाबरोबर आता विहानची भर पडली होती...

नीरजा..दिसायला देखणी..टॉम बॉय म्हणतात तशी रफ अँड टफ असणारी...
मैत्रिणींनी चिडवले तर म्हणायची काय घाई लागलेली आहे तुम्हाला…? कॉलेज लाईफ एन्जॉय करुदे ना सुखाने…मग प्रेम करायला आयुष्य पडलं आहे..!
आणि इकडे विहान होता मित्रांना सरळच उडवून लावायचा..
प्रेम-बिम सब झूठ है असं त्याचं स्पष्टच मत होतं...!

तरी आता मित्र म्हणजे नाही म्हणेल तेच करायचं असा अलिखित नियमच असतो ना..!
एक दिवस ह्याच्या मित्रांनी आणि तिच्या मैत्रिणींनी कट करुन दोघांना एकटं पाडायचं ठरवलं..सगळे भेटले आणि जोड्यांनी काढता पाय घेतला..उरले फक्त विहान आणि नीरजा..तसे ते भेटले होते आधी त्यामुळे जुजबी ओळख होती…पण भला मोठ्ठा ग्रुप असल्याने कधी दोघांचीच अशी भेट झालीच नव्हती..आणि आज तर त्यांना प्रेमात पाडण्यासाठी म्हणून भेटवलं होतं..!

दोघांनाही चांगलंच माहित होतं की त्यांना मुद्दाम असं एकटं पाडलं आहे..एक मिनिटभर असंच अवघडल्या शांततेत, इकडे तिकडे बघण्यात गेलं..आणि दोघांची नजरानजर झाली..आणि..आणि.. दाबून ठेवलेल्या हास्याचा स्फोट झाला..!
दोघेही खूप हसू लागले…पण दुसऱ्या मिनिटाला विहान मात्र नीरजाकडे बघतच राहिला..खळखळून हसत होती ती...
शेवटी हसणं आवरतं घेऊन निरजानेच विचारलं
'निघूया…?'
त्यानेही सहज हो म्हणून टाकलं..आणि नंतर मात्र त्याला त्याचा पश्चाताप झाला..शेवटी दोघे बाहेर पडणार इतक्यात शक्कल करुन विहान म्हणाला 'आलोच आहोत तर एक पाव भाजी बनती है यार..!..खूप ऐकलंय इथल्या पाव भाजी बद्दल..पण..'
'काय…? तू अजून इथली पावभाजी नाही खाल्लीस…?' त्याला मधेच तोडत नीरजाने प्रश्न केला!
'हो ना गं..म्हणूनच…खाऊया..?'
'चल..मला फारशी भूक नाही पण वन बाय टू सांगू..चालेल..?'
'धावेल..!'
बटर पावभाजीची खास ऑर्डर दिली गेली..ती येईपर्यंत गप्पा रंगल्या..विहान किस्से-विनोद सांगत होता…नीरजा खळखळून हसत होती…विहान तिच्या हसण्याला डोळ्यात साठवायचा प्रयत्न करत होता..
पावभाजी आली…त्यावरचा बटरचा थर विरघळू लागला..अगदी विहानचं मन विरघळलं...
तस्साच…

क्रमशः

-कांचन लेले

क्षण.. (भाग ४)

भाग ४

दुसऱ्या दिवशी सकाळी उशिराच जाग आली..डोक्यात विचार होतेच पण आता विचार करायला वेळ नव्हता..घरातली कामं उरकून ऑफिस गाठायचं होतं...कसे दिवस सरले कळलंच नाही..अख्खा आठवडा ऑफिस आणि कार्यक्रमाच्या तयारीच्या गडबडीत गेला..

आणि रविवारचा दिवस उजाडला..सकाळीच आईचा फोन आला..आई-बाबा गावाला गेले असल्याने कार्यक्रमाला येऊ शकणार नव्हते..आईने नेहेमीप्रमाणे सूचना दिल्या आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या..खरंतर आपला पहिलाच मोठा कार्यक्रम आणि आई-बाबा तो बघायला नाहीत ह्याचं तिला खूप वाईट वाटत होतं..तिच्या गुरु, म्हणजेच दीदीसुद्धा येऊ शकणार नव्हत्या..खरंतर त्यांचीच जागा घेतली होती तिने ह्या कार्यक्रमात..आता त्यांचं नाव राखणं तिच्या हातात होतं…अजयचं टेन्शन होतंच..पण त्याहीपेक्षा कार्यक्रमाचं टेन्शन जास्ती होतं..

अजय तरी कार्यक्रमाला येईल..?
छे..त्याला तर कुठल्याच कला प्रकारची आवड नव्हती…त्याचा फोनही आला नव्हता..कदाचित कार्यक्रमानंतरच बाहेर भेटेल...

तिने भराभर तयारी केली..आणि देवासमोर हात जोडले..मनोमनच तिने देवाला 'आता तू बुद्धी देशील तसं...मला काय करावं  काही समजत नाही..' असं विनवलं..व ती कार्यक्रमासाठी बाहेर पडली..

कार्यक्रम सुरु होणार होता..पण तिचं मन लागत नव्हतं..इतक्या गर्दीत पण तिला कमालीचं एकटं वाटत होतं..तिने रंगमंचाला वंदन केलं आणि पाहिलं पाऊल टाकलं..पडदा बंदच होता..ती रंगमंचाच्या मधोमध उभी होती..
निवेदकाने नाव घोषित केलं..टाळ्यांच्या कडकडाटात पडदा उघडला..

अचानक दिसलेल्या त्या गर्दीची भीतीच वाटली तिला…एरवी छोटे-मोठे कार्यक्रम केले असले तरी तेव्हा कायम पाठीशी दीदी आणि समोर आई बाबा असायचे…तिच्या पायातील सगळी ताकद गेल्यासारखी वाटत होती..तिला पळून जावसं वाटत होतं…इतक्यात..तेच दोन डोळे दिसले..ओळखीचे…आपलेसे वाटणारे..
स्मित करणारे..आत्मविश्वास देणारे..

अजय एका कोपऱ्यात उभा होता..
तिच्या चेहऱ्यावर नकळत हास्य विलसलं आणि तिचे पाय थिरकू लागले…तिने सुरवातच केली ती मागे वळून न बघण्यासाठी..बेभान होऊन नृत्याविष्कार सादर केला आणि पुन्हा एकदा दुप्पट टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडला…

अनन्या स्टेजवरच खाली बसली... क्षणात तिचा सूर तिला गवसला होता..डोळे भरुन आले होते…खूप शांत वाटत होतं..एका वेगळ्याच दुनियेत पोहोचली होती ती..
पण सहकालाकारांनी तिच्या भोवती गराडा घातला आणि ती पुन्हा वास्तवात आली..सगळ्यांना भेटून ग्रीन रूम मध्ये गेली..पहिला मोबाईल बघितला..अजयचा मेसेज होता..
'भारावून टाकलंस..fantastic!
मी खाली गेट जवळ थांबतो आहे..take your own time!'
तिने चार वेळा तो मेसेज वाचला...मोबाईल ठेवला आणि पटकन आवरायला गेली..
मेकअप काढून-कपडे बदलून आवरायला तिला सहाजिकच वेळ लागला..बाहेर आली तर सगळे ग्रुप फोटो साठी थांबलेच होते..सगळं होऊन खाली यायला तिला एक-दीड तास लागला..
आता मात्र तिला भीती वाटली..अजय चांगलाच रागावला असेल..थांबला तरी असेल ना..? आपण खूपच वेळ लावला..

ती धावतच गेट पाशी आली..
तिथे कोणीच नव्हतं..इतक्यात पाठीमागे पावलं वाजली..ती गर्रकन वळली..आणि समोर अजय दत्त म्हणून उभा..प्रसन्न चेहऱ्याने..!
कितीतरी वेळ दोघे नजरेनेच संवाद साधत होते..
शेवटी अजय म्हणाला..
'भूक लागली असेल ना..?..चल..'
तीसुद्धा निमूटपणे त्याच्याबरोबर चालू लागली..
दोघे एका रेस्तराँ मध्ये गेले..
आणि मेनू कार्ड उचलायला तिने हात पुढे केला असता तो सहज म्हणाला..
'अजूनही मलई कोफ्ताच आवडत असेल ना…?'
तिने चमकून त्याच्याकडे बघितलं..तो हसला आणि
त्याने वेटरला बोलावून ऑर्डर दिली..
ती त्याला निरखून बघत होती..आजही त्याने तिचा आवडता लेमन येल्लो कलरचा शर्ट घातला होता..त्याचा हात सहज फ्रेंच कट वरुन फिरला आणि ती म्हणाली..
'अजूनही अमिताभच आवडत असेल ना..?…'
ह्यावर मात्र दोघेही खळखळून हसले…
ती बोलून गेली…'काहीच बदललं नाही रे..'
क्षणात त्याचं खिन्न उत्तर आलं..
'नाही गं..आयुष्याचं गणितच बदललं आहे..
तेवढ्यात वेटरने जेवण आणलं..सर्व्ह केलं..आणि निघून गेला..
तिची प्रश्नार्थक नजर तशीच होती..त्याला उत्तर म्हणून तो बोलू लागला..
'अनन्या..खूप दिवसांपासून तुला सांगायचं होतं..
आई-बाबांचा डिव्होर्स झाला..आज एक वर्ष झालं..
तुला तेव्हाच सांगायचं होतं..पण…पण..नाही जमलं..
दोघांमध्ये एकाची निवड करता नाही आली…म्हणून मग एकटा रहायला लागलो..आणि आता तो एकटेपणा आणि आठवणी सहन होत नाहीत म्हणून दुबईला चाललो आहे..आयुष्य आपल्यासाठी थांबत नसतं ना गं..तुझ्याच भाषेत सांगायचं तर..
The show must go on!…आज तुझा परफॉर्मन्स बघून खूप छान वाटलं..तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद असाच अखंड राहूदे..!'

भावनाविवश झालेला अजय पहिल्यांदाच बघत होती ती…तिच्या डोळ्यात पाणी आलं…ते बघून अजयने सावरलं स्वतःला..
'अगं वेडे तू कशाला वाईट वाटून घेतेस..? मी पण काय वेड्यासारखं तुला सेंटी करतोय..आज तुझा दिवस आहे..! Lets celebrate!'
दोघे जेवू लागले..इतर बऱ्याच गप्पा झाल्या..पण त्याने विषय काढला नाही..
जेवण झालं..दोघे निघाले..बराच उशीर झाला होता..तो तिला त्याच्या गाडीतून घरी सोडणार होता…गाडीतही तो विशेष काही बोलला नाही..ती मात्र तो आत्ता विचारेल..मग विचारेल म्हणून वाट बघत होती..
ते तिच्या घरापाशी आले..त्याने गाडी बाजूला उभी केली..दोघे खाली उतरले..

तिला काय बोलावं कळत नव्हतं..इतक्यात त्याने तिचा हात हातात घेतला....
'अनन्या…thank you so much तू आज भेटलीस..
मी परत येईन न येईन..माहित नाही..काहीच ठरवलेलं नाही..
पण तुला भेटल्याशिवाय जाऊच शकलो नसतो...मी तुला बराच त्रास दिला..त्यासाठी खरंच सॉरी…मुद्दाम नाही केलं गं पण..नशिबातच नव्हतं…आता तर आई-बाबांचं बघून एकटंच रहायचं ठरवलं..
शायद..शायद..तुम किसी और के लियेही बनी हो..!'
त्याने पटकन तिचा हात सोडला..
'बराच उशीर झालाय..निघ तू..thanks once again..आणि All the best for your future…!'
इतकं बोलून तो वळला आणि गाडीकडे चालू लागला..
तिचा सगळा आनंद विरुन गेला..क्षणा क्षणात त्याची पावलं त्याला तिच्यापासून दूर घेऊन जात होती..ती भानावर आली..हाक मारायला सुद्धा घशातून आवाज फुटत नव्हता…तरी तिच्या मनाने घातलेली साद ऐकूनच जणू त्याने मागे वळून बघितलं..ती त्याच्या दिशेने चालू लागली...आणि त्याच्यासमोर उभी राहिली..नजरेला नजर भिडली..
दोघांचे डोळे भरुन आले..आणि तिचा आवाज कानांवर पडला..

'उगाच मला दुसऱ्याच्या गळ्यात मारायचं काम नाही..!'
इतकं बोलून तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं..

काय होतंय हे क्षणभर त्याला कळलंच नाही..कानांवर विश्वास बसत नव्हता..पण डोळे तरी खोटं नाही बोलणार..हे दृश्य बदलू नये म्हणून ते साठवत त्याने डोळे घट्ट मिटले…
तिला त्याच्या ह्रदयाचे वाढलेले ठोके स्पष्ट जाणवत होते..तिचीही अवस्था वेगळी नव्हतीच....अनेक दिवसाचं साठवून तुडुंब भरलेलं मन मोकळं होत होतं आणि
तिच्या डोळ्यातील अश्रू आवडत्या लेमन कलरला गडद करत होते….

समाप्त

-कांचन लेले

क्षण.. (भाग ३)

भाग ३

घरातली कामं आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करुन अनन्या झोपायला गेली..पण काही केल्या झोप लागत नव्हती..ह्या कुशीवरून त्या कुशीवर असं सारखं चालू होतं.. तिला आठवत होता कॉलेजमधला अजय.. देखणा, हुशार पण रागीट आणि जssरा ताठ.. लोकांना वाटायचं श्रीमंत घरचा आहे म्हणून आखडतो..पण तिने त्याला ओळखलं होतं..त्याला एकटं किंवा ठराविक माणसांमध्येच रहायला आवडायचं..कदाचित तो तश्याच वातावरणात वाढला होता म्हणून असेल..कोणी हस्तक्षेप केला, जास्ती जवळीक साधायचा प्रयत्न केला तर साहेबांचा पारा चढलाच..आणि ह्या अगदी उलट होती अनन्या.. पाण्यात साखर विरघळावी तशी मिसळायची कोणातही.. जssरा हट्टी ती सुद्धा होतीच..एकुलती एक होती ना..पण अतिशय लाघवी होती..
तिचं आणि अजयचं ट्युनिंग कधी जमून गेलं कळलंच नाही तिला..

अजयने तिला पहिल्यांदा प्रोपोझ केलं तेव्हा ते फर्स्ट इयर ला होते..तेव्हा तिने 'मला एवढ्यात ह्या सगळ्यात पडायचं नाही' असं म्हणून बोळवण केली होती त्याची..त्यानेही निमूटपणे ऐकलं आणि वाट बघितली होती…मग दुसऱ्यांदा प्रोपोझ केलं तेव्हा तिचं ग्रॅज्युएशन होऊन तिने MCom ला ऍडमिशन घेतली होती..
तेव्हा तिने त्याला सरळच सांगितलं की 'मला फक्त तू एक चांगला मित्र म्हणून आवडतोस..'

अनन्याला सगळ्यांपेक्षा वेगळं मानणाऱ्या अजयला हे चोथा झालेलं उत्तर फारच अनपेक्षित होतं..त्याला खूप राग आला..पण प्रेमच इतकं होतं की तो राग तिच्यावर काढू शकला नाही..तो नकळत तिच्यापासून दुरावला..
तेव्हापासून त्यांचं बोलणं कमी झालं होतं..भेटणं तर दूरच..

अनन्याने परत कूस बदलली..झोप येत नव्हतीच..डोळे घट्ट मिटून घेतले ..पण व्यर्थ..बंद डोळ्यांसमोरही अजयचाच चेहरा येत होता..
परत चक्र फिरु लागली..

इजा-बिजा केव्हाच झाला होता..आता तिजा पण तसाच करावा लागणार का…?
तिला अजयला परत दुखावण्याचा विचारच सहन नाही झाला..
तो खरंच एक चांगला मुलगा होता..खरंतर तिला कळायचंच नाही तो तिच्या प्रेमात कसा पडला..कारण तसं बघायला गेलं तर सगळ्याच बाबतीत तो उजवा होता..अगदी दिसण्यापासून हुशारीपर्यंत..
नाकारण्यासारखं त्यात काही नव्हतंच…पण मग का तिने त्याला दोनदा नकार दिला…?
कारण एवढंच कि सगळं चांगलं आहे म्हणून होकार देण्यात तिला काहीच अर्थ वाटत नव्हता..

क्रमशः

-कांचन लेले

क्षण.. (भाग २)

भाग २

परत फोन करावा कि न करावा अशा संभ्रमात असतानाच बस आली..तिने पटकन फोन पर्स मध्ये टाकला आणि गर्दीत सामावून गेली.. डोक्यात मात्र 'कशाला बरं फोन केला असेल अजयने..?' हेच होतं.. तेवढ्यात तंद्री भंग करायला कंडक्टर आला..तिने तिकीट काढलं आणि परत विचार करण्यात मग्न झाली..
अजय आणि अनन्या खूप चांगले मित्र असूनही फोनवर फार बोलणं व्हायचं नाही..बोलणं खूप व्हायचं ते आधी मेसेजवर, मग whatsapp किंवा फेसबुक वर..कॉलेजमध्ये असेपर्यंत भेटायचे पण त्या नंतर मुद्दाम असे एक-दोनदाच भेटले होते ते..दोन वर्षं झाली असावीत शेवटच्या भेटीला..तिलाही नीटसं आठवेना..
हल्ली बरेच दिवसात बोलणंच झालं नव्हतं..दोघांचेही कामाचे व्याप वाढले होते, जबाबदारी वाढली होती आणि सहाजिकपणे स्वतःसाठी वेळ कमीच मिळायचा..

तिचा स्टॉप आल्यावर ती उतरली आणि घराकडे चालू लागली..
घरी पोहोचते न पोहोचते तोच अजयचा मेसेज आला..
'Hi..क्लास घेत होतीस का गं..?
Free झालीस कि फोन कर..थोडं महत्वाचं आहे.. :) '
तिला आपल्या श्वासाची लय वाढल्यासारखी वाटली.. 'महत्वाचं' म्हणजे काय ह्याचा तिला पूर्ण अंदाज होताच..
तिला काही सुचेनासं झालं..पण फोन तर कधीतरी करावाच लागणार होता..काय व्हायचं ते एकदाच होउदे असा विचार करुन तिने त्याला फोन लावला..
'Hi अनन्या..कशी आहेस..?'
त्याचा आवाज ऐकताच तिच्या पोटात गोळा आला होता..पण आवाज स्थिर ठेवत ती बोलू लागली..
'मी छान..तू कसा आहेस..? आज माझी आठवण कशी काढलीस..?'
'तुझी आठवण रोजच येते गं..'
दोन सेकंदाचा सस्पेन्स पॉझ..सावरुन घेत अजय पुन्हा म्हणाला
'अगं तुला सांगायचं होतं की माझं प्रोमोशन झालंय..आणि मला दुबईच्या ऑफिसला जॉईन व्हायचं आहे..'
तिला इतकं हायसं वाटलं..हे महत्त्वाचं होतं तर..
'अरे वाह..अभिनंदन..! कधी जाणार आहेस..?'
'दहा दिवसांनी..बुधवारचं फ्लाईट आहे..'
'अच्छा..मस्त रे..आई-बाबा खुश असतील ना..?'
'हो.. अगं मी काय म्हणत होतो…अ..जायच्या आधी मला एकदा भेटायचं होतं तुला..'
तिला परत धडधडू लागलं..पहिलाच अंदाज बरोबर होता तर..आता काय करु..?
इकडे त्याला मध्ये गेलेली दोन सेकंद सुद्धा तासासारखी वाटत होती..
शेवटी आला तिचा आवाज..
'अ…चालेल ना..भेटूया..'
'तुला पुढच्या रविवारी वेळ आहे का..? कारण मी आठवडाभर पुण्याला जाणार आहे..काही कामं पेंडिंग आहेत ती संपवायची आहेत..'
'अरे..पुढच्या रविवारी संध्याकाळी माझा कार्यक्रम आहे MG theatreला..कथ्थकचा..सो सॉरी..'
'हो का…? मग…अ…हरकत नाही..मी येईन..
कार्यक्रम झाला की भेटू..चालेल..?'
'बरं..चालेल..'
'Done मग..मला कार्यक्रमाच्या डिटेल्स मेसेज करशील प्लिज..? मी करेनच तुला शनिवारी फोन..तरी..'
'हो..चालेल..नंतर बोलूया..? जस्ट घरी पोहोचले आहे रे...'
'हो हो…नो प्रॉब्लेम..बाय..!'

ओठांवर आलेला होकार आणि मनात असलेला नकार ह्यांची बेरीज वजाबाकी करत अनन्या कामाला लागली..

क्रमशः

- कांचन लेले 

क्षण.. (भाग १)

भाग १..
"Thank you ताई..bye..!!"
"Bye, नीट जा हा.."
मुलं निघाली..क्लास संपला होता आणि म्हणजेच रविवारचा हक्काचा सुट्टीचा दिवसही संपत आला होता.. अनन्याने विचार झटकले, बांधलेली ओढणी सोडून नीट घेतली, पर्स घेतली आणि क्लासच्या खोलीला कुलूप लावून चावी वॉचमन काकांकडे दिली आणि ती निघाली..

अनन्या..एक मध्यमवर्गीय घरातील आई वडिलांची एकुलतीएक लाडकी लेक.. नाकी डोळी सुंदर..रंग सावळा..सडपातळ बांधा आणि त्याला साजेल अशी मध्यम उंची.. 

अभ्यासात बऱ्यापैकी असायची अनन्या, तिने BCom आणि नंतर MCom केलं व बँकेत नोकरीला लागली पण तिचा विशेष गूण म्हणजे नृत्य..! लहानपणापासूनच कथ्थक शिकली आणि त्यात यंदा विशारद  झाली.. ऑफिस सांभाळून शनिवार-रविवारी ती मुलांना कथ्थक शिकवत असे.. पाय थिरकू लागले की एका वेगळ्याच जगात जायची ती..तिचा बोलका चेहरा सगळ्या भावना पोहोचवायचा आणि तिचा सावळा रंग चेहरा खुलवायचा…

अनन्याने घरचा रस्ता धरला  होता..मध्येच फोन वाजला..अजयचं नाव बघताच क्षणभर ती रेंगाळली...
अजय..अनन्याचा मित्र..तसं म्हंटलं तर जवळचा मित्र..शाळा-कॉलेजपासूनचा..श्रीमंत घरचा पण त्याचा कधी माज न करणारा..
CS करुन एका चांगल्या कंपनीत जॉब करत होता..
अनन्या त्याला जवळचा मित्र मानायची, होताच तो..! पण तो तिला त्यापलीकडे पाहायचा..अगदी कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासून प्रेमात होता तो तिच्या..

फोन वाजून वाजून बंद झाला आणि अनन्या भानावर आली..
क्रमशः

- कांचन लेले

मृगजळ..

मृगजळ..
आज संध्याकाळी सहज डोकं वर काढलं व्यस्त दिनक्रमातून आणि घेतला कॅमेरा हातात..खरंतर ह्याचं कारण वेगळं होतं..काल कोजागिरी पौर्णिमा होती..रात्री घरी येताना मला सोबत करत होता तो गोल गरगरीत देखणा चंद्र..येतायेतच ठरवलं होतं की घरी जाऊन ह्याला कॅमेरात बंद करायचं, पण घरी आले आणि राहूनच गेलं..तीच रुखरुख दिवसभर छळत होती..म्हणून म्हंटलं चंद्राचा नाही तर निदान मावळत्या दिनकराचा तरी फोटो काढावा..तर..म्हणून कॅमेरा घेऊन गॅलरीत उभी होते. झाडांमधून दिसणारा मावळतीचा सूर्य म्हणजे अप्रतिम दृष्य..पण शेवटी तोही घड्याळाच्या काट्यावर चालणारा..गेला निघून..पण तरी दिवस मोठे असल्याने अजून काही अंधार पडला नव्हता..म्हणून गॅलरीतच रेंगाळले जरा..सहज नजर खाली गेली आणि दिसलं ते जास्वंदीचं झाड..! काय सुंदर दिसत होतं..पूर्ण हिरवं आणि मधेमधे आलेली लालबुंद फूलं..त्याच्या शेजारीच सदाफुलीचं झाड काय बहरलं होतं..
या सदाफुलीची मला गंमतच वाटते..तिच्यात आणि माणसामध्ये किती साम्य आहे नाही..? माणूस जसा थंडी-वारा-ऊन-पाऊस काही काही न बघता कामाचा गाडा ओढत असतो, तशीच हि सदाफुली..ऋतू कुठलाही असो, आपल्याला नेत्रसुख द्यायला सदैव सज्ज असते..मग विचार केला की इतकं साम्य असूनही ही सदाबहार सदाफुली हवीशी आणि माणसाचं दाव्याला जुंपलेल्या बैलासारखं केलेलं काम नकोसं का वाटतं…? सोपं आहे की…सदाफुली फुलते ती निस्वार्थ भावनेने, दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी आणि माणूस मात्र झटतो तो केवळ हव्यासाने, स्वार्थी भावनेने...काही माणसं  सदाफुलीचे गूण घेऊन जगत असतात..काही मात्र काल्पनिक सुखाच्या मृगजळामागे वेड्यासारखे धावत असतात…
मग आपण कशात मोडतो…?
अं…जाऊदे…
तो विचार नको म्हणून सदाफुलीवरुन नजर हटवली आणि समोर बघितलं..रस्त्यापालिकडे एक झाड इतकं छान बहरलेलं..छोट्या पिवळ्या फुलांनी मढलेलं..लाइटिंगची माळ लावावी अगदी तस्सं दिसत होतं..निव्वळ अप्रतिम..! पण इतके दिवस कसं नाही दिसलं हे झाड आपल्याला…? त्याचं नावही माहित नाही..कदाचित..कदाचित ते आपल्या फायद्याचं नाही म्हणून नसेल माहित….फायदा…म्हणजे..म्हणजे..मीही मृगजळामागे धावते आहे का…? छे…काहीतरीच..
तोही विचार नको म्हणून नजर फिरवली..आणि चक्रावलेच..!
शेजारच्या झाडावर पांढरे बगळ्यासारखे पक्षी होते..अरे हो..!
ह्याच पक्ष्यांचे फोटो काढण्याच्या निमित्ताने गेल्यावर्षी हट्टाने कॅमेरा घेतला होता की…आणि तो घेतल्यावर मनसोक्त फोटोही काढले होते..
अरेच्चा..! म्हणजे कॅमेरा घेऊन एक वर्ष झालं..?
Time flies! म्हणतात ते उगच नाही..
माणूस काळाशी शर्यत लावून धावतो आहे..घोड्यासारखी स्वतःच्या डोळ्याभोवती ढापणं लावून..
एका रम्य संध्याकाळी, समुद्रकिनारी उभं असताना माणसाला त्या समुद्राकडे, त्याच्या आजूबाजूच्या देखण्या दृष्याकडे बघून समाधान वाटत नाही..कारण त्याची नजर शोधत असते त्या समुद्राच्या न दिसणाऱ्या दुसऱ्या किनाऱ्याला…आणि मग सगळं सोडून 'तो' न दिसणारा किनारा शोधायला निघतो हा पठ्ठ्या समुद्रात होडी टाकून..होडी पुढे जात असते…मागचं दृश्य धूसर होत असतं..ह्या किनाऱ्यापासून त्याचं अंतर अधिकाधिक वाढत असतं…दुसरा किनारा गाठण्याच्या वेडापाई त्याला हे अंतर जाणवतच नाही…
खूप प्रवास केल्यानंतरही तो किनारा काही सापडत नाही तेव्हा थकलेला देह जरा दम खावा म्हणून क्षणभर थांबतो…मागे वळून बघतो…पण चहूबाजूंनी दिसतं ते निळशार पाणी…डोळ्यात भरणारं..
माणूस भेदारल्यासारखा होतो…थंडगार वाऱ्यात दरदरून घाम फुटतो…आणि दाटून येतात त्या मागे सोडलेल्या किनाऱ्याच्या आठवणी…मग तोंडचं पाणी पळतं आणि डोळ्यातून टचकन खाली पडतं...पन तरी
निर्धाराने माणूस उठतो.…व्याकुळ मनात दाटलेल्या किनाऱ्याच्या ओढीने नाव वळवतो…
आशा असते मागे सुटलेलं सगळं परत मिळवण्याची..
आशा असते मधल्या गेलेल्या काळाची पोकळी भरुन काढण्याची...
आणि आशा असते यापुढे न दिसणाऱ्या किनाऱ्याच्या विचार न करता दिसणाऱ्या समुद्राला बघण्यात आनंद मानण्याची…

- कांचन लेले 

Tom and Jerry!

टॉम अँड जेरी!
Tom and Jerry!
ड्राईव्ह करत असताना अचानक फोनने ओळखीची साद दिली..
निहारच्या नंबरला सेव्ह केलेल्या कस्टम रिंगटोनचा आवाज होता तो..
वैतागलेल्या रियाचा मूड एकदम बदलला..
तिला माहीतच होतं तो काही तिचा वाढदिवस विसरणार नाही..
पण रात्री १२ वाजता विश करायचा नेम मात्र त्याने आज मोडला होता..
पण आज त्याला ते माफ असलं पाहिजे होतं..
तिने आवाज ऐकताक्षणी मोबाईल घेण्यासाठी हात पुढे केला, आणि मग लगेच मागे घेतला..
'बघूदे थोडी वाट..मी नाही वाट बघितली रात्रीपासून..?
मान्य आहेत सगळी करणं...पण काय झालं असतं रात्रीच आठवणीने विश केलं असतं तर..आणि रात्री नाही केलं तर किमान सकाळी फोन तरी करावा..पण नाही..नेहेमीप्रमाणे मेसेज केला असेल..
आता विसरेलच तो मला..
आज इतके वर्षात पहिल्यांदाच वाढदिवसाला भेटणार पण नाहीये तो..
आता ह्याची सवयच करुन घेतली पाहिजे म्हणा..'
ड्राईव्ह करता करता स्वतःशीच अशी बडबड सुरु होती तिची..
'काय वेड्यासारखे विचार येतायत डोक्यात..त्याची बिचाऱ्याची काय चूक त्यात..? उगाच त्याला दोष देते आहे..आणि बदलत्या परिस्थिती प्रमाणे बदलायला नको का आपण..नवीन लोकांना सामावून पुढे गेलं पाहिजे....'
ताठ मनाच्या जुन्या बडबडीला बगल देऊन हळव्या मनाच्या ह्या नवीन बडबडीने तिला व्यापलं..
आणि मग न राहवून गाडी बाजूला घेऊन रियाने मोबाईल हातात घेतला.
'Happy Birthday Jerry :)'
दरवर्षीचाच पारंपरिक मेसेज इनबॉक्स मध्ये येऊन पडलेला होता..
'Thank You Tom'
पारंपरिक पद्धतीने तिने रिप्लाय दिला..
पण आज त्या रिप्लाय मध्ये स्मायली नव्हती...
त्याला मेसेज मिळताक्षणी तेवढाही फरक लगेच जाणवला..काहीसा अपेक्षितही होताच....
'Where's the party tonight..?'
लगेच निहारचा दुसरा मेसेज येऊन धडकला..
तिने मनात होणारी कालवाकालव शांत करण्याचा प्रयत्न करुन उत्तर पाठवलं..
'Out of your coverage area!'
त्याला हा मेसेज मिळताच त्याने तो शेजारी बसलेल्या मीराला
दाखवला...आणि दोघे मनसोक्त हसले..आणि मग त्याने
'Haha' एवढाच रिप्लाय पाठवला..
तिला थोडी आशा होती की तो म्हणेल मी पार्टी असेल तिथे येतो म्हणून..
पण छे..त्याचा रिप्लाय बघून तिचा मूड परत गेला..
फोन सायलेंटवर करुन तिने पुन्हा गाडी सुरु केली आणि ऑफिसला जायचा रस्ता धरला..
दिवसभर वाढदिवसाचे अनेक मेसेज, कॉल्स येत होते...
ऑफिसमधल्या कलीग्सनी साधंच पण छान डेकोरेशन केलेलं होतं..
लंच ब्रेक मध्ये केक कापला गेला...तिने सगळ्यांना पिझ्झा ट्रीट दिली..
पण मूड मात्र खास नव्हताच..
फक्त बाकीच्यांसाठी हसत होती ती..
एरवी दिवस कसा पटपट निघून जायचा..आज मात्र काही केल्या घड्याळाचे काटे पुढे सरकतच नाहीयेत असं वाटत होतं तिला..
४ च्या दरम्यान पुन्हा मेसेज आला निहारचा..
'See you at the airport by 8. Flight details in your mailbox'
तिने दोनदा तो मेसेज वाचला..एकदा तिला मस्करी वाटली...
मग एकदम आनंदाची उकळी फुटली..तिने त्याला लगेच कॉल केला..
'The number you have dialed is currently switched off..please try again later.'
ती परत हिरमुसली..पुन्हा मेसेज बघितला..
मग अचानक तिला आठवलं आपण ई-मेल चेक केला पाहिजे..
मेलबॉक्स उघडला पण त्याचा एकही मेल दिसला नाही..
रिफ्रेश केलं..तरी एकही नवीन मेल नाही..
आता मात्र तिला त्याचा प्रचंड राग येत होता..
तेवढ्यात नवीन मेल आल्याचा टोन वाजला..
तिने अधीरतेने बघितलं तर तो ऑफिसचाच मेल होता..
तिने रागाने फोन टेबलवर जवळपास आपटलाच..
आणि डोळे बंद करुन खुर्चीवर बसली..
डोक्यात असंख्य विचार..एकीकडे तो असं करणार नाही असा विश्वास तर दुसरीकडे राग अशी धुमश्चक्री सुरु होती..
काही वेळ असाच गेला..
गालांवर ओघळलेले अश्रू सुकूले होते..
आणि अचानक तिने चमकून डोळे उघडले...
मोबाईल हातात घेतला आणि ई-मेल अकाउंट ऑफिस वरुन पर्सनलला स्विच केलं..
मीराचा मेल तिची वाट बघत होता...त्यात फ्लाइट डिटेल्स होती...
तिला स्वतःचाच खूप राग आला...आणि तितकीच ती आनंदाने हरखून  गेली...अगदी सगळ्यांना ओरडून सांगावंसं वाटत होतं तिला..!!
घड्याळात बघितलं तर फक्त ५ वाजले होते..आता मात्र घड्याळाचे काटे पुढे सरकतच नाहीत असं वाटत होतं तिला..!
तिने लगेच सगळं आवरलं..ऑफिसमध्ये सांगून ती निघाली..
गाडीत अगदी आवडतं लता आणि रफीची ड्युएटस् असलेलं फोल्डर लावलं..
एअरपोर्ट जवळच्या मॉलपाशी गाडी उभी करुन ती आत गेली..
निहारसाठी तिच्या आवडत्या रंगाचा शर्ट आणि मीरासाठी मात्र निहारचा आवडीच्या रंगाची कुर्ती घेतली..
आपल्या आवडीची चॉकलेट्स सगळ्यांसाठी घेतली..सगळी खरेदी झाली तरी घड्याळात मात्र ७ वाजले होते फक्त..मग काय करावं असा विचार करुन ती समोर दिसणाऱ्या कॉफीशॉपमध्ये गेली..
सगळं सामान ठेवलं आणि तिच्या आवडत्या कॅपुचीनोची ऑर्डर देऊन निवांत बसली..
सकाळपासून झालेलं सगळं आठवून तिला स्वतःचंच खूप हसू येत होतं..
तिने फोन मध्ये तिचे आणि निहारचे कॉलेजपासूनचे फोटो बघायला घेतले..सगळे फोटो एका वेगळ्या फोल्डरमध्ये ठेवले होते तिने..
अगदी अकरावी-बारावीत असतानाचे ते दोघे..रिया अगदी बावळट आणि नुकतं मिसरुड फुटत असलेला निहार शेमळट दिसत होते!
इतक्यात तिची ऑर्डर घेऊन वेटर आला..
मग एक एक घोट घेता घेता एक एक वर्षाच्या आठवणी पुढे सरकत होत्या..एफ व्हाय..एस व्हाय..टी व्हाय..
अगदी ग्रॅज्युएशन पार्टी...मग नोकरी लागल्यावर पहिल्या पगारातून केलेली पार्टी..दर वर्षीची वाढदिवसाची पार्टी..मग दोन वर्षांनी निहार आणि मीराचं जमल्यावर केलेल्या पार्टीचे फोटो..मग अगदी आत्ताचे..त्या दोघांच्या लग्नाचे फोटो..
रियाने निहारची बिदायी करताना काढलेले स्पेशल वात्रट फोटो..
काही मिनिटात अनेक वर्षांच्या आठवणी डोळ्यापुढून गेल्या..
कप रिता झाला होता..आणि मन मात्र काठोकाठ भरलं होतं..
७.३० वाजून गेले होते..
तिने सामान घेतलं आणि गाडीत ठेवलं..आणि एअरपोर्ट कडे निघाली..
टर्मिनल गेटपाशी उभी राहून मिनिट मिनिट वर्षासारखं वाटत होतं तिला..आणि शेवटी दिसले दोघे..
ते येताच तिने दोघांना घट्ट मिठी मारली..
'आता काय गुदमरुन मारतेस कि काय..म्हणजे तुझा वाढदिवस आणि आमची पुण्यतिथी..!' इति निहार..
रिया त्याला मारत मारत 'लाज वाटते तुला थोडी तरी असलं बोलायला..? येणार होतास तर आधीच नाही सांगता आलं..मुद्दाम मला छळतोस..'
आणि तो तिचे फटके चुकवत चुकवत शेवटी मीरामागे लपला..
'का..? तुला एवढी खात्री नको कि आम्ही येऊ..? पण नाही..आता हनिमूनला गेलोय म्हणून मी तुला विसरणार..मग आता ह्याची तुला सवय केली पाहिजे..आता सगळं बदलेल असले भाकड विचार करत बसली असशील ना..?'
त्याच्या अचूक अंदाजानेसुद्धा रिया सुखावते..
मीरा आनंदाने दोन वेड्या मित्रांना भांडताना बघत असते..
आणि आजही
टॉम अँड जेरीचा खेळ सुरूच रहातो..!

- कांचन लेले

एक पाऊल..

एक पाऊल..

आज थोडा मूड वेगळाच होता स्वारीचा..
नेहेमीच्या टीप-टॉप, ऑर्गनाईझ्ड दिनक्रमाला झुगारुन लावायचं असा निश्चयच होता मुळी…
सकाळी उठल्या उठल्याच मोबाईल बघितला आणि तिचा-त्याचा एकत्र फोटो वॉलपेपर म्हणून दिसला…
पुन्हा तीच अस्वस्थता, तीच चिडचिड, तोच इगो, तोच राग…
त्याने क्षणभर मोबाईलची स्क्रीन लॉक केली…आणि डोळेही..
बंद डोळ्यांसमोरही आली ती तिच्या गालावर पडणारी खळी..
आणि नकळत उमटलं हसू त्याच्याही गालावर..
मग त्याने डोळे उघडले..
उठून खिडकीपुढचा पडदा सारला..
झरकन आलेल्या प्रकाशाने तो थोडा भांबावला, मग सुखावला..
त्याच्या अंधाऱ्या आयुष्यात असाच प्रकाश घेऊन आली होती ती..
पण त्याने भांबावण्यातच इतका वेळ घालवला कि सुखावायच्या वेळी ती त्याच्यासोबत नव्हतीच…
स्वतःच्याच वेडेपणावर आज हसू येत होतं त्याला..
हो, अशाही प्रसंगात हसूच येत होतं..कारण त्याला खात्री होती,
ती आजही आहे त्याच्यासाठी..कितीही नाही म्हणाली तरी..
पटकन आवरायला म्हणून गेला..आवरुन नेहेमीचे कडक इस्त्रीचे फॉर्मल कपडे घालून आरशासमोर उभा राहिला…
पण त्याला आरशात तो दिसलाच नाही…
दिसला एक यंत्रमानव..घड्याळाच्या काट्याच्या हातातली कळसूत्री बाहुली असलेला..
एरवी तो हताश झाला असता, पण आजचा दिवस वेगळा होता..
त्याने कपाट उघडलं आणि सगळ्यात खाली असलेला,
तिथेच वर्षभर पडून असलेला एक शर्ट काढला..
'जोकर वाटेन मी ह्या शर्टमध्ये..काहीही काय उचलून आणतेस..?'
'नाही वाटणार..घालून तरी बघ एकदा.. मला तू जोकर वाटलेला चालेल का…?'
'Please..आता emotional डोस नको देऊस हा..मी असलं काही घालणार नाही अँड thats final.'
'……..'
काय म्हणाली होती ती ह्यावर…?
का आठवत नाहीये आपल्याला...? का ती काही न म्हणताच निघून गेली होती..?
हो कदाचित….आणि मला कळलंच नाही…
त्याच्या ह्याच स्वभावामुळे तिने एक पाऊल मागे घेतलं होतं..आणि मग त्यानेही..
त्याने एकवार त्या शर्टकडे बघितलं..
घातलेला कडक इस्त्रीचा शर्ट काढला आणि बेडवर भिरकावला..
अगदी गांगुलीने भिरकावलेला तस्साच..
मग स्वतःशीच हसत त्याने तो 'जोकर' शर्ट घातला..
आणि निघाला..
घरातून निघताना सवयीने त्याने घराची आणि गाडीची चावी घ्यायला हात ड्रॉवर मध्ये घातला..
पण फक्त घरचीच चावी घेऊन निघाला..चालतच..
जाता जाता एक फुलांचा गुच्छ घ्यावा असं त्याच्या मनात होतं..
त्याप्रमाणे दुकानापाशी गेला..पण काही न घेताच परत फिरला..
शेजारच्या दुकानातून काही चॉकलेट्स घेतली आणि चालू लागला..
रस्ता क्रॉस करत असताना एक लहान मुलगी गजरे विकत होती..
त्याने तिच्याकडून गजरा घेतला आणि तिला दोन चॉकलेट्स दिले..
एरवी कधी ढुंकूनही बघत नसे तो अशा लोकांकडे..
पण आज त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला खूप काही देऊन गेला…
येऊन तिच्या ऑफिसच्या खाली उभा राहिला..
पण आजच नेमका तिला यायला उशीर झाला होता..
ती जवळपास धावतच ऑफिस गाठत होती..
पण ह्याला बघताच तिचे पाय वेग विसरुन जागीच थांबले…
तो तिच्याजवळ आला..
'आज सुट्टी टाकशील..?'
'अ…मीटिंग आहे...दुपारपर्यंत तरी थांबावच लागेल ऑफिस मध्ये..'
त्याने स्मितहास्य केलं..
तिच्यासाठी त्याचं हे रूप नवीन होतं..
त्याच्यासाठीही नवीन होतं..
त्याने शांतपणे उत्तर दिलं..
'हरकत नाही..काम झालं की फोन करशील..? मी थांबतो..'
'चालेल..'
ती पुढे जाऊन मागे वळली..
'शर्ट अजून जपून ठेवला असशील असं वाटलं नव्हतं..'
'सगळं जपून ठेवलं आहे..आणि कायम ठेवेन...हे तुझ्यासाठी..'
त्याने पिशवी तिच्याहाती दिली..तिने घाईघाईतच ती घेतली आणि न बघताच बिल्डिंगमध्ये निघून गेली..
सही केल्यावर आपल्या क्युबिकल मध्ये जाऊन जरा शांत बसली..
पाणी प्यायलं..
दोन क्षण विचार केला..
हा इतका वेगळा का वाटला आज..?
हे खरं होतं का स्वप्न..?
पण मग तिला त्याने दिलेली पिशवी दिसली..
जवळपास झडप घालूनच तिने ती हाती घेतली..
आणि आत गजरा आणि तिची आवडती चॉकलेट्स बघून तिचे
डोळे भरुन आले..
तिने मोबाईल बघितला..
त्या दोघांचा तोच फोटो तिच्याही फोनवर वॉलपेपर होता..
तिने ऑफिसचा फोन उचलून एक नंबर फिरवला
'Hello Sir, I am calling from CGT..I'm sorry sir, I won't be able to meet you today for our scheduled meeting. I sincerely apologise to you for that.'
समोरचं उत्तर ऐकायलाच नाही आलं तिला..
तिने पर्स उचलली..पिशवी घेतली..
आणि निघाली.…
आज त्याने एक पाऊल पुढे टाकलं होतं..
आणि आता…
तिनेही….

- कांचन लेले

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच.. 
कसे….?
सांगते!

राधा…

एकदा ह्या नावाचा अर्थ ऐकला..आणि तो आजवर मनात रुंजी घालत आहे..तो असा,

प्रवाहात मिसळून जाते ती धारा आणि
प्रवाहा विरुद्ध जाते, ती राधा..

आपल्या प्रत्येकाच्या मनात एक राधा दडलेली असतेच की!
जिला कायम प्रवाहाविरुद्ध पोहायचं असतं..
जिचं स्वतःचं असं ठाम म्हणणं असतं!
जी लोक, समाज, केलेल्या गोष्टींचा/कृतीचा परिणाम या सगळ्याला झुगारून स्वैर वावर करायला तयार असते..
त्या राधेविषयी मला कायमच कुतूहल वाटतं..
त्याच राधेला शोधण्याचा प्रयत्न माझ्या लेखणीतून होत असतो बहुतेक...
कधीकधी अगदी सहज गवसते, तर कधी खूप वाट पाहायला लावते!
अशीच आहे ती…गूढ, अगम्य आणि तरीही निर्मळ!
तिने साद घातली की हातात असलेलं काम टाकून तिच्यामागे धावणं हे आलंच! 
तसं नाही केलं तर कधीकधी इतकी रागावते कि मग फिरकतच नाही किती दिवस..
तिला खूप जपावं लागतं..
पदार्थातल्या चिमूटभर मिठासारखी आहे ती! 
नसली तर अळणी, आणि जास्त झाली तर खारट!
म्हणूनच मला नेहमी वाटतं प्रत्येकाने 'तिला', आपल्यातल्या राधेला
चिमूटभर जागा द्यावी आपल्या आयुष्यात! 
आणि मग चव घ्यावी ह्या सुंssदर जीवनाची..
नाहीतर अळणी आयुष्य जगणारे काही कमी आहेत का..?
आयुष्याचं गाडं ओढत असतात बिचारे..पण त्यातला आनंद काही घेता येत नाही त्यांना!
म्हणूनच वेळीच ऐकावी राधेची साद..
आणि द्यावी  तिला योग्य दाद!

माझ्यातल्या राधेची एक साद म्हणजेच माझं लिखाण..आणि त्यातून निर्मित होत असलेला हा ब्लॉग प्रपंच!

म्हणून त्याचे नाव 'राधा उवाच..!' :)


तुमच्या प्रतिसादाची आणि प्रतिक्रियांची वाट बघत आहे! :)

तुमचीच,
राधा….उर्फ
कांचन लेले :)