Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Wednesday 26 July 2017

अंगणी पारिजात फुलला!


'अंगणी पारिजात फुलला..'
गाणं रेडिओ वर वाजत होतं..
पहाटेकडून सकाळकडे जाणाऱ्या प्रहरात पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडत होता..
आणि गाण्याच्या प्रत्येक ओळीला खिडकीबाहेरील पारिजातकाची काही फुलं गळुन पडत होती..
पारिजातक म्हणजे इन्ट्रोव्हर्ट माणसासारखं वाटतं मला..
एरवी अख्खं जग सूर्याच्या आगमनाने जागं होतं..पण हे मात्र सगळं जग शांत झालं की रातराणीच्या सुगंधाने जागं होतं!
रात्रीच्या कुशीत फुलणारं..पहाटेचं तांबड फुटल्यावर बहरणारं..
आणि दिवस सुरू झालं की मात्र गळून पडणारं..आगळंच झाड!
'बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला..पारिजात फुलला'
जयमालाबाई गातच होत्या..
झाडावरुन पडणाऱ्या आणि पडायची वाट बघणाऱ्या फुलाच्या मनात काय विचार असतील असा विचार सहज मनात येऊन गेला..
काही फुलं नुसतीच खाली गळून पडतात..काही पडलेली फुलं वेचली जातात..पुढे एखादीच्या केसात माळलेली दिसतात..झाडावरची काही फुलं तोडून पूजेसाठी नेली जातात..
तर काही फुलं नुसतीच ओंजळीत घेऊन प्रिय व्यक्तीवर बरसली जातात..प्रेमाचा नाजूक सुमन वर्षाव!
पण खरं सौंदर्य असतं ते पडलेलं फूल तसंच रहाण्यात..
त्यात प्रत्येक पडणाऱ्या फुलाची भर पडण्यात..
आणि काही वेळा नंतर अगदी पायघड्या घालाव्या तसा सुंदर सडा तयार होण्यात…
काही तासांचं आयुष्य त्या नाजूक कोमल फुलाचं..
पण किती आयुष्यांमध्ये बहर आणून जातं..नाही..?!
आपल्याला मिळतात अनेक दिवस-महिने-वर्ष…
खरंच त्याचा उपयोग करतो का आपण…?
'धुंद मधुर हा गंध पसरला, गमले मजला मुकुंद हसला,
सहवासातून मदीय मनाचा कणकण मोहरला..
पारिजात फुलला…'
रेडिओवरचं गाणं आणि परिजातकाचा सुंदर बहर अंताकडे मार्गस्थ होत होता…आणि दुनिया धावत्या आयुष्याची वेगवान सुरवात करण्यात मग्न होती…©कांचन लेले


Photo Credit - Swapnil Bhade

3 comments:

  1. छान , सुटसुटीत , प्रसन्न लिखाण....शेवट प्रभावी....मस्तच एकदम

    ReplyDelete
  2. एक वेगळीच insight... अशीही...
    कांचन... 👍

    ReplyDelete