Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Thursday 28 January 2021

ऋषिकेश-मसुरी - भाग ५!

त्रिवेणी घाट म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम आहे..असं मानलं जातं की जराचा बाण जेव्हा श्रीकृष्णाला लागला तेव्हा भगवान या ठिकाणी आले होते..
आणि तिर्थक्षेत्र म्हणून ऋषिकेशचं जे महत्व आहे, ते या ठिकाणी सर्वात जास्ती आहे..गंगेत पापं धुतली जातात असं म्हणतात, हेच ते ठिकाण!
इथलं जे आरतीचं स्थळ आहे, तिथे असा लांब पॅच आहे..खाली पुजाऱ्यांसाठी लेव्हल लावलेल्या आणि त्या मागे पायऱ्या केलेल्या आहेत ज्यावर लोकं बसतात..

आधीपासूनच तिथे मागे live भक्तीगीत गायन सुरू होतं.. पेटी घेऊन ते गृहस्थ गात होते..तबला संगत होती..आणि ऑक्टोपॅड वाजवणारा एक माणूस होता..
मग काही वेळात महाआरतीला सुरवात झाली..
जवळजवळ १०-१२ विविध वयोगटातील पुजारी हातात दिवे घेऊन त्यांच्या जागेवर आले..आणि मग त्या गायकाने आरतीला सुरवात केली..
आधी सुरू असणाऱ्या गाण्यांना एकवेळ ड्रमचे वगैरे इफेक्ट चालून गेले..पण आरतीला सुद्धा जेव्हा ऑक्टोपॅडवर  विविध पाश्चात्य वाद्य वाजू लागली तेव्हा मात्र मला तरी ते कानाला खूप खटकलं..म्हणजे जी शांतता अपेक्षित असते ती काही केल्या मिळेना मग जरा अस्वस्थ वाटू लागतं..
हे माझं वैयक्तिक मत आहे..इतरांना ते आवडू शकतं..
तर अशी आरती झाली..सर्व पुजाऱ्यांनी सुसूत्रतेने केली..फार मोहक चित्र दिसत होतं..मग आम्ही दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि मगाशी समोसेवाल्याच्या पुढे दिसलेल्या रस्त्याला लागलो..
त्रिवेणी घाटावरून लगेच विक्रम किंवा इतर वाहन मिळत नाही..जरा बाहेर जावं लागतं..
आम्हालाही वेळ होताच त्यामुळे तिथलं मार्केट बघत गेलो..सकाळी चप्पल गंगार्पण केलेली त्यामुळे नवीन घ्यावी लागणार होती..ते सुद्धा काम केलं..
मग त्या दुकानातच चौकशी केली की पुन्हा तपोवनला जायला विक्रम मिळेल का..किती पैसे घेतात इत्यादी..
आणि मग मेन रोडला आलो..आणि वाटलेलं तेच झालं, विक्रम आली आणि ड्रायव्हर बरेच पैसे सांगू लागला..मग त्याला दमात घेतलं आणि अवघ्या १० रुपयात तपोवन मध्ये येऊन पोहोचलो..
मग बाकी बारीक सारीक खरेदी बाकी होती..ती करायला मार्केट मध्ये गेलो..महत्वाचं म्हणजे जो HAPI (Hand Activated Percussion Instrument) DRUM मी आदल्या दिवशी बघितलेला तो काही माझ्या डोक्यातून गेला नव्हता..त्यामुळे तो जिथे बघितला त्या माणसाला फोन करून किती वाजेपर्यंत दुकान उघडं आहे वगैरे चौकशी करुन ठेवलेली..आणि आज तो घ्यायचाच असं ठरवलेलंच! तर त्याच्या दुकानाकडे जाता जाता मधे एक दुकान लागलं..तिथे भरपूर वाद्य होती..मी सहज तिथे शिरुन HAPI Drum वाजवून बघितला तर कालच्यापेक्षा हा कानाला जास्ती चांगला वाटला..म्हणून त्या दुकानदाराशी बोलले असता त्याने त्यातल्या दोन quality दाखवल्या..
एक खऱ्या हँड मेड धातूची ज्यात सात स्वर कानाला स्वच्छ कळत होते..आणि दुसरी मशीन मेड ज्यात फक्त तत्सम आवाज येत होता पण करेक्ट स्वर नव्हते..
मग थोडं आणखी बोलल्यावर कळलं की मशीन मेड स्वस्त असतात आणि बऱ्याच दुकानात लोकांना गंडवून हँड मेडच्या भावाला सर्रास मशीन मेड वाद्य दिलं जातं..
मग मी माझ्या सर्व बर्गेनिंग स्किल्स पणाला लावल्या आणि तो HAPI DRUM, त्याची बॅग आणि दोन स्टिक काल त्या दुसऱ्या दुकानदाराशी ठरलेल्या भावातच घेतलं!! 
मग आणखी काही बारीक सारीक खरेदी झाली आणि मग 
उद्या मसुरीसाठी निघायचं असल्याने, आणि ऑफिसचं थोडं काम, त्यात बॅग पॅक करणं हे सगळं बाकी असल्याने झॉस्टेल समोरच असलेल्या Bistro Nirvana मध्ये जेवायला गेलो..
तिथे मस्त बिर्याणी खाल्ली आणि watermelon mint आणि Nirvana Punch juice घेतले! लोकेशन मस्त असल्याने भरपूर फोटो काढले आणि परत आलो.. बॅग पॅक केली..तोवर तिथली मॅनेजर विचारत आली की तुम्ही उद्या मसुरीला जाणार आहात ना? तर म्हंटलं हो..मग ती म्हणाली की एक कपल आहे ज्यांना मसुरीलाच जायचं आहे उद्या, तर कॅब शेर करायला कुणी आहे का ते बघतायत.. म्हंटलं उत्तम! खरं आम्ही बसने जायचं ठरवलं होतं..पण म्हंटलं बघूया! हव्या त्या ठिकाणी थांबता येईल..सोबत पण असेलच!
म्हणून आम्ही आवरुन वर कॉमन रूम मध्ये गेलो..मग त्यांना जाऊन भेटले तर त्यांना बाहेर अव्वाच्या सव्वा भाव सांगितलेला..त्यामुळे शेवटी ते सुद्धा बसनेच जायच्या मार्गावर होते. पण आम्ही पहिल्याच दिवशी ज्या माणसाने आम्हाला एअरपोर्टहून इथे आणलं, त्याला विचारून ठेवलेलं..त्याने अक्षरशः दर अर्धा सांगितलेला! पण तेव्हा बराच उशीर झाल्याने आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी फोन करायचं ठरवलं, आणि तो आला तर सकाळी घाटावर जाऊन गंगा आणायची आणि मग निघायचं असं आमचं ठरलं..नंबर वगैरे घेतला..मग थोडं काम केलं आणि झोपुन गेलो
सकाळी त्याला फोन केला..तो यायला तयार झाला!
मग त्यांना तसं कळवून, पूर्ण पॅकिंग करून, तयार होऊन आम्ही घाटावर निघालो..चालत जात होतो..पण पाय जरा जडच झाले होते..तीन दिवस कसे गेले काही कळलंच नाही..अजूनही मन भरलं नव्हतं..
खाली घाटावर येऊन बसलो शांत थोड्यावेळ..हाच तो शत्रुघ्न घाट..जिथे पहिल्या दिवशी आम्ही आलेलो..
खूप शांत वाटतं होतं..
गेल्या तीन दिवसात आम्ही ठरवून तीन वेगवेगळ्या ठिकाणि गंगा आरतीचा लाभ घेतलेला..पण इथली आरती आयुष्यभर लक्षात राहील अशी!
आम्ही बाटल्या भरुन घेतल्या..फोटो काढले..
पुन्हा थोडा वेळ बसलो..उठवतंच नव्हतं!
मनातल्या मनात इच्छा करत होतो की इथे पुन्हा यायला मिळावं!
तेव्हा आम्हाला तरी काय माहीत होतं ही देवभूमीतिल वास्तू आपल्याला इतक्या लगेच तथास्तु म्हणणार आहे!!

तर..आलो..गाडी आलेलीच..मग चेक आऊट केलं..प्रवासी गोळी घेतली..आणि गाडीत बसलो!

मग पुन्हा त्याच्याशी गप्पा मारत मारत आमचा प्रवास सुरु झाला..की इथे पीक कुठलं येतं, staple food काय आहे, विशेष पदार्थ कुठले, २०१३ ला बाड आली तेव्हा ते कुठे होते..काय परिस्थिती होती इत्यादी...

त्याचबरोबर रस्ता अतिशय सुंदर होता..मधे एका शंकराच्या मंदिरात सुद्धा जाऊन आलो..
तिथे बाकीच्यांनी काही खायला घेतलं, एक फॅमिली होती त्यांनी त्या दुकानातून softy ice cream घेतलेलं..आणि माकडांचा बराच उद्रेक होता..एका माकडाने चक्क तिच्या अंगावर उडी मारुन ते हिसकावून घेतलं आणि समोर जाऊन मस्त चाटून पुसून खाऊन टाकलं!
माकड हा प्राणीच गंमतशीर आहे..उगाच नाही त्याला आपला पूर्वज म्हणत..आपल्यातील अनेक लोक आजही हे असंच हिसकावून घेत असतात!
असो!
तर रस्ता सुंदर होता..वातावरण सुंदर होतं फक्त एकच घोळ झाला, प्रवासी गोळी घेतली असल्याने मला काही वेळाने झोप लागली! अर्थात बाहेर असल्याने हलकी जाग असतेच कायम..सतर्कतेसाठी... पण तेवढीच!
पुढे एकदम वळणं तीव्र झाली तेव्हाच जरा नीट जाग आली..

एका वळणावर आम्हाला दरीच्या बाजूला त्या कठड्यावर उभी असलेली एक मुलगी दिसली..आमच्याच वयाची असेल..निळं जॅकेट.. छान तयार झालेली..पण त्या कड्यावर एकटीच उभी होती...दरीकडे तोंड करुन!
जवळजवळ सिंगल लेन रस्ता..घाटातला...निर्जन स्थळ...आसपास कुठलीही गाडी नव्हती...
आणि आम्हाला सगळ्यांनाच ती दिसली..
का उभी असेल ती तिथे..?
पुढे काय झालं असेल तिचं..?
हे प्रश्न अजूनही सतावतात...

असो...तर आणखी काही वेळाने एका सुंदर पॉईंटला गाडी थांबवली...तसे आम्ही सगळे बाहेर गेलो..
पाऊल ठेवतो न ठेवतो तोच थंडीची जाणीव झाली!
५ मिनटं तसेच थांबलो असू, मग लगेच जॅकेट, मफलर वगैरे घालून सज्ज झालो!
मग फोटो काढले...बाकीच्यांनी मॅग्गी-चहा घेतला..मग पुढे निघालो..
आमचं बुकिंग होतं पुन्हा zostel ला...हे zostel मुख्य मसुरीच्या टुरिस्ट पॉईंट्स पासून खूप लांब आहे..एकदम आत..पण ते इतकं सुंदर आहे..की तिथे जाऊन फक्त रहाण्याचा आमचा उद्देश होता..
आधी सांगितल्याप्रमाणे ही टूर आम्हाला फिरण्यासाठी करायची नव्हती..तर रिलॅक्स व्हायला करायची होती..त्यामुळे रहाण्याची ठिकाणं सुंदर निवडली होती आणि फिरण्याकडे कल कमी होता..
आणखी थोडं पुढे आल्यावर आम्हाला डावीकडे आत zostel दिसलं!
तो परिसर इतका सुंदर आहे की तिथे दारावरच पाटी आहे की फक्त बुकिंग असलेल्या लोकांनाच आत यायला परवानगी आहे! त्यामुळे फोटो काढणाऱ्यांना काही विशेष स्कोप नाही!
आम्ही त्या दोघांना bye करुन आणि टॅक्सीचालकाशी परत इथून देहरादूनला जाण्याबद्दल मोघम बोलून आत गेलो!

खरं प्रवासाचा थकवा आलेला..संपूर्ण घाट असल्याने ते होणं सहाजिकच होतं.. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर जाऊन पसरायचं होतं..
पण आम्हाला सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण करुन मगच वर जायला मिळालं..दुसरी गोष्ट म्हणजे इथे बॅगेज आपलं आपल्यालाच न्यावं लागतं, इमारत नसल्याने तिथे लिफ्ट वगैरे काही नाही..आणि सगळी रहायची ठिकाणं एक दोन मजल्याच्या उंचीवरच आहेत..
त्यामुळे सगळं सामान घेऊन वरती आलो..पण ती डोर्म सगळ्यात सुंssदर होती!! 
गरम पाणी २४ तास असल्याचं कळलं मग लग्गेच कडक पाण्याने अंघोळी केल्या आणि पटकन झोपून गेलो!
दुपारी जाग आली तर चक्क अंधार झालेला..
ही जागा अशी होती की आमच्या तिन्ही बाजूला डोंगर होते..आणि समोर पश्चिम दिशा असणार..तिकडे जरा सूर्य त्या डोंगरा मागे गेला की लग्गेच ३.३०-४ वाजताच अंधार व्हायला सुरुवात...आणि पुन्हा कडाक्याची थंडी!!

किंचित negative वाटलेलं उठल्या उठल्या तो अंधार बघून...जरा फ्रेश झालो...आणि त्या नंतर फोनचं इंटरनेट सुरु केलं आणि ती शंकेची पाल खरी होऊनच समोर आली...
क्रमशः

No comments:

Post a Comment