Featured post

राधा उवाच...नावात दडलंय काय ...?

माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच..  कसे….? सांगते! राधा…...

Wednesday 4 January 2017

एक पाऊल..

एक पाऊल..

आज थोडा मूड वेगळाच होता स्वारीचा..
नेहेमीच्या टीप-टॉप, ऑर्गनाईझ्ड दिनक्रमाला झुगारुन लावायचं असा निश्चयच होता मुळी…
सकाळी उठल्या उठल्याच मोबाईल बघितला आणि तिचा-त्याचा एकत्र फोटो वॉलपेपर म्हणून दिसला…
पुन्हा तीच अस्वस्थता, तीच चिडचिड, तोच इगो, तोच राग…
त्याने क्षणभर मोबाईलची स्क्रीन लॉक केली…आणि डोळेही..
बंद डोळ्यांसमोरही आली ती तिच्या गालावर पडणारी खळी..
आणि नकळत उमटलं हसू त्याच्याही गालावर..
मग त्याने डोळे उघडले..
उठून खिडकीपुढचा पडदा सारला..
झरकन आलेल्या प्रकाशाने तो थोडा भांबावला, मग सुखावला..
त्याच्या अंधाऱ्या आयुष्यात असाच प्रकाश घेऊन आली होती ती..
पण त्याने भांबावण्यातच इतका वेळ घालवला कि सुखावायच्या वेळी ती त्याच्यासोबत नव्हतीच…
स्वतःच्याच वेडेपणावर आज हसू येत होतं त्याला..
हो, अशाही प्रसंगात हसूच येत होतं..कारण त्याला खात्री होती,
ती आजही आहे त्याच्यासाठी..कितीही नाही म्हणाली तरी..
पटकन आवरायला म्हणून गेला..आवरुन नेहेमीचे कडक इस्त्रीचे फॉर्मल कपडे घालून आरशासमोर उभा राहिला…
पण त्याला आरशात तो दिसलाच नाही…
दिसला एक यंत्रमानव..घड्याळाच्या काट्याच्या हातातली कळसूत्री बाहुली असलेला..
एरवी तो हताश झाला असता, पण आजचा दिवस वेगळा होता..
त्याने कपाट उघडलं आणि सगळ्यात खाली असलेला,
तिथेच वर्षभर पडून असलेला एक शर्ट काढला..
'जोकर वाटेन मी ह्या शर्टमध्ये..काहीही काय उचलून आणतेस..?'
'नाही वाटणार..घालून तरी बघ एकदा.. मला तू जोकर वाटलेला चालेल का…?'
'Please..आता emotional डोस नको देऊस हा..मी असलं काही घालणार नाही अँड thats final.'
'……..'
काय म्हणाली होती ती ह्यावर…?
का आठवत नाहीये आपल्याला...? का ती काही न म्हणताच निघून गेली होती..?
हो कदाचित….आणि मला कळलंच नाही…
त्याच्या ह्याच स्वभावामुळे तिने एक पाऊल मागे घेतलं होतं..आणि मग त्यानेही..
त्याने एकवार त्या शर्टकडे बघितलं..
घातलेला कडक इस्त्रीचा शर्ट काढला आणि बेडवर भिरकावला..
अगदी गांगुलीने भिरकावलेला तस्साच..
मग स्वतःशीच हसत त्याने तो 'जोकर' शर्ट घातला..
आणि निघाला..
घरातून निघताना सवयीने त्याने घराची आणि गाडीची चावी घ्यायला हात ड्रॉवर मध्ये घातला..
पण फक्त घरचीच चावी घेऊन निघाला..चालतच..
जाता जाता एक फुलांचा गुच्छ घ्यावा असं त्याच्या मनात होतं..
त्याप्रमाणे दुकानापाशी गेला..पण काही न घेताच परत फिरला..
शेजारच्या दुकानातून काही चॉकलेट्स घेतली आणि चालू लागला..
रस्ता क्रॉस करत असताना एक लहान मुलगी गजरे विकत होती..
त्याने तिच्याकडून गजरा घेतला आणि तिला दोन चॉकलेट्स दिले..
एरवी कधी ढुंकूनही बघत नसे तो अशा लोकांकडे..
पण आज त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला खूप काही देऊन गेला…
येऊन तिच्या ऑफिसच्या खाली उभा राहिला..
पण आजच नेमका तिला यायला उशीर झाला होता..
ती जवळपास धावतच ऑफिस गाठत होती..
पण ह्याला बघताच तिचे पाय वेग विसरुन जागीच थांबले…
तो तिच्याजवळ आला..
'आज सुट्टी टाकशील..?'
'अ…मीटिंग आहे...दुपारपर्यंत तरी थांबावच लागेल ऑफिस मध्ये..'
त्याने स्मितहास्य केलं..
तिच्यासाठी त्याचं हे रूप नवीन होतं..
त्याच्यासाठीही नवीन होतं..
त्याने शांतपणे उत्तर दिलं..
'हरकत नाही..काम झालं की फोन करशील..? मी थांबतो..'
'चालेल..'
ती पुढे जाऊन मागे वळली..
'शर्ट अजून जपून ठेवला असशील असं वाटलं नव्हतं..'
'सगळं जपून ठेवलं आहे..आणि कायम ठेवेन...हे तुझ्यासाठी..'
त्याने पिशवी तिच्याहाती दिली..तिने घाईघाईतच ती घेतली आणि न बघताच बिल्डिंगमध्ये निघून गेली..
सही केल्यावर आपल्या क्युबिकल मध्ये जाऊन जरा शांत बसली..
पाणी प्यायलं..
दोन क्षण विचार केला..
हा इतका वेगळा का वाटला आज..?
हे खरं होतं का स्वप्न..?
पण मग तिला त्याने दिलेली पिशवी दिसली..
जवळपास झडप घालूनच तिने ती हाती घेतली..
आणि आत गजरा आणि तिची आवडती चॉकलेट्स बघून तिचे
डोळे भरुन आले..
तिने मोबाईल बघितला..
त्या दोघांचा तोच फोटो तिच्याही फोनवर वॉलपेपर होता..
तिने ऑफिसचा फोन उचलून एक नंबर फिरवला
'Hello Sir, I am calling from CGT..I'm sorry sir, I won't be able to meet you today for our scheduled meeting. I sincerely apologise to you for that.'
समोरचं उत्तर ऐकायलाच नाही आलं तिला..
तिने पर्स उचलली..पिशवी घेतली..
आणि निघाली.…
आज त्याने एक पाऊल पुढे टाकलं होतं..
आणि आता…
तिनेही….

- कांचन लेले

2 comments: